रियाशी ड्रग्जसंदर्भात चॅट केले...पण ड्रग्ज घेतले नाही; रकुलची एनसीबीसमोर कबुली

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूवरुन सुरू असलेला गदारोळ अद्याप कायम आहे. या प्रकरणी रोज नवनवीन धक्कादायक बाबी समोर येत असल्याने यातील गुंतागुंत आणखी वाढत आहे.
actress rakul preet singh denies any drugs consumption before ncb
actress rakul preet singh denies any drugs consumption before ncb

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्जच्या अँगलचा तपास करणाऱ्या अमली पदार्थ विरोधी विभागाने (एनसीबी) सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांना अटक केली आहे. त्यांच्या चौकशीत अनेक नावे समोर आली आहेत. या प्रकरणी अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह आणि श्रद्धा कपूर यांच्यासह आणखी काही अभिनेत्रींना एनसीबीने समन्स बजावण्यात आले होते. एनसीबीने रकुलची आज चौकशी केली. तिच्या चौकशीत धक्कादायक माहिती उघड झाली आहे. 

'एनसीबी'कडून रिया आणि तिचा भाऊ शौविक यांची चौकशी झाली होती. ड्रग्ज रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या बॉलीवूडमधील काही कलाकारांची नावे या दोघांनी उघड केली आहेत. बॉलीवूडमधील पार्ट्या आणि ड्रग्जची तस्करी यावरही या दोघांनी प्रकाश पाडला आहे. एनसीबीकडून काही कलाकारांना या प्रकरणी चौकशीसाठी या आठवड्यात बोलावण्यात आले आहे. 

रिया चक्रवर्तीच्या चौकशीत तिने बॉलीवूडमधील कलाकारांची नावे उघड केली आहेत. यात अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंह आणि फॅशन डिझायनर सिमॉन खंबाटा यांची नावे आहेत. त्यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहे. याचबरोबर अनेक इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्या आणि इव्हेंट मॅनेजरही एनसीबीच्या रडारवर आले आहेत. बॉलीवूडमधील ड्रग्ज रॅकेटची पाळेमुळे खणून काढण्याच्या दिशेने एनसीबी पावले टाकत आहे. याचबरोबर दीपिकाची मॅनेजर करिष्मा प्रकाश आणि केडब्लूएएन टॅलेंट मॅनेजमेंट एजन्सीचे सीईओ ध्रुव चितगोपकर यांनाही चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. 

रकुल प्रीत सिंह आज चौकशीसाठी एनसीबीसमोर हजर झाली. आज तिची सुमारे चार तास चौकशी करण्यात आली. या चौकशीत तिने रियासोबत ड्रग्जसंदर्भात चॅट केल्याचे कबूल केले आहे. ड्रग्जविरोधी मोहिमांमध्ये सहभागी असणारी आणि तेलंगण राज्याची बँड अॅम्बेसिडर असेलल्या रकुलने कोणतेही ड्रग्ज घेतल्याचा आज जोरदार इन्कार केला. याचबरोबर कोणत्याही ड्रग्ज वितरकाशी संबंध नसल्याचेही तिने सांगितले, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

रकुल आणि दीपिका पदुकोणची व्यवस्थापिका करिष्मा प्रकाश यांची आज चौकशी झाली आहे. दीपिका पदुकोण, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांची उद्या चौकशी होईल. एनसीबीने या प्रकरणी 24 सप्टेंबरला फॅशन डिझायनर सिमॉन खंबाटा आणि सुशांतची माजी व्यवस्थापिका श्रुती मोदी यांची चौकशी केली होती.

सुशांतच्या घरी काम करणाऱ्या दीपेश सावंत याला एनसीबीने आधी अटक केली होती. दीपेश हा ड्रग्जची खरेदी आणि हाताळणी करीत होता. तो सुशांतला ड्रग्ज आणून देत होता. 'एनसीबी'ने या प्रकरणात सुरुवातीला कायझेन इब्राहिम, झैद विलाट्रा, अब्बास लखानी, अब्दुल बसित परिहार यांना अटक केली आहे. हे सर्वजण ड्रग्ज रॅकेटमध्ये सहभागी होते. त्यांच्याकडून अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिचा भाऊ शौविक आणि सुशांतचा मॅनेजर सॅम्युएल मिरांडा हे ड्रग्ज खरेदी करीत होते. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली होती. 

सुशांत हा 14 जूनला मुंबईतील घरी मृतावस्थेत सापडला होता. याचा तपास मुंबई पोलिस करीत होते. या प्रकरणी पोलिसांनी 56 जणांचे जबाब नोंदविले होते. यात सुशांतचे कुटुंबीय, त्याचे मित्र, अभिनेत्री रिया चक्रवर्ती, कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांच्यासह इतर काही जणांचा समावेश होता. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com