अभिनेत्रीच्या घरात ड्रग्ज नव्हतेच...होत्या दारुच्या बाटल्या..!

कर्नाटकातील सँडलवूडमधील ड्रग्ज कनेक्शन समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका अभिनेत्रीस ताब्यात घेतले आहे.
actress ragini dwivedi detained by central crime branch for interrogation
actress ragini dwivedi detained by central crime branch for interrogation

बंगळूर : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी सुरु असलेल्या तपासात बॉलीवूडमधील ड्रग्ज कनेक्शन समोर येत आहे. काही अभिनेते ड्रग्ज घेतल्याशिवाय अभिनयच करु शकत नाहीत, असा आरोप होत आहे. आता सँडलवूडमधील ड्रग्ज कनेक्शन समोर आले आहे. प्रसिद्ध कन्नड अभिनेत्रीच्या घरावर आज केंद्रीय गुन्हे शाखेने (सीसीबी) छापे घातले असून, तिला ताब्यात घेण्यात आले आहे. 

सीसीबीने आज सकाळी 6 वाजता अभिनेत्री रागिनी द्विवेदी हिच्या घरावर छापा घातला. सीसीबीने रागिनीला चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली होती. मात्र, तिने वकिलांनी पाठवून मुदतवाढ मागितली होती. मात्र, पोलिसांनी तिला आजच हजर होण्यास सांगितल्याने ती अखेर हजर झाली. तिची चौकशी करण्यात येत आहे. तिच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली असून, यात अनेक बड्या नावांचा समावेश आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

कन्नड चित्रपटसृष्टी म्हणजेच सँडलवूडमध्ये ड्रग्जचा पुरवठा करणाऱ्या तीन जणांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी वेगाने तपास करण्यास सुरूवात केली आहे. या प्रकरणी निर्माता व पत्रकार इंद्रजित लंकेश याची चौकशी करण्यात आली आहे. त्याने चौकशीत सँडलवूडमधील किमान 15 जणांची नावे उघड केली होती. यात रागिनी हिचे नाव असल्याने ती तपास यंत्रणांच्या रडारवर आली आहे. आता तपास यंत्रणांनी सँडलवूडमधील ड्रग्ज कनेक्शनच्या मुळाशी जाण्याचा चंग बांधला आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रागिनी हिच्या घराची आणि मोटारींची सकाळी झडती घेण्यात आली. यात तिच्या घरी काही दारुच्या बाटल्या सापडल्या. मात्र, कोणतेही ड्रग्ज सापडलेले नाही. रागिनीची मित्र व प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी रविशंकर याला अटक करण्यात आली होती. रविशंकर हा अनेक कलाकारांना ड्रग्जचा पुरवठा करीत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. त्यानेच रागिनीचे नाव उघड केले होते. 

रागिनी आणि रविशंकर हे दोघे मिळून रागिनीच्या घरी पार्ट्या करीत असत. या पार्ट्यांमध्ये ते कोकेन, एलएसडी आणि एमडीएमए यासारख्या ड्रग्जचा वापर करीत. या पार्ट्यांना सँडलवूडमधील अनेक बडे कलाकार हजेरी लावत होते. रविशंकर हा प्रतिक शेट्टी हा ड्रग्ज वितरकाकडून ड्रग्ज घेत होता. त्याला एनसीबीने 2018 मध्ये अटक केली होती. त्यावेळी त्याच्याकडून 1.5 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. त्याला अटक झाल्यानंतर रविशंकर प्रतिककडून ड्रग्ज घेणे बंद केले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com