शिवसेनेविरोधातील वादात कंगनाने आता राज्यपालांना ओढले - actress kangana ranaut meets maharashtra governor bhagatsingh koshyari | Politics Marathi News - Sarkarnama

शिवसेनेविरोधातील वादात कंगनाने आता राज्यपालांना ओढले

वृत्तसंस्था
रविवार, 13 सप्टेंबर 2020

अभिनेत्री कंगना राणावत हिच्या वादग्रस्त वक्तव्यावरुन उठलेला गदारोळ कायम आहे. आज तिने थेट राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांना या वादात ओढले आहे. 

मुंबई : अभिनेत्री कंगना राणावत हिने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. या वादग्रस्त वक्तव्यावरुन सुरू झालेला गदारोळ अद्याप संपलेला नाही. कंगना आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यात रोज जोरदार सामना रंगत असल्याचे चित्र आहे. यात कंगनाच्या बाजूने भाजप नेते मैदानात उतरत असताना तिने आज थेट राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. तिने राज्यपालांसमोर गाऱ्हाणे मांडले असून, न्याय देण्याची मागणी केली आहे. 

कंगनाने मुंबईबाबत केलेल्या वक्तव्यावर शिवसेनेने तिला मुंबईत पाय ठेवू देणार नाही, अशा इशारा दिला होता. कंगनाविरोधात महाराष्ट्रात वातावरण तापले असल्याने केंद्रातील मोदी सरकारने तिला 'वाय' सुरक्षा दिली आहे. मुंबई महापालिकेच्या पथकाने कंगनाच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकाम पाडून टाकले होते. यावर कंगनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करीत त्यांना लक्ष्य केले होते. 

कंगनाच्या बंगल्याचा भाग पाडल्यानंतर संतापून तिने ट्विटरवर मुंबई महापालिकेच्या विरोधात मोर्चा उघडला होता. तिने मुंबईची पाकव्याप्त काश्मीरशी केलेली तुलना योग्य असल्याचा दावा केला होता. तिने म्हटले होते की, ही इमारत माझ्यासाठी राम मंदिराप्रमाणे होती. आज तेथे बाबर आला आहे. आज पुन्हा इतिहास घडत असून, मंदिर पाडले जात आहे. परंतु, लक्षात ठेवा मंदिर पुन्हा बनेल. जय श्री राम! 

कंगनाच्या बाजूने भाजप नेते मैदानात उतरले आहेत. ते कंगनाच्या मुद्द्यावरुन शिवसेनेला आणि राज्य सरकारला लक्ष्य करीत आहेत. कंगनाने आज राजभवनावर जाऊन थेट राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. राज्यपालांची कंगनाने भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

राज्यपालांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना कंगना म्हणाली की, मला मिळालेली अन्यायी वागणूक मी राज्यपालांच्या कानावर घातली आहे. मला न्याय मिळेल अशी आशा आहे. कारण या व्यवस्थेवरील सर्व नागरिकांचा आणि विशेषत: तरुण मुलींचा विश्वास यामुळे बळकट होईल. राज्यपालांनी माझे ऐकून घेतल्याने मी स्वत:ला सुदैवी मानते. त्यांनी माझे अगदी मुलीप्रमाणे ऐकून घेतले. 

Edited by Sanjay Jadhav 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख