मुंबई पोलिसांचे कंगनाला तिसऱ्यांदा समन्स...पण ती चौकशीला हजर राहणार का? - actress kangana ranaut and her sister summoned by mumbai police | Politics Marathi News - Sarkarnama

मुंबई पोलिसांचे कंगनाला तिसऱ्यांदा समन्स...पण ती चौकशीला हजर राहणार का?

वृत्तसंस्था
बुधवार, 18 नोव्हेंबर 2020

अभिनेत्री कंगना राणावत हिच्या वादग्रस्त वक्तव्यांवरुन मोठा गदारोळ उडाला होता. तिच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, तिला चौकशीसाठी पुन्हा समन्स बजावण्यात आले आहे. 

मुंबई : अभिनेत्री कंगना राणावत हिच्या वादग्रस्त वक्तव्यांवरुन मोठा गदारोळ उडाला होता. वादग्रस्त वक्तव्ये केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार वांद्रे पोलिसांनी कंगना आणि तिची बहीण रंगोली चंडोली यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. भावाच्या लग्नाचे कारण समोर करुन कंगनाने चौकशीला हजर राहण्यास मुदतवाढ मागितली होती. आता मुंबई पोलिसांनी कंगना आणि रंगोली यांना तिसऱ्यांदा समन्स बजावले आहे. या वेळी ती चौकशीला हजर राहणार की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

कंगनाने मुंबईबद्दल वादग्रस्त वक्तव्य करुन वाद ओढवून घेतला होता. यामुळे कंगना आणि शिवसेना यांच्यात जोरदार सामना रंगला होता. यात कंगनाच्या बाजूने भाजप नेते मैदानात उतरले होते. तिने थेट राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. तिने राज्यपालांसमोर गाऱ्हाणे मांडून, न्याय देण्याची मागणी केली होती. त्यानंतर कंगना मुंबई सोडून हिमाचल प्रदेशमधील तिच्या घरी परतली होती. तेथूनही तिने ट्विटरवर वादग्रस्त वक्तव्यांची मालिका कायम ठेवली होती. 

कंगनाने दोन समाजात तेढ पसरवणारे वक्तव्य केल्याप्रकरणी तिच्याविरुद्ध वांद्य्रातील महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली होती. यावर न्यायालयाने कंगना आणि तिची बहीण रंगोली चंडेल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन तपास करण्याचे आदेश मुंबई पोलिसांना दिले होते. याआधी सुशांतसिंह प्रकरणात कंगनाने मुंबई पोलिसांना लक्ष्य केले होते. आता तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन चौकशीचे आदेश न्यायालयानेच मुंबई पोलिसांना दिल्याने कंगना चांगलीच अडचणीत आली आहे. 

न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार वांद्रे पोलिसांनी कंगना आणि रंगोली यांच्याविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. यात देशद्रोहाचा गुन्हाही त्यांच्यावर दाखल करण्यात आला आहे. कंगना आणि रंगोली यांना मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी समन्स बजावले होते. त्यावेळी त्या दोघींनी भावाचे लग्नाचे कारण पुढे करीत चौकशीला हजर राहण्यास मुदतवाढ मागितली होती. त्यानंतर पुन्हा एकदा चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले होते. या समन्सला त्यांनी उत्तरच दिले नव्हते. 
 
आता पुन्हा दोघींना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहे. त्यांना २३ व २४ नोव्हेंबरला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. दरम्यान, कर्नाटक पोलिसांना न्यायालयाच्या आदेशानुसार कंगनाविरोधात एफआयआर दाखल केला आहे. तिच्यावर दोन समुदायांमध्ये तेढ निर्माण करणे, जाणीवपूर्वक अपमान करणे, चिथावणी देणे आदी कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख