उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर विरोधकांचे आभार मानत कंगना म्हणाली, तुमच्यामुळेच मी हिरो

अभिनेत्री कंगना राणावतच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकामावर मुंबई महापालिकेने केलेली कारवाई उच्च न्यायालयाने अवैध ठरवली आहे. या मुंबई महापालिकेसह शिवसेनेला धक्का मानला जात आहे.
actress kanagana ranaut thanks her supporters and opponents
actress kanagana ranaut thanks her supporters and opponents

मुंबई : अभिनेत्री कंगना राणावत हिच्या बंगल्यावर मुंबई महापालिकेने केलेली कारवाई मुंबई उच्च न्यायालयाने अवैध ठरवली आहे. मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. त्यामुळे पालिकेबरोबरच हा शिवसेनेलाही मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर कंगनाने विरोधकांचे आभार मानले आहेत.  

कंगनाच्या बंगल्यावरील कारवाईबाबत उच्च न्यायालयाने निर्णय देताना महापालिकेच्या कृतीबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. ही कारवाई गैरहेतूने केल्याचा शेरा न्यायालयाने मारला आहे. या कारवाईबद्दल कंगनाला नुकसानभरपाई मिळेल, असेही उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. 

उच्च न्यायालयाच्या निर्णयावर कंगनाने आनंद व्यक्त केला आहे. तिने म्हटले आहे की, एखादी व्यक्ती सरकारविरोधात उभी राहते आणि जिंकते, त्यावेळी तो विजय हा त्या व्यक्तीचा नसून लोकशाहीचा असतो. मला धैर्य देणाऱ्या सर्वांचा आभार. याचबरोबर माझ्या भंगलेल्या स्वप्नांना हसणाऱ्यांचेही धन्यवाद. तुम्ही व्हिलन झाला म्हणूनच मी हिरो होऊ शकले. 

कंगनाने मुंबईबद्दल वादग्रस्त वक्तव्य करुन वाद ओढवून घेतला होता. यामुळे कंगना आणि शिवसेना यांच्यात रोज जोरदार सामना रंगला होता. यात कंगनाच्या बाजूने भाजप नेते मैदानात उतरले होते. तिने थेट राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. तिने राज्यपालांसमोर गाऱ्हाणे मांडून, न्याय देण्याची मागणी केली होती. त्यानंतर कंगना मुंबई सोडून हिमाचल प्रदेशला तिच्या घरी परतली होती. तेथूनही तिने ट्विटरवर वादग्रस्त वक्तव्यांची मालिका कायम ठेवली होती. 

अभिनेत्री कंगना राणावत हिच्या वांद्र्यातील पाली हिल येथील बंगल्यातील बेकायदा बांधकामाबाबत मुंबई महापालिकेने नोटीस बजावून बंगला सील केला होता. यातील बांधकामाबाबत कागदपत्रे सादर करण्यास महापालिकेने कंगनाला दिलेली २४ तासांची मुदत ९ सप्टेंबरला संपल्यानंतर महापालिकेच्या पथकाने कंगनाच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकाम पाडून टाकले होते. 

हा बंगला निवासी असल्याने त्यात कार्यालय सुरू करण्यासाठी रीतसर परवानगी घेणे गरजेचे होते. पालिका अधिनियम 354 (अ) अंतर्गत कोणत्याही निवासी जागेचा व्यावसायिक वापर करता येत नाही, असेही या नोटिशीत नमूद केले होते. या बंगल्यामध्ये चटई क्षेत्र नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. काही ठिकाणी वाढीव बांधकामही करण्यात आले; तर पूर्वीची दोन बांधकामे जोडण्यात आली आहेत. तसेच अंतर्गत बदलही करण्यात आले आहेत. यात स्वच्छतागृह तोडून त्या जागी कार्यालय बांधण्यात आले आहे. तसेच परवानगी न घेता नवे स्वच्छतागृह बांधण्यात आले आहे, असे प्रथमदर्शनी दिसते, असे महापालिकेने म्हटले होते. 

Edited By Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com