अभिनेत्री म्हणाली, खबरदार...जर ड्रग्जप्रकरणी माझे नाव घ्याल!

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी समोर आलेल्या ड्रग्ज अँगलची चौकशी एनसीबी करीत आहे. या प्रकरणी दररोज नवनवीन धक्कादायक बाबी समोर येत आहेत.
actress dia mirza refutes allegation of drugs use and warns legal action
actress dia mirza refutes allegation of drugs use and warns legal action

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्जच्या अँगलचा तपास करणाऱ्या अमली पदार्थ विरोधी विभागाने (एनसीबी) सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांना अटक केली होती. या प्रकरणी अनेक नावे चौकशीत समोर येऊ लागली आहेत. काही वृत्तवाहिन्यांनी अभिनेत्री दिया मिर्झा हिची चौकशी होणार असल्याचे वृत्त दिले. यावरुन संतप्त झालेल्या दियाने या प्रकरणी कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. 

'एनसीबी'कडून रिया आणि तिचा भाऊ शौविक यांची चौकशी झाली होती. ड्रग्ज रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या बॉलीवूडमधील काही कलाकारांची नावे या दोघांनी उघड केली आहेत. बॉलीवूडमधील पार्ट्या आणि ड्रग्जची तस्करी यावरही या दोघांनी प्रकाश पाडला आहे. एनसीबीकडून काही कलाकारांना या प्रकरणी चौकशीसाठी या आठवड्यात बोलावण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

काही वृत्तवाहिन्यांनी या प्रकरणी अभिनेत्री दिया मिर्झा आणि दीपिका पदुकोण यांची चौकशी होणार असल्याचे वृत्त दिले आहे. यावरुन संतापलेल्या दियाने या प्रकरणी खुलासा केला आहे. तिने म्हटले आहे की, माझ्यावरील सर्व आरोप मी फेटाळून लावते. हे आरोप खोटे, निराधार आणि बदनामी करण्याच्या उद्देशाने करण्यात आले आहेत. अशा प्रकारच्या खोट्या वृत्तांमुळे माझी प्रतिमा मलिन होत आहे. मी अनेक वर्षे कठोर परिश्रम करुन बनविलेल्या करिअरवर याचा परिणाम होत आहे. 

मी आयुष्यात कधीही ड्रग्ज खरेदी केलेले अथवा घेतलेले नाही. भारताची कायदा पाळणारी नागरिक या नात्याने मी या प्रकरणी कायदेशीर कारवाई करणार आहे. या काळात माझ्या पाठिशी उभे राहणाऱ्या चाहत्यांचे मी आभार मानते, असे दियाने म्हटले आहे. 

रिया चक्रवर्तीच्या चौकशीत तिने बॉलीवूडमधील कलाकारांची नावे उघड केली आहेत. यात अभिनेत्री सारा अली खान, श्रद्धा कपूर, राकुल प्रीत सिंग आणि फॅशन डिझायनर सिमॉन खंबाटा यांची नावे आहेत. त्यांना या आठवड्याच्या अखेरीस चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे. याचबरोबर अनेक इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्या आणि इव्हेंट मॅनेजरही एनसीबीच्या रडारवर आले आहेत. यात काही वृत्तवाहिन्या आता दीपिका पदुकोणचेही नाव घेऊ लागल्या आहेत. बॉलीवूडमधील ड्रग्ज रॅकेटची पाळेमुळे खणून काढण्याच्या दिशेने एनसीबी पावले टाकत आहे. 

निर्माता मधू मँटेना, टॅलेंट मॅनेजर जया साहा आणि श्रुती मोदी यांची उद्या पुन्हा चौकशी करण्यात येणार आहे. याचबरोबर सेलिब्रेटी मॅनेजर करिष्मा प्रकाश आणि केडब्लूएएन टॅलेंट मॅनेजमेंट एजन्सीचे सीईओ ध्रुव चितगोपकर यांनाही उद्या चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. मात्र, करिष्मा प्रकाश हिने तब्येत बरी नसल्याचे कारण देऊन चौकशीला हजर होण्याबाबत असमर्थता दर्शविली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

सुशांतच्या घरी काम करणाऱ्या दीपेश सावंत याला एनसीबीने आधी अटक केली होती. दीपेश हा ड्रग्जची खरेदी आणि हाताळणी करीत होता. तो सुशांतला ड्रग्ज आणून देत होता. 'एनसीबी'ने या प्रकरणात सुरुवातीला कायझेन इब्राहिम, झैद विलाट्रा, अब्बास लखानी, अब्दुल बसित परिहार यांना अटक केली आहे. हे सर्वजण ड्रग्ज रॅकेटमध्ये सहभागी होते. त्यांच्याकडून अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिचा भाऊ शौविक आणि सुशांतचा मॅनेजर सॅम्युएल मिरांडा हे ड्रग्ज खरेदी करीत होते. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली होती. 

सुशांत हा 14 जूनला मुंबईतील घरी मृतावस्थेत सापडला होता. याचा तपास मुंबई पोलिस करीत होते. या प्रकरणी पोलिसांनी 56 जणांचे जबाब नोंदविले होते. यात सुशांतचे कुटुंबीय, त्याचे मित्र, अभिनेत्री रिया चक्रवर्ती, कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांच्यासह इतर काही जणांचा समावेश होता. 

Edited by Sanjay Jadhav
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com