धक्कादायक : ड्रग्ज व्हॉट्सअॅप ग्रुपची दीपिकाच होती अॅडमिन - actress deepika padukone was admin of whatsapp group with alleged chats | Politics Marathi News - Sarkarnama

धक्कादायक : ड्रग्ज व्हॉट्सअॅप ग्रुपची दीपिकाच होती अॅडमिन

वृत्तसंस्था
शुक्रवार, 25 सप्टेंबर 2020

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी ड्रग्जचा अँगल समोर आला आहे. या प्रकरणी एनसीबीच्या चौकशीच्या फेऱ्यात आता काही अभिनेत्री अडकल्या आहेत. 

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्जच्या अँगलचा तपास अमली पदार्थ विरोधी विभाग (एनसीबी) करीत आहे. सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक यांच्या चौकशीत अनेक नावे समोर आली आहेत. या प्रकरणी अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह आणि श्रद्धा कपूर यांच्यासह आणखी काही अभिनेत्रींना एनसीबीने समन्स बजावले होते. एनसीबीने रकुल आणि दीपिकाची व्यवस्थापिका करिष्मा प्रकाश यांची आज चौकशी केली. त्यांच्या चौकशीत धक्कादायक माहिती उघड झाली आहे. 

'एनसीबी'कडून रिया आणि तिचा भाऊ शौविक यांची चौकशी झाली होती. ड्रग्ज रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या बॉलीवूडमधील काही कलाकारांची नावे या दोघांनी उघड केली आहेत. बॉलीवूडमधील पार्ट्या आणि ड्रग्जची तस्करी यावरही या दोघांनी प्रकाश पाडला आहे. एनसीबीकडून काही कलाकारांना या प्रकरणी चौकशीसाठी या आठवड्यात बोलावण्यात आले आहे. यात अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंह आणि फॅशन डिझायनर सिमॉन खंबाटा यांची नावे आहेत. त्यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहे. याचबरोबर अनेक इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्या आणि इव्हेंट मॅनेजरही एनसीबीच्या रडारवर आले आहेत. 

वाचा : रियाशी ड्रग्जसंदर्भात चॅट केले...पण ड्रग्ज घेतले नाही!

बॉलीवूडमधील ड्रग्ज रॅकेटची पाळेमुळे खणून काढण्याच्या दिशेने एनसीबी पावले टाकत आहे. रकुल प्रीत सिंह आज चौकशीसाठी एनसीबीसमोर हजर झाली. आज तिची सुमारे चार तास चौकशी करण्यात आली. दीपिका पदुकोणची व्यवस्थापिका करिष्मा प्रकाश हिचीही आज चौकशी झाली आहे. उद्या पुन्हा तिची चौकशी होणार आहे. दीपिका आणि करिष्मा यांची समोरासमोर चौकशी करण्यात येणार आहे. 

एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, आजच्या चौकशीत दीपिका ही ड्रग्जशी निगडित व्हॉट्सअॅप ग्रुपची अॅडमिन असल्याचे समोर आले आहे. सेलिब्रेटी मॅनेजर जया साहा ही या ग्रुपची प्रमुख आणि अॅडमिनही होती. या ग्रुपची करिष्मा ही सदस्या होती. या ग्रुपच्या माध्यमातून या अभिनेत्रींनी ड्रग्ज खरेदी आणि पुरवठा झाला आहे का हे एनसीबी तपासत आहे. याचबरोबर अभिनेत्रींनी ड्रग्ज घेतले का याचीही चौकशी सुरू आहे. 

दीपिका पदुकोण, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांचीही उद्या चौकशी होईल. एनसीबीने या प्रकरणी 24 सप्टेंबरला फॅशन डिझायनर सिमॉन खंबाटा आणि सुशांतची माजी व्यवस्थापिका श्रुती मोदी यांची चौकशी केली होती. त्याआधी जया साहा हिची सलग तीन दिवस चौकशी झाली होती. 

Edited by Sanjay Jadhav
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख