दीपिकाला कोसळले तीन वेळा रडू अन् एनसीबी अधिकाऱ्यांचा संयम सुटून ते म्हणाले... - actress deepika padukone cried three times during interrogation by ncb | Politics Marathi News - Sarkarnama

दीपिकाला कोसळले तीन वेळा रडू अन् एनसीबी अधिकाऱ्यांचा संयम सुटून ते म्हणाले...

वृत्तसंस्था
रविवार, 27 सप्टेंबर 2020

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्ज अँगल समोर आला असून, याची चौकशी एनसीबी करीत आहे. एनसीबीने अनेक अभिनेत्रींची चौकशी केली असून, बॉलीवूडमधील ड्रग्ज कनेक्शनचा पर्दाफाश करण्याचा प्रयत्न एनसीबीकडून सुरू आहे. 

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्जच्या अँगलचा तपास अमली पदार्थ विरोधी विभागाने (एनसीबी) अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह आणि श्रद्धा कपूर यांची चौकशी करण्यात आली आहे. या सर्वच अभिनेत्रींनी ड्रग्जसंदर्भात चॅट केल्याची कबुली एनसीबीसमोर दिली आहे. त्यांचे मोबाईलही एनसीबीने जप्त केले आहेत. चौकशीदरम्यान, अभिनेत्री दीपिका पदुकोणला तीन वेळा रडू कोसळल्याची माहिती समोर आली आहे. 

'एनसीबी'कडून रिया आणि तिचा भाऊ शौविक यांची चौकशी झाली होती. ड्रग्ज रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या बॉलीवूडमधील काही कलाकारांची नावे या दोघांनी उघड केली आहेत. बॉलीवूडमधील पार्ट्या आणि ड्रग्जची तस्करी यावरही या दोघांनी प्रकाश पाडला आहे. एनसीबीकडून काही कलाकारांना या प्रकरणी चौकशीसाठी या आठवड्यात बोलावण्यात आले आहे. यात अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंह आणि फॅशन डिझायनर सिमॉन खंबाटा यांची नावे आहेत. त्यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले होते. याचबरोबर अनेक इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्या आणि इव्हेंट मॅनेजरही एनसीबीच्या रडारवर आले आहेत. 

बॉलीवूडमधील ड्रग्ज रॅकेटची पाळेमुळे खणून काढण्याच्या दिशेने एनसीबी पावले टाकत आहे. रकुल प्रीत सिंहची शुक्रवारी सुमारे चार तास चौकशी करण्यात आली. दीपिका पदुकोणची व्यवस्थापिका करिष्मा प्रकाश हिचीही चौकशी झाली होती. काल पुन्हा तिची चौकशी झाली आहे. दीपिका आणि करिष्मा यांची समोरासमोर चौकशी करण्यात आली. दीपिकाची काल सुमारे पाच तास चौकशी करण्यात आली. याचबरोबर सारा आणि श्रद्धा यांचीही सुमारे पाच तास चौकशी करण्यात आली.  

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपिकाची काल चौकशी करण्यात आली. त्यावेळी तिला तीन वेळा रडू कोसळले होते. यामुळे अखेर चौकशी करणाऱ्या एनसीबी अधिकाऱ्यांच्या संयमाचा बांध तुटला. त्यांनी तिला खडसावत असले इमोशनल कार्ड येथे चालणार नाही, असा सज्जड दम दिला. या चौकशीत दीपिकाने तिची व्यवस्थापिका करिष्मा प्रकाश हिच्याशी ड्रग्ज चॅट केल्याची कबुली दिली. मात्र, तिने कोणतेही ड्रग्ज घेतले नसल्याचे ठामपणे सांगितले. 

करण जोहर याच्या धर्मा प्रॉडक्शनचा कार्यकारी निर्माता या क्षितिज प्रसाद प्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. एनसीबीने कालपासून त्याची चौकशी सुरू केली होती. तब्बल 24 तासांच्या चौकशीनंतर त्याला एनसीबीने आज अटक केली. त्याला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे. वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर त्याच्या अटकेची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.  

एनसीबीने या प्रकरणी 24 सप्टेंबरला फॅशन डिझायनर सिमॉन खंबाटा आणि सुशांतची माजी व्यवस्थापिका श्रुती मोदी यांची चौकशी केली होती. त्याआधी जया साहा हिची सलग तीन दिवस चौकशी झाली होती. 

Edited by Sanjay Jadhav 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख