नवी दिल्ली : देशभरात कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू आहे. 45 वर्षांवरील व्यक्तींना कोरोना लस दिली जात आहे. आता कोरोना लशीचा पहिला डोस घेतल्यानंतर काँग्रेसची नेता व अभिनेत्री नगमा ही पॉझिटिव्ह सापडली आहे. तिनेच ट्विटरवर ही माहिती दिली असून, लस घेतली म्हणून तुम्हाला कोरोना होणार नाही असे समजू नका, असा खबरदारीचा सल्लाही दिला आहे.
नगमाने 3 एप्रिलला कोरोना लशीचा पहिला डोस घेतला. त्यावेळी याची माहिती तिने ट्विटरवर दिली होती. तिने म्हटले होते की, मी कोरोना लशीचा पहिला डोस मुंबईत घेतला. लस घेतल्यानंतर मला ताप, डोकेदुखी, सर्दी आणि खोकल्याचा त्रास होत आहे. त्यामुळे डॉक्टरांनी मला दोन दिवस घरीच राहण्यास सांगितले आहे.
आता नगमा ही पॉझिटिव्ह सापडली असून, तिने म्हटले आहे की, काही दिवसांपूर्वी कोरोना लशीचा पहिला डोस घेतला होता. मला त्रास होऊ लागल्याने मी कोरोना चाचणी केली होती ती पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे मी घरातच विलगीकरणात आहे. पहिला डोस घेतला म्हणून तुम्हालास संसर्ग होणारच नाही असे नाही. तुम्हाला सर्व काळजी ही घ्यावी लागणारच आहे.
1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्वांना कोरोना लस दिली जात आहे. यासाठी सरकारने नोंदणीचे दोन पर्याय ठेवले आहेत. यासाठी सरकारी को-विन अॅपवर ऑनलाइन नोंदणी करण्याचा पहिला पर्याय आहे. दुसरा पर्याय हा प्रत्यक्ष लसीकरण केंद्रावर जाऊन नोंदणी करण्याचा असेल. मात्र, प्रत्यक्ष नोंदणीसाठी नागरिकांना दुपारी 3 वाजल्यानंतर लसीकरण केंद्रावर जावे लागेल.
जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरणास भारतात 16 जानेवारीला सुरवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले होते. सरकारने लस देण्याचा प्राधान्यक्रम ठरवला आहे. यातील पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, कोरोनाच्या आघाडीवर लढणारे पोलीस, नागरी सुरक्षा कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारी यांचा समावेश होता.
लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ही लस 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना देण्यात आली. तसेच, मधुमेह आणि उच्च रक्तदाबासह इतर आजार असलेल्या 45 वर्षांवरील रुग्णांनाही लस दिली गेली. तिसऱ्या टप्प्यात १ एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना ही लस दिली जात आहे. सरकारी रुग्णालयात ही लस मोफत देण्यात येत आहे. मात्र, खासगी रुग्णालयात यासाठी 250 रुपये मोजावे लागत होते. सरकारने आता ही किंमत कमी करुन 200 रुपयांवर आणली आहे.
देशात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लशींचा वापर लसीकरणासाठी होत आहे. यातील कोव्हिशिल्डच्या दोन डोसमधील अंतर सरकारने वाढवून 6 ते 8 आठवडे केले आहे. याआधी या दोन्ही लशींसाठी दोन डोसमधील अंतर 4 आठवडे होते. त्यामुळे आधी पहिला डोस घेतल्यानंतर दुसऱ्या डोससाठी नोंदणी आपोआप होत होती. आता दोन्ही लशींच्या दोन डोसमधील अंतर वेगवेगळे असल्याने आपोआप नोंदणी बंद करण्यात आली आहे. नागरिकांना पहिला डोस घेतल्यानंतर त्यांना पुन्हा दुसऱ्या डोससाठी नोंदणी करावी लागेल.
सिरम इन्स्टिट्यूट ही कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचे उत्पादन करीत आहे. ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केली आहे. दुसरी लस ही भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही आहे. सध्या दोन कोरोना लशी उपलब्ध असून, आणखी सात कोरोना लशींवर काम सुरू असल्याचे सरकारने नुकतेच जाहीर केले होते.
Edited by Sanjay Jadhav

