काहीही बोलण्याचे स्वातंत्र्य अर्णब गोस्वामींना असेल तर कुणाल कामरांना का नाही? - actor targets arnab goswami and supports kunal kamra | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

काहीही बोलण्याचे स्वातंत्र्य अर्णब गोस्वामींना असेल तर कुणाल कामरांना का नाही?

वृत्तसंस्था
सोमवार, 16 नोव्हेंबर 2020

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेच्या मुद्द्यावरुन गदारोळ सुरू आहे. गोस्वामी यांच्या जामिनाबद्दल प्रश्न विचारणारे स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा आता अडचणीत आले आहेत. 
 

मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेच्या मुद्द्यावरुन मोठा गदारोळ सुरू होता. अखेर सर्वोच्च न्यायालयाने गोस्वामी यांना अंतरीम जामीन मंजूर केला होता. गोस्वामी यांच्या जामिनाबद्दल प्रश्न विचारणारे स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांना न्यायालयाच्या अवमान कारवाईला सामोरे जावे लागत आहे. कामरा यांच्या पाठीशी आता बॉलीवूडमधील अभिनेते उभे राहिले असून, त्यांनी या कारवाईबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत. 

गोस्वामी यांना ४ नोव्हेंबरला अटक झाली होती. न्यायालयाने गोस्वामी यांची रवानगी १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत केली होती. न्यायालयीन कोठडीमुळे गोस्वामी यांना तळोजा कारागृहात ठेवण्यात आले होते. गोस्वामी यांनी अटकेला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाने ९ नोव्हेंबरला गोस्वामी यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. 

याप्रकरणी गोस्वामी यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. अखेर सर्वोच्च न्यायालयाने गोस्वामी यांना अंतरीम जामीन मंजूर केला होता. न्यायालयाच्या आदेशाचे पालन करीत गोस्वामी यांची तातडीने सुटका होईल हे पाहण्याचे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने पोलीस आयुक्तांना दिले होते. गोस्वामी यांची ११ नोव्हेंबरला रात्री तळोजा कारागृहातून सुटका करण्यात आली होती. सात दिवसांच्या न्यायालयीन कोठडीनंतर गोस्वामी यांची सुटका झाली होती. 

गोस्वामी यांना मिळालेल्या जामिनावर कुमाल कामरा यांनी प्रश्न उपस्थित केले होते. त्यामुळे त्यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई सुरू झाली आहे. यावरुन अभिनेते कमाल खान यांनी म्हटले आहे की, कुणाल कामरा यांनी सिद्ध केले आहे की ते एक शूर व्यक्ती आहेत. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, ट्विट डिलिट करणार नाही तसेच, दंडही भरणार नाही. माझ्या मते ते १०० टक्के बरोबर आहेत. अर्णब गोस्वामी यांना वाटेल ते बोलण्याचे स्वातंत्र्य असेल तर कुणाल कामरांना ते स्वातंत्र्य का नाही?

इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक व त्यांची आई कुमुद नाईक यांच्या २०१८ मध्ये झालेल्या मृत्युप्रकरणी रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना बुधवारी (ता.4) महाराष्ट्र पोलिसांनी अटक केली होती. इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक व त्यांच्या मातोश्री कुमुद नाईक हे दोघे २०१८ मध्ये अलिबाग येथे मृतावस्थेत सापडले होते. या दोघांनीही आत्महत्या केली होती. 

पोलिसांना त्यावेळी अन्वय यांनी लिहिलेली चिठ्ठी सापडली होती. अर्णब गोस्वामी व अन्य दोघांनी आपणास व्यवहाराचे ५ कोटी ४० लाख रुपये न दिल्याने आपण आर्थिक अडचणीत आलो असून, त्यामुळे आत्महत्या करावी लागत असल्याचे या चिठ्ठीत म्हटले होते. त्यावेळी पोलिसांनी अर्णब यांच्या विरोधात अन्वय व त्यांच्या आईला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला होता. ही फाईल नंतर बंद करण्यात आली. आता पुन्हा या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख