मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्जच्या अँगलचा तपास करणाऱ्या अमली पदार्थ विरोधी विभागाने (एनसीबी) सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांना अटक केली होती. दोघेही सध्या जामिनावर बाहेर आहेत. आता चौकशीसाठी बोलावलेला सुशांतचा मित्र अचानक गायब झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
'एनसीबी'कडून रिया आणि तिचा भाऊ शौविक यांची चौकशी झाली होती. ड्रग्ज रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या बॉलीवूडमधील काही कलाकारांची नावे या दोघांनी उघड केली होती. बॉलीवूडमधील पार्ट्या आणि ड्रग्जची तस्करी यावरही या दोघांनी प्रकाश पाडला होता. या प्रकरणी अभिनेत्री रकुल प्रीत सिंह, सारा अली खान, दीपिका पदुकोण आणि श्रद्धा कपूर यांच्यासह काही जणांची एनसीबीने चौकशी केली आहे.
उच्च न्यायालय म्हणाले, सुशांत हा तर निष्पाप अन् अतिशय चांगला माणूस दिसत होता...
सुशांतचा मित्र असलेला सहाय्यक दिग्दर्शक ऋषिकेश पवार याला एनसीबीने चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, तो कालपासून गायब गायब झाला आहे. एनसीबीची पथके त्याचा शोध घेत आहेत. चौकशीसाठी समन्स बजावल्यानंतर पवार हा गायब झाल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
एनसीबीच्या पथकांनी मुंबईत आज काही ठिकाणी छापे टाकून पवारचा शोध घेतला. याविषयी एनसीबीचे अधिकारी म्हणाले की, आम्ही पवारला चौकशीसाठी समन्स बजावले होते. त्याने काल (ता.7) चौकशीसाठी हजर राहणे अपेक्षित होते. मात्र, तो चौकशीसाठी हजर न होता गायब झाला आहे. त्याचा शोध आमची पथके घेत आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी एनसीबीने अभिनेता अर्जुन रामपाल याची चौकशी केली होती. त्याआधी त्याची मैत्रीण गॅब्रिएला डिमेट्रिड्स हिची चौकशी करण्यात आली होती. आता एनसीबीने अर्जुन रामपालच्या बहिणीला चौकशीसाठी समन्स बजावले आहे.
रियाला एनसीबीने 6 सप्टेंबरला अटक केली होती. शौविक आणि सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युएल मिरांडा यांना एनसीबीने 4 सप्टेंबरला अटक केली होती. न्यायालयाने रियाची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली होती. ती भायखळा कारागृहात तर, शौविक हा तळोजा कारागृहात होता. रिया आणि शौविक यांच्या वतीने त्यांचे वकील सतिश मानेशिंदे यांनी उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केले होते.
उच्च न्यायालयाने 10 ऑक्टोबरला रियाला जामीन मंजूर केला होता मात्र, शौविकचा जामीन फेटाळला होता. रियाला अटक झाल्यानंतर महिनाभराने तिची सुटका झाली होती. अखेर शौविक याला विशेष न्यायालयाने 2 डिसेंबरला जामीन मंजूर केला होता. सुमारे तीन महिन्यानंतर शौविकला जामीन मिळाला होता.
रियावर अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा (एनडीपीएस) कलम 8 (सी), 20 (बी), 28 आणि 29 नुसार ड्रग्जचे खरेदी, सेवन, बाळगणे आदी आरोप तिच्यावर ठेवण्यात आले आहेत. रिया ही ड्रग्ज रॅकेटची सक्रिय सदस्य असून, तिने अमली पदार्थांचे सेवन केले आहे आणि ती यातील आर्थिक व्यवहारांमध्येही सहभागी होता, असे एनसीबीने म्हटले होते.
सुशांत हा 14 जूनला मुंबईतील घरी मृतावस्थेत सापडला होता. याचा तपास मुंबई पोलिस करीत होते. या प्रकरणी पोलिसांनी 56 जणांचे जबाब नोंदविले होते. यात सुशांतचे कुटुंबीय, त्याचे मित्र, अभिनेत्री रिया चक्रवर्ती यांच्यासह इतर काही जणांचा समावेश होता. नंतर सर्वोच्च न्यायालयाने हा तपास सीबीआयकडे दिला होता.
Edited by Sanjay Jadhav

