भाजपला बालेकिल्ल्यातच 'शॉटगन'च्या पुत्राचे आव्हान - actor shraghna sinhas son luv is fighting in bjp bastion in bihar | Politics Marathi News - Sarkarnama

भाजपला बालेकिल्ल्यातच 'शॉटगन'च्या पुत्राचे आव्हान

वृत्तसंस्था
शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2020

बिहारमधील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीच्या रिंगणात अनेक जणांची राजकीय कारकिर्द सुरू होत आहे.  

पाटणा : बिहारच्या निवडणुकीत भाजप सोडून काँग्रेसवासी झालेले ज्येष्ठ अभिनेते शॉटगन शत्रुघ्न सिन्हा हे स्टार प्रचारक आहेत. याचवेळी सिन्हा यांचे पुत्र लव हे राजकीय इनिंग सुरू करीत आहेत. पाटण्यातील बांकीपूर मतदारसंघातून भाजपला लव हे आव्हान देत आहेत. भाजपचा हा बालेकिल्ला असून, येथे हॅटट्रिक करण्याच्या भाजपचा मनसुबा लव हे मोडून काढतात का याची उत्सुकता लागली आहे. 

शत्रुघ्न सिन्हा यांनी काँग्रेसच्या तिकिटावरुन पाटणा साहिब मतदारसंघातून गेल्या वर्षी लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता. त्याआधी 2009 आणि 2014 मध्ये सिन्हा हे भाजपकडून या मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना  विरोध करीत त्यांनी भाजप सोडली होती. भाजप हा 'वन मॅन शो आणि टू मॅन आर्मी' बनला आहे, अशी टीका त्यांनी केली होती. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 

आता शत्रुघ्न यांचे पुत्र लव हे पाटण्यातील बांकापूर मतदारसंघातून उभे आहेत. त्यांची अभिनय कारकिर्द फारशी चमकदार राहिली नाही. त्यामुळे ते आता राजकीय इनिंग सुरु करीत आहेत. भाजपला बालेकिल्ल्यातच त्यांनी आव्हान दिले असून, त्यांची राजकीय इनिंग यशस्वीपणे सुरू होणार की सुरू होण्याआधीच संपणार याची उत्सुकता आहे. 

या मतदरासंघात भाजपचे नितीन नबीन हे आमदार आहेत. नबीन हे 40 वर्षांचे आहेत. ते येथून हॅटट्रिक करण्याच्या प्रयत्नात आहेत. ते भारतीय जनता युवा मोर्चाचे राज्य अध्यक्ष आहेत. याचबरोबर नुकतीच पक्षाने त्यांच्यावर सिक्कीमच्या प्रभारीपदाची जबाबदारी सोपविली आहे. यामुळे येथील लढत लक्षवेधी ठरली आहे. 

बिहार विधानसभेची निवडणूक तीन टप्प्यांत होत आहे. यातील पहिला टप्पा २८ ऑक्टोबरला झाला असून, यात ७१ मतदारसंघ होते. दुसरा टप्पा  ३ नोव्हेंबरला असून, यात ९४ मतदारसंघ आहेत. तिसरा टप्पा ७ नोव्हेंबर असून, यात ७८ मतदारसंघ आहेत. निकाल १० नोव्हेंबरला जाहीर होणार आहेत. बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत सत्तारुढ संयुक्त जनता दल (जेडीयू) आणि भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (एनडीए) राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), काँग्रेस आणि डावे यांची महाआघाडी असे चित्र आहे. 

एनडीएमधून लोक जनशक्ती पक्ष (एलजेपी) बाहेर पडला आहे. चिराग पासवान यांनी राष्ट्रीय स्तर आणि लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत राहण्याची भूमिका घेतली आहे. परंतु, बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पातळीवर जेडीयूसोबत वैचारिक मतभेद असल्याचे कारण देत स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.  

बिहारमधील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) आणि महाआघाडीला टक्कर देण्यासाठी ग्रँड डेमोक्रॅटिक सेक्युलर फ्रंट स्थापन करण्यात आला आहे. राष्ट्रीय लोक समता पक्षाचे उपेंद्र कुशवाह हे फ्रंटचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार आहेत. यात ओवेसी यांचा ऑल  इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुसलमीन (एआयएमआयएम), मायावती यांचा बहुजन समाज पक्ष (बसप), सुहेलदेव भारतीय समाज पार्टी, सामाजिक जनता दल (डेमोक्रॅटिक) आणि जनतांत्रिक पार्टी (सोशालिस्ट) समावेश आहे. 

Edited by Sanjay Jadhav 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख