शत्रुघ्न सिन्हांचा मुलगा राजकारणात...बिहारमधून इनिंग सुरु करणार

बिहारमधील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या प्रचाराला वेग आला आहे.
actor shatrughna sinhas son luv will be congress candidate in bihar election
actor shatrughna sinhas son luv will be congress candidate in bihar election

पाटणा : ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजपला रामराम करीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेसने त्यांना बिहारमध्ये स्टार प्रचारक म्हणून प्रचारात उतरवले आहे. आता त्यांचा मुलगा बिहारमधून राजकीय इनिंग सुरु करीत आहे. त्याला काँग्रेसकडून विधानसभेचे तिकिट मिळणे नक्की मानले जात आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

बिहार विधानसभेची निवडणूक तीन टप्प्यांत होत आहे. पहिला टप्पा २८ ऑक्टोबरला होणार असून, यात ७१ मतदारसंघ आहेत. दुसरा टप्पा  ३ नोव्हेंबरला असून, यात ९४ मतदारसंघ आहेत. तिसरा टप्पा ७ नोव्हेंबर असून, यात ७८ मतदारसंघ आहेत. निकाल १० नोव्हेंबरला जाहीर होणार आहेत. बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत सत्तारुढ संयुक्त जनता दल (जेडीयू) आणि भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (एनडीए) राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), काँग्रेस आणि डावे यांची महाआघाडी असे चित्र आता स्पष्ट झाले आहे. 

एनडीएमधून लोक जनशक्ती पक्ष (एलजेपी) बाहेर पडला आहे. चिराग पासवान यांनी राष्ट्रीय स्तर आणि लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत राहण्याची भूमिका घेतली आहे. परंतु, बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पातळीवर जेडीयूसोबत वैचारिक मतभेद असल्याचे कारण देत स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.  

शत्रुघ्न सिन्हा हे स्वत: पाटणासाहिबमधून लोकसभा सदस्य होते. आता त्यांचे पुत्र लव सिन्हा यांना मैदानात उतरवले जाणार आहेत. शत्रुघ्न सिन्हा यांच्या लव आणि कुश ही दोन जुळी मुले आहेत. लव यांनी आधी बॉलीवू़डमध्येही पदार्पण केले होते. त्यांनी सदिया या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवले होते. त्यानंतर त्यांनी जे.पी.दत्ता यांच्या पलटण या चित्रपटातही अभिनय केला होता. मात्र, त्यांची अभिनय कारकिर्द फारशी बहरली नाही. 

राजधानी पाटण्यातील मतदारसंघातून त्यांना उभे केले जाण्याची शक्यता आहे. ते बांकीपूर विधानसभा मतदारसंघातून रिंगणात उतरण्याची शक्यता अधिक आहे. मतदारसंघ पुनर्रचनेत हा मतदारसंघ 2009 मध्ये निर्माण झाला होता. या मतदारसंघावर भाजपचे नितीन नवीन यांचे मागील दशकभरापासून वर्चस्व आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

बिहारमधील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) आणि महाआघाडीला टक्कर देण्यासाठी ग्रँड डेमोक्रॅटिक सेक्युलर फ्रंट स्थापन करण्यात आला आहे. राष्ट्रीय लोक समता पक्षाचे उपेंद्र कुशवाह हे फ्रंटचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार आहेत. यात ओवेसी यांचा ऑल  इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुसलमीन (एआयएमआयएम), मायावती यांचा बहुजन समाज पक्ष (बसप), सुहेलदेव भारतीय समाज पार्टी, सामाजिक जनता दल (डेमोक्रॅटिक) आणि जनतांत्रिक पार्टी (सोशालिस्ट) समावेश आहे. 

Edited by Sanjay Jadhav 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com