सुशांत प्रकरणात आता रितेश देशमुखची उडी...रिया चक्रवर्तीला म्हणाला... - actor ritesh deshmukh supports actress rhea chakraborty | Politics Marathi News - Sarkarnama

सुशांत प्रकरणात आता रितेश देशमुखची उडी...रिया चक्रवर्तीला म्हणाला...

वृत्तसंस्था
मंगळवार, 13 ऑक्टोबर 2020

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचे कोडे तीन केंद्रीय तपास यंत्रणांना अद्याप सोडवता आलेले नाही. या प्रकरणावरुन आरोप-प्रत्यारोप मात्र, सुरूच आहेत.  

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याचा मृत्यू होण्याच्या एक दिवस आधी रिया चक्रवर्तीला तो भेटला होता, असा दावा रियाच्या शेजारणीने केला होता. मात्र, केंद्रीय अन्वेषण विभागाने केलेल्या चौकशीत या शेजारणीने घूमजाव केले होते. सीबीआयनेही तिला तंबी देऊन सोडून दिले होते. आता या महिलेवर कायदेशीर कारवाई करावी, अशी लेखी तक्रार रियाने पोलीस अधीक्षकांना दिली होती. आता या प्रकरणात अभिनेता रितेश देशमुख याने उडी घेतली आहे. 

सुशांतच्या मृत्यूच्या एक दिवस आधी 13 जूनला तो रियाला सोडण्यासाठी आला होता, असा दावा रियाच्या शेजारी राहणाऱ्या डिंपल थवानी यांनी केला होता. त्यांनी अनेक वृत्तवाहिन्यांशी बोलताना हा दावा केला होता. रियाच्या घरी तपासासाठी गेलेल्या सीबीआयच्या पथकाने थवानी यांची भेटही घेतली. सीबीआयने अखेर त्यांची या प्रकरणी चौकशी केली. या चौकशीत त्यांनी घूमजाव करीत असे काही पाहिले नसल्याचे म्हटले होते. 

आता या प्रकरणी रियाने सीबीआयच्या पोलीस अधीक्षकांना पत्र लिहिले आहे. तिने पत्रात म्हटले आहे की, डिंपल थवानी हिने माझ्याविरोधात खोटे आणि निराधार आरोप केले आहेत. या खोट्या आरोपांमुळे तपासाची दिशा भरकटू शकते हे माहिती असूनही तिने हे केले आहे. त्यामुळे तिच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे पाऊल उचलावे.  

रिया चक्रवर्ती हिच्याबद्दल टीव्ही आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये खोटे आणि बनावट दावे करणाऱ्या व्यक्तींचा यादी सीबीआयकडे पाठवण्यात येणार आहे. या प्रकरणाच्या तपासाबद्दल खोटी पसरवणाऱ्यांवर सीबीआयने कायदेशीर कारवाई करावी, असे रियाचे वकील सतिश मानेशिंदे यांनी म्हटले आहे. रिया चक्रवर्तीबद्दल खोटी माहिती पसरवणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांचे जबाबही सीबीआयने नोंदवावेत, असेही मानेशिंदे यांनी म्हटले आहे. 

रितेश देशमुख याने आज या प्रकरणी ट्विटरवर भूमिका मांडली आहे. त्याने रियाला पाठिंबा दिला आहे. त्याने म्हटले आहे की, रिया तुला या लढ्यात आणखी ताकद मिळो. सत्यापेक्षा अधिक ताकदवान काहीही नसते. 

सुशांत मृत्यू प्रकरणात ड्रग्जच्या अँगलचा तपास करणाऱ्या अमली पदार्थ विरोधी विभागाने (एनसीबी) सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती हिला 6 सप्टेंबरला अटक केली होती. उच्च न्यायालयाने रियाला जामीन मंजूर केला आहे. 'एनसीबी'कडून रिया आणि तिचा भाऊ शौविक यांची चौकशी झाली होती. ड्रग्ज रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या बॉलीवूडमधील काही कलाकारांची नावे या दोघांनी उघड केली होती. बॉलीवूडमधील पार्ट्या आणि ड्रग्जची तस्करी यावरही या दोघांनी प्रकाश पाडला होता. या प्रकरणी अभिनेत्री रकुल प्रीत सिंह, सारा अली खान, दीपिका पदुकोण आणि श्रद्धा कपूर यांच्यासह काही जणांची एनसीबीने चौकशी केली आहे. 

सुशांत हा 14 जूनला मुंबईतील घरी मृतावस्थेत सापडला होता. याचा तपास मुंबई पोलिस करीत होते. या प्रकरणी पोलिसांनी 56 जणांचे जबाब नोंदविले होते. यात सुशांतचे कुटुंबीय, त्याचे मित्र, अभिनेत्री रिया चक्रवर्ती यांच्यासह इतर काही जणांचा समावेश होता. नंतर सर्वोच्च  न्यायालयाने हा तपास सीबीआयकडे दिला होता. 

Edited by Sanjay Jadhav 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख