actor mithun chakraborty denied ticket by bjp in west bengal
actor mithun chakraborty denied ticket by bjp in west bengal

मुंबईतील मतदार यादीतलं नाव रद्द करुन बंगालमध्ये नोंदवलं, भाजपमध्ये प्रवेशही केला पण...

ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी मोठा गाजावाजा करीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. पण त्यांच्या पदरी निराशा आली आहे.

कोलकता : भाजपने पश्चिम बंगाल विधानसभेसाठी उमेदवारांची शेवटची यादी जाहीर केली आहे. ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी मोठा गाजावाजा करीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. परंतु, त्यांना विधानसभेचे तिकिटच मिळाले नाही. दरम्यान, मिथुन यांनी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी मुंबईतील मतदार यादीतून नाव काढून पश्चिम बंगालमध्ये नाव नोंदवल्याची बाब समोर आली आहे. 

भाजपने आज 13 उमेदवारांची यादी जाहीर केली. ही भाजपची शेवटची यादी मानली जात आहे. मिथुन यांच्यासाठी रासबिहारी हा मतदारसंघ राखीव ठेवला जाईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. परंतु, भाजपने लेफ्टनन्ट जनरल (निवृत्त) सुब्रत साहा यांनी तेथून उमेदवारी दिली आहे. काश्मीरमधील संघर्षाच्या काळात साहा तेथे नियुक्तीस होते. यामुळे मिथुन हे विधानसभा निवडणूक लढणार नसल्याचे समोर येत आहे. 

मिथुन यांचे मुंबईतील मतदार यादीत नाव होते. हे नाव रद्द करुन त्यांनी पश्चिम बंगालमध्ये नोंदवले होते. तेव्हापासून मिथुन यांच्या दुसऱ्या राजकीय इनिंगची उत्सुकता होती. त्याप्रमाणे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता त्यांना तिकिट मिळाले नसले तरी अखेरची क्षणी काही चक्रे फिरतील, एवढीच एकमेव आशा त्यांच्यासाठी आहे. कारण आधी जाहीर झालेल्या उमेदवार बदलण्याचे प्रकार भाजपकडून बंगालमध्ये सुरू आहेत. त्यामुळे एखादा उमेदवार बदलून मिथुन यांना तिकिट मिळू शकते, ही शक्यताही नाकारता येत नाही. असे असले तरी मिथुन हे भाजपच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेणार आहेत. भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांच्या नंदिग्राम मतदारसंघात ते 30 मार्चला प्रचार करणार आहेत. त्यांच्यासोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हेसुद्धा उपस्थित असणार आहेत. 

ब्रिगेड मैदानावर मिथून चक्रवर्ती यांनी नुकताच भाजपमध्ये अधिकृतपणे प्रवेश केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईतील घरी जाऊन मिथुन चक्रवर्ती यांची भेट घेतली होती. तेव्हाच मिथुन यांच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे औचित्य साधून मिथुन यांनी पक्षप्रवेश केला होता. 

दरम्यान, मिथुन चक्रवर्ती यांची राजकीय वाटचाल 2014 मध्ये सुरूच झाली होती. ममता बॅनर्जी यांनी 2011 मध्ये 34 वर्षांचा डाव्या पक्षांचा गड उध्वस्त करत राज्यात तृणमूलची सत्ता आणली. यावेळी बंगालमध्ये ममतादीदींची लोकप्रियता खूप वाढली होती. सत्तेत आल्यानंतर ममतांनी मिथुन चक्रवर्ती यांना राजकारणात येण्याचे आमंत्रण दिले. ममतादीदींची लोकप्रियता पाहून मिथुन यांनी हे आमंत्रण स्वीकारत राजकारणात प्रवेश केला. त्यांना लगेच राज्यसभेचे तिकीटही मिळाले. तृणमूलकडून राज्यसभा खासदार म्हणून ते निवडून गेले. पण केवळ अडीच वर्ष ते खासदार राहिले. या अडीच वर्षांच्या काळात केवळ तीन दिवस ते संसदेत उपस्थित होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com