आणखी एका बिहारी अभिनेत्याची मुंबईत आत्महत्या...कुटुंबीय म्हणतात हत्याच

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणावरुन उठलेला गदारोळ अद्याप कायम आहे. यातच आणखी एका बिहारी अभिनेत्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
Actor from Bihar Akshat Utkarsh dies by suicide in Mumbai
Actor from Bihar Akshat Utkarsh dies by suicide in Mumbai

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचे गूढ साडेतीन महिन्यांनंतरही तीन केंद्रीय तपास यंत्रणांना उकलता आले नाही. सुशांतनंतर आता आणखी एका बिहारी अभिनेत्याने मुंबईत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अक्षत उत्कर्ष असे या अभिनेत्याचे नाव असून, त्याच्या कुटुंबीयांनी मात्र, त्याची हत्या झाल्याचा दावा केला आहे. यामुळे आणखी एका अभिनेत्याच्या मृत्यू प्रकरणी वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. 

अभिनेता अक्षत उत्कर्ष हा अंधेरीतील गोकुळधाम सोसायटीत राहत होता. तो या सोसायटीतील फ्लॅटमध्ये भाड्याने राहत होता. फ्लॅटमध्ये रविवारी (ता.27) रात्री गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला. त्याने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करुन पोलिसांनी तो त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिला होता. अक्षत हा मूळचा मुझफ्फरपूरमधील सिकंदरपूरमधील आहे. त्याच्यावर सिकंदरपूरमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. 

आता अक्षतचे वडील विजयंत कुमार यांनी या प्रकरणी खळबळजनक आरोप केले आहेत. त्यांनी अक्षतने आत्महत्या केली हे मानण्यास नकार दिला आहे. अक्षतसोबत त्याच्या फ्लॅटमध्ये राहणारी नोएडा येथील एक तरुण आणि इतर काही जणांवर त्यांनी आरोप केले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, अक्षतची हत्या करण्यात आली असून, त्याची आत्महत्या असल्याचे भासवण्यात येत आहे. 

या प्रकरणी अक्षतच्या कुटुंबीयांनी अद्याप पोलिसांकडे तक्रार दिलेली नाही. अक्षत हा 2018 पासून अंधेरीत राहत होता. तेव्हापासून तो चित्रपटांत काम करीत होता. त्याच्या नवीन भोजपुरी चित्रपटाचे चित्रीकरण 3 ऑक्टोबरपासून सुरू होणार होते. याचबरोबर त्याचे एका अल्बमवरही काम सुरू होते. 

अक्षतचे मामा रणजितसिंह यांनी म्हटले आहे की, अक्षत रविवारी रात्री 9 वाजता त्याच्या वडिलांशी मोबाईलवर बोलला होता. त्यावेळी तो तणावात होता. त्याने एक तासाने कॉल करण्यास सांगितले होते. त्याच्या वडिलांनी पुन्हा कॉल केला त्यावेळी त्याने कॉल उचलला नाही. त्यानंतर रात्री अकराच्या सुमारास एका तरुणीने अक्षतच्या एका नातेवाईकाला कॉल करुन त्याच्या आत्महत्येची माहिती दिली होती. 

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागासोबत (सीबीआय)  सक्त वसुली संचालनालय (ईडी) आणि अमली पदार्थ विरोधी पथक (एनसीबी) करीत आहे. सुशांत हा 14 जूनला मुंबईतील घरी मृतावस्थेत सापडला होता. याचा तपास मुंबई पोलिस करीत होते. या प्रकरणी पोलिसांनी 56 जणांचे जबाब नोंदविले होते. यात सुशांतचे कुटुंबीय, त्याचे मित्र, अभिनेत्री रिया चक्रवर्ती, कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांच्यासह इतर काही जणांचा समावेश होता. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com