चंद्राबाबू रडले अन् बालकृष्ण, ज्युनिअर एनटीआर संतापले!

माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे पत्रकार परिषद सुरू असतानाच ढसाढसा रडू लागले होते.
Chandrababu Naidu, Actor Balakrishna and Jr NTR
Chandrababu Naidu, Actor Balakrishna and Jr NTR Sarkarnama

अमरावती (आंध्र प्रदेश) : तेलगू देसम पक्षाचे (TDP) अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) हे नुकतेच भावूक झाले होते. पत्रकार परिषद सुरू असतानाच ते ढसाढसा रडू लागले होते. विधानसभेत वायएसआर काँग्रेसच्या (YSR Congress) सदस्यांनी केलेल्या व्यक्तिगत टीकेमुळे व्यथित झालेल्या नायडूंना भावनांचा बांध आवरता आला नव्हता. यामुळे एनटीआर (NTR) कुटुंबातील प्रसिद्ध अभिनेते बालकृष्ण (Balakrishna) आणि ज्युनिअर एनटीआर (Jr NTR) हे संतापले आहेत.

दिवंगत अभिनेते टीडीपीचे संस्थापक व माजी मुख्यमंत्री एन.टी.रामा राव यांच्या कुटुंबातील बालकृष्ण आणि ज्युनिअर एनटीआर आहेत. चंद्राबाबून नायडू हे एनटीआर यांचे जावई आहेत. नायडूंच्या पत्नी भुवनेश्वरी यांच्यावर म्हणजेच एनटीआर कुटुंबातील सदस्यांवर विधानसभेत आरोप झाल्याने बालकृष्ण आणि ज्युनिअर एनटीआर हे वायएसआर काँग्रेसच्या आमदारांवर भडकले आहेत.

बालकृष्ण म्हणाले की, वायएसआर काँग्रेसच्या आमदारांनी माझ्या बहिणीवर चिखलफेक केली आहे. त्यांनी अतिशय घाणेरडी भाषा वापरली आहे. त्यांचे हे वर्तन पाहता ती विधानसभा आहे की जनावरांचा गोठा हेच कळत नाही. टीडीपीचे नेते आणि कार्यकर्ते मात्र, सभ्यपणे वागताना दिसत आहेत.

ज्युनिअर एनटीआर यांनीही एक व्हिडीओ शेअर करून वायएसआर काँग्रेसला फटकारले आहे. त्यांनी म्हटले आहे की, विधानसभेतील घटनेमुळे मी अतिशय व्यथित झालो आहे. जनतेचे मुद्दे बाजूला ठेवून एखाद्या महिलेबद्दल असभ्य शेरेबाजी करणे हे अराजकाचे निदर्शक आहे. अशा प्रकारे महिलांचा अनादर करणारे वर्तन तातडीने थांबायला हवे.

विधानसभेत 19 नोव्हेंबरला सत्ताधारी वायएसआर काँग्रेस आणि विरोधी पक्ष टीडीपीमध्ये जोरदार खडाजंगी झाली. कृषी क्षेत्रावरील चर्चेवेळी हे रणकंदन झाले. नायडू यांच्या पत्नीबाबत वायएसआर काँग्रेसच्या नेत्यांनी अपशब्द वापरले. नायडू हे बोलत असतानाच त्यांचा माईक बंद करण्यात आला. अखेर अपमान सहन न झाल्याने नायडूंनी मुख्यमंत्री होईपर्यंत विधानसभेत पुन्हा पाऊल न टाकण्याची प्रतिज्ञा केली.

Chandrababu Naidu, Actor Balakrishna and Jr NTR
निवृत्ती आठवड्यावर आली अन् मुख्य सचिव कुंटेंना मुदतवाढ मिळाली

यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना नायडूंना अश्रू अनावर झाले होते. ते म्हणाले होते की, आता सहन होत नाही. मागील अडीच वर्षे मी सगळे काही सहन करीत होतो परंतु, मी शांत होतो. आज त्यांनी माझ्या पत्नीलाच लक्ष्य केले. मी कायम सन्मानाने जगलो असून, सन्मानासाठी जगलो आहे. आता हे सहन करण्यापलिकडे गेले आहे.

Chandrababu Naidu, Actor Balakrishna and Jr NTR
चांदीवाल समितीसमोर सचिन वाझे म्हणाला, मी तर फक्त एक छोटे प्यादे...

मागील आठवड्यात नायडू यांना त्यांच्याच चित्तूर जिल्ह्यात मोठा धक्का बसला होता. जिल्ह्यातील कूप्पम महापालिकेत पहिल्यांदाच टीडीपीचा पराभव झाला आहे. वायएसआर काँग्रेसने 25 पैकी 19 वॉर्ड जिंकले होते. याचबरोबर राज्यात आधी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही नायडूंना मोठा फटका बसला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com