कोरोनाऐवजी रेबीजची लस; एकाची बदली, दुसऱ्याची हकालपट्टी तर तिसरा निलंबित

देशात कोरोना संसर्गाची दुसरी लाट आली असून, सरकारने लसीकरणाचा वेग वाढवला आहे. यातच एका रुग्णालयात कोरोना लशीऐवजी तीन महिलांना रेबीजची लस देण्यात आली होती.
action taken against three health care workers in up for giving rabies vaccine
action taken against three health care workers in up for giving rabies vaccine

लखनौ : देशभरात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेतील तिसरा टप्पा सुरू आहे. ठिकठिकाणी लसीकरण केंद्रांची उभारणी करून नागरिकांना लस उपलब्ध करून दिली जात आहे. पण या लसीकरण मोहिमेमध्ये अनेकदा गंभीर त्रुटी असल्याचेही समोर आले आहे. उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यात तीन महिलांना कोरोनाऐवजी रेबीजची लस देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. यातील दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाईची कुऱ्हाड चालवण्यात आली आहे. 

शामली जिल्ह्यातील कांधला येथील सार्वजनिक आरोग्य केंद्रांमध्ये कोरोना लस घेण्यासाठी गेलेल्या तीन महिलांना अँटी रेबीज लस देण्यात आली होती. याबाबतची तक्रार थेट मुख्यमंत्री कार्यालयाकडे करण्यात आली होती. या तिन्ही महिला ज्येष्ठ असल्याने त्यातील एका महिलेला ही लस घेतल्यानंतर अचानक त्रास सुरू झाला होता. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला होता.

तिघींनी आरोग्य केंद्रावर लशीचा डोस घेतल्यानंतर त्या घरी गेल्या होत्या. त्यातील एका 70 वर्षीय महिलेला अचानक चक्कर आली होती. नातेवाईकांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेले. तेथील डॅाक्टरांनी लसीबाबत माहिती विचारल्यानंतर त्यांना आरोग्य केंद्रातून दिलेली चिठ्ठी दाखविण्यात आली. त्यावर अँटी रेबीज लस लिहिल्याचे पाहून त्यांना धक्का बसला. त्यानंतर या महिलेसोबत लस घेण्यासाठी गेलेल्या इतर दोन महिल्यांकडील चिठ्ठीही पाहण्यात आली. त्यावरही रेबीजची लस दिल्याचे म्हटले होते. 

जिल्हाधिकारी जसजीत कौर यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते. दोन अधिकारी आज रुग्णालयात जाऊन चौकशी करतील. संबंधित तिन्ही महिलांचे तसेच तेथील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे जबाब घेतले जातील. यामध्ये जे दोषी आढळतील, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले होते. 

चौकशीत दोषी आढळलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. आरोग्य केंद्राचे प्रभारी रामबीरसिंह यांची बदली करण्यात आली आहे. एका कर्मचाऱ्याची हकालपट्टी करण्यात आली असून, दुसऱ्या एका कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतचा आदेश काढला आहे. या घटनेला कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा कारणीभूत ठरल्याचे अहवालात म्हटले आहे. 

 Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com