बाप रे...भारतात दर 15 पैकी एकाला कोरोना! - According to second sero survey one in 15 indians exposed to covid19 in august | Politics Marathi News - Sarkarnama

बाप रे...भारतात दर 15 पैकी एकाला कोरोना!

मंगेश वैशंपायन
मंगळवार, 29 सप्टेंबर 2020

देशातील कोरोनाचा कहर वाढत चालला असून, कोरोना रुग्णांच्या संख्येने 60 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. आता आरोग्य मंत्रालयाच्या माहितीतून आणखी धक्कादायक बाब समोर आली आहे.

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा कहर सुरू असून, रुग्णसंख्या विक्रमी वेगाने वाढत आहे. सध्या दर 15 पैकी एक भारतीयाला कोरोनाचा संसर्ग झाला असावा, असे निरीक्षण भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) नोंदवले आहे. देशात सध्या प्रति दहा लाख लोकसंख्येमागे 70 जण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडत आहेत. याची जागतिक सरासरी 127 असून भारतात सर्वांत कमी कोरोना मृत्यूदर असल्याचा दावा आरोग्य मंत्रालयाने  केला आहे. 

ऑगस्टपासून प्रचंड वाढलेला कोरोना कहर देशात अजूनही कायम आहे. ग्रामीण भागापेक्षा शहरी भागातच कोरोनाचा जास्त धोका असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. आरोग्य सचिव राजेश भूषण व आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी आज भारतातील कोरोना परिस्थितीबाबतची माहिती दिली. देशात सामूहिक संसर्ग (कम्युनिटी स्प्रेड) सुरू झालेला नाहीच, असा ठाम दावा पुन्हा एकदा त्यांनी केला आहे. 

या वेळी डॉ. भार्गव म्हणाले की, देशाच्या लोकसंख्येचा मोठा भाग कोरोना संक्रमित असू शकतो. दुसऱ्या राष्ट्रीय सीरो सर्वेक्षणानुसार 10 वर्षांच्या पुढील वयोगटातील दर 15 मागील 1 भारतीय कोरोना संक्रमित झालेला आढळला आहे. विशेषतः शहरी भागांत, झोपडपट्टी व दाट वस्तीच्या परिसरांत चाचण्या व उपचारांचे प्रमाण जास्त वाढविण्याची गरज आहे. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरांतील या भागांत कोरोना संसर्ग वाढण्याचा चौपट धोका आहे.

राज्यांनी आणखी सावधगिरी बाळगून व विविध सणांच्या दिवशी गर्दी जमण्याची शक्‍यता लक्षात घेऊन कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी वेगवेगळी रणनीती तयार करावी अशा सूचनाही केंद्राने केल्या आहेत. देशात मार्चमध्ये दरमहा 30 हजार चाचण्या होत होत्या. आता त्यांची संख्या (सप्टेंबरमध्ये) 2 कोटी 97 लाखांवर पोहोचली आहे. देशात सध्या 1,836 कोरोना चाचणी प्रयोगशाळा आहेत.

कोरोना ( ता. 29 सप्टेंबर, सकाळी 8 पर्यंतची आकडेवारी)
देशातील रूग्णसंख्या - 61 लाखांच्या पुढे

प्रती 10 लाख लोकसंख्येमागील मृत्यूदर
भारत - 70
ब्राझील - 665
ब्रिटन - 618
अमेरिका - 614
फ्रान्स - 483
दक्षिण आफ्रिका- 276
रशिया -139 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख