आमदाराला शिक्षा होऊन लगेच जामीन...आम आदमी पक्ष म्हणतोय, अन्याय झाला - aap says injustice has been meted out to party mla somnath bharti | Politics Marathi News - Sarkarnama

आमदाराला शिक्षा होऊन लगेच जामीन...आम आदमी पक्ष म्हणतोय, अन्याय झाला

वृत्तसंस्था
शनिवार, 23 जानेवारी 2021

सुरक्षारक्षकांना मारहाण केल्याप्रकरणी न्यायालयाने आमदाराला दोन वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. 

नवी दिल्ली : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेतील (एम्स) सुरक्षारक्षकांना मारहाण केल्याप्रकरणी आम आदमी पक्षाचे आमदार सोमनाथ भारती यांना दिल्लीतील न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. या प्रकरणी उच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी भारतींना जामीनही मिळाला आहे. 'आप'ने मात्र, या निकालावर टीका केली आहे. 

अतिरिक्त मुख्य महानगर न्यायदंडाधिकारी रविंद्रकुमार पांडे यांनी ही शिक्षा सुनावली आहे. याचबरोबर भारती यांना एक लाख रुपये दंडही ठोठावण्यात आला आहे. या प्रकरणी आमदार भारती यांना जामीन मंजूर झाला असून, ते या निकालाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार आहेत. या प्रकरणातील इतर चार आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. 

या निकालावर प्रतिक्रिया देताना 'आप'ने भारतींवर अन्याय झाल्याचे म्हटले आहे. 'आप'ने म्हटले आहे की, सोमनाथ भारती हे या निकालाला आव्हान देणार आहेत. त्यांना उच्च न्यायालयात न्याय मिळेल, असा आम्हाला विश्वास आहे. आम्ही न्यायालयाचा आदर करतो आणि आमचा न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. पण भारती यांच्या प्रकरणात अन्याय झाल्याची आमची भावना आहे. भारती हे लोकप्रिय नेते आहेत. त्यांच्या मतदारसंघातील सर्व लोक त्यांच्यावर प्रेम करतात. ते 24 तास जनतेसाठी काम करत असतात. त्यांना शिक्षा झाल्याने मतदारसंघातील लोक नाराज झाले आहेत. 

सोमनाथ भारती हे 9 सप्टेंबर 2016 रोजी तीनशे जणांचा जमाव घेऊन 'एम्स'वर गेले होते. त्यांनी 'एम्स'च्या संरक्षक भिंतीचे कुंपण जेसीबीने पाडले होते. याचबरोबर सुरक्षारक्षकांनाही मारहाण केली होती. या प्रकरणी न्यायालयाने भारती यांनी जाणीवपूर्वक दुसऱ्याला इजा करणे, सरकारी कर्मचाऱ्याला त्याचे कर्तव्य करण्यापासून रोखण्यासाठी दबाव टाकणे आणि दंगल आदी आरोपांखाली दोषी ठरवले होते. सरकारी पक्षाने भारती यांच्यावरील आरोप सर्व संशयापलिकडे सिद्ध केले आहेत, असे न्यायालयाने म्हटले आहे. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याबद्दलही न्यायालयाने भारती यांना दोषी ठरवले होते. 

भारती यांचे सहकारी जगत सैवी, दिलीप झा, संदीप सोनू आणि राकेश पांडे यांची मात्र, न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. त्यांच्या विरोधात पुरेसे पुरावे नसल्याचे कारण न्यायालयाने दिले आहे. या प्रकरणी 'एम्स'चे मुख्य सुरक्षा अधिकारी आर.एस.रावत यांनी तक्रार दिली होती. न्यायालयात भारती यांना त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी पोलिसांनी साक्षीदार सादर केले, असा दावा केला होता. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख