मुख्यमंत्री बदलासाठी 23 आमदार अन् तीन मंत्री मैदानात
23 MLA and 3 Minister demands replacement of CM Amarinder Singh

मुख्यमंत्री बदलासाठी 23 आमदार अन् तीन मंत्री मैदानात

काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री आणि सिद्धू यांच्या वादावर पडदा पडला होता.

नवी दिल्ली : पंजाबमध्ये (Punjab) मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग (Amarinder Singh) यांच्या विरोधात काही दिवसांपूर्वी काँग्रेस (Congress) नेते नवज्योतसिंग सिद्धू (Navjyot Singh Sidhu) यांनी उघड बंड पुकारले होते. यामुळे मुख्यमंत्र्यांचा विरोध असतानाही सिद्धू यांना प्रदेशाध्यक्षपदी बढती देण्यात आली. सिद्धू यांनी प्रदेशाध्यक्षपदाची धुरा हाती घेताच पुन्हा एकदा आमदारांनी मुख्यमंत्र्यांविरोधात उघडपणे बंड केलं आहे. (23 MLA and 3 Minister demands replacement of CM Amarinder Singh) 

मुख्यमंत्र्यांविरोधात 23 आमदार व तीन मंत्र्यांनीच आघाडी उघडली असून त्यांना बदलण्याची जोरदार मागणी सुरू झाली आहे. त्यापैकी पाच नेत्यांचे शिष्टमंडळ मंगळवारी दिल्लीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेऊन मुख्यमंत्र्यांची तक्रार करणार आहेत. पाच नेत्यांमध्ये त्रिपत बाजवा, सुखजिंदर सिंग रंधवा, सुखविंदर सिंग सरकारिया, चरणजित चन्नी व परगत सिंग हे दिल्लीला रवाना झाले आहेत. 

माध्यमांशी बोलताना मंत्री त्रिपत बाजवा म्हणाले, मुख्यमंत्री बदलायलाच हवेत, त्याशिवाय काँग्रेसचं काही खरं नाही. आम्ही दिल्लीला जात असून या मुद्यावर सोनिया गांधी यांची भेट घेणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, सिध्दू यांनी नेमलेल्या चार सल्लागारांपैकी दोघांनी मागील आठवड्यात वादग्रस्त वक्तव्य केल्यानं वाद निर्माण झाला आहे. त्यावर मुख्यमंत्र्यांनी त्यांना सक्त ताकीद दिली होती. माहिती नसलेल्या विषयांवर बोलू नये, अशी तंबी देत त्यांनी थेट सिध्दू यांच्यावर निशाणा साधल्याचं बोललं जात आहे. 

काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री आणि सिद्धू यांच्या वादावर पडदा पडला होता. पण पुन्हा एकदा बंडखोर आमदारांनी डोकं वर काढलं असून मुख्यमंत्र्यांविरोधात मोर्चा उघडला आहे. यामागं सिध्दू यांचाच हात असल्याची चर्चा पंजाबमध्ये आहे. पुढील वर्षी पंजाबमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहे. यापार्श्वभूमीवर हा वाद निर्माण झाल्याने काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे. आता यावर सोनिया गांधी काय निर्णय घेणार, याकडे लक्ष लागले आहे. 

मुख्यमंत्री अमरिंदरसिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात मागील 2017 च्या विधानसभा निवडणुकीपासून वाद सुरू आहे. भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेल्या सिद्धू यांनी काँग्रेसच्या विजयानंतर पंजाबमध्ये उपमुख्यमंत्रिपद मिळेल, अशी शक्यता होती. परंतु, मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी याला विरोध केल्याने सिद्धू यांना दुसरे मंत्रालय देण्यात आले होते. तेव्हापासून दोघांचा वाद सुरू असून, सिद्धू यांनी उघड बंड पुकारले होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in