सागरी दुर्घटना : 22 मृतदेह सापडले तर अद्याप 65 जण बेपत्ता; नौदलाकडून बचावकार्य सुरूच

अरबी समुद्रात तयार झालेल्या तौते चक्रीवादळामुळे ऑईल अँड नॅचरल गॅसची 273 कर्मचारी तैनात असलेली बार्ज बुडालीआहे.
सागरी दुर्घटना : 22 मृतदेह सापडले तर अद्याप 65 जण बेपत्ता; नौदलाकडून बचावकार्य सुरूच
22 dead and 65 missing after ongc barge sinks in arabian sea

मुंबई : अरबी समुद्रात तयार झालेल्या तौते चक्रीवादळामुळे (Tauktae Cyclone) ऑईल अँड नॅचरल गॅसची (ONGC) बार्ज बुडाली होती. मुंबईच्या किनाऱ्यावर तेल उत्पादनासाठी ही बार्ज उभी करण्यात आली होती. परंतु, वादळामुळे ती समुद्रात बुडाली. या बार्जवर तब्बल 273 कर्मचारी होते. यातील 186 जणांची नौदलाने (Navy) सुटका केली. या बार्जवरील 65 कर्मचारी अद्याप बेपत्ता असून, 22 जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. 

ओएनजीसीची तेल उत्पादन करणारी बार्ज पी-305 आज चक्रीवादळामुळे बॉम्बे हाय येथे सुरक्षित अंतरावर उभी करण्यात आली होती. परंतु, चक्रीवादळामुळे तिचा अँकर सुटला आणि ती समुद्रात भरकटली आणि बुडाली. त्यावेळी बार्जवर 273 कर्मचारी होते. अखेर नौदलाला तातडीने संदेश पाठवण्यात आला. नौदलाच्या जहाजांनी मदत कार्य सुरू केले. आतापर्यंत 186 जणांची सुखरुपपणे सुटका करण्यात आली आहे. तसेच, 22 मृतदेह हाती लागले आहेत. अजून 65 कर्मचारी बेपत्ता असून, त्यांचा शोध घेण्यात येत आहे. 

बार्ज पी -305 ही बार्ज बुडाली होती तर गॅल कन्स्ट्रक्टर आणि सपोर्ट स्टेशन या बार्जही भरकटल्या होत्या. गॅल कन्स्ट्रक्टरवरील 137 कर्मचाऱ्यांची सुटका करण्यात आली आहे. सपोर्ट स्टेशन-3 वर 201 कर्मचारी होती. याचबरोबर ओएनजीसीचे तेल उत्पादनासाठी ड्रिलिंग करण्यास वापरण्यात येणारे जहाजही भरकटले आहे. त्यावर 101 कर्मचारी आहेत. हे सर्व कर्मचारी सुखरुप असून, त्यांच्या सुटकेचेही प्रयत्न सुरू आहेत. 

ओएनजीसी समुद्रात खोदकाम करुन तेलाचे उत्पादन घेते. अरबी समुद्रात यासाठी बार्जचा वापर केला जातो. या बार्जवरील कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी हेलिकॉप्टरमधून नेले जाते. ओएनजीसी अशा प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून दिवसाला 50 हजार बॅरलपर्यंत तेलाचे उत्पादन घेते. बॉम्बे हाय हे अरबी समुद्रातील ओएनजीसीच्या मालकीचे तेलक्षेत्र आहे. 

मोदींकडून गुजरात अन् दीवची हवाई पाहणी 
तौते चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात 6 जणांचा, गुजरातमध्ये 2 जणांचा आणि कर्नाटकात 8 जणांचा मृत्यू झाला आहे. याचवेळी हजारो घरांचे नुकसान झाले असून, विजेचे खांब मोठ्या प्रमाणात उन्मळून पडले आहेत. वादळामुळे हजारो एकर पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीची हवाई पाहणी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली. त्यांनी गुजरात आणि दीवमधील नुकसानीची पाहणी केली. 

मागील आठवड्यात अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला होता. त्यानंतर त्याचे रुपांतर चक्रीवादळात झाले. सुरूवातीला या वादळाची तीव्रता कमी होती. पुढे सरकत असतानाच वादळाची तीव्रता वाढत गेली आणि नंतर वादळाने रौद्र रुप धारण केले होते. मागील दोन दिवसांत केरळ, कर्नाटक व गोव्याला वादळाने जोरदार तडाखा दिला. नंतर वादळ महाराष्ट्राच्या किनारपट्टीजवळून पुढे गेले. मुंबई, कोकण, ठाणे या भागांसह पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. त्यामुळे काही ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या आहेत. विजेचे खांब पडले असल्याने काही भागातील वीजपुरवठा बंद झाला आहे.

Edited by Sanjay Jadhav

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in