धक्कादायक : जवान सीमेवर तैनात अन् सांत्वनासाठी केंद्रीय मंत्री पोचले घरी

जनआशीर्वाद यात्रेदरम्यान हा प्रकार घडल्याचे समोर आलं आहे.
धक्कादायक : जवान सीमेवर तैनात अन् सांत्वनासाठी केंद्रीय मंत्री पोचले घरी
Minister visits serving soldiers house for condolences

बेंगलुरू : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळामध्ये पहिल्यांदाच स्थान मिळालेल्या केंद्रीय मंत्र्यांनी देशभरात जनआशीर्वाद यात्रेचे आयोजन केले आहे. या यात्रांदरम्यान अनेक वादग्रस्त प्रकार घडल्याचेही समोर आलं आहे. कर्नाटकातही अशीच धक्कादायक घटना समोर आली आहे. सामाजिक न्याय राज्यमंत्री ए. नारायणस्वामी (A Narayanswami) थेट सीमेवर तैनात असलेल्या जवानाच्या घरी सांत्वनासाठी पोहचल्यानं वाद ओढवून घेतला आहे. (Minister visits serving soldiers house for condolences)

नारायणस्वामी यांची जनआशीर्वाद यात्रा गडग जिल्ह्यात आल्यानंतर स्थानिक नेत्याने त्यांना रविकुमार कट्टीमणी यांच्या घरी नेले. सध्या ते जम्मू-काश्मीरमध्ये तैनात आहेत. मंत्र्यांच्या यात्रेच्या नियोजनामध्ये एका शहीद जवानाच्या घरी जाऊन कुटूंबियांचे सांत्वन करण्याचे ठरले होते. पण स्थानिक नेत्याने गडबड केली अन् थेट सीमेवर तैनात जवानाच्या घरीच त्यांना नेले. प्रत्यक्षात त्यांना वर्षभरापूर्वी पुण्यात मृत्यू झालेले बसवराज हिरेमठ यांच्या घरी जायचे होते. 

पण स्थानिक नेत्याने चुकून मंत्र्यांना कट्टीमणी यांच्या घरी नेले. तिथे गेल्यानंतर त्यांनी कट्टीमणी यांच्या कुटूंबाला सरकारकडून जमीन देण्याची तसेच कुटूंबातील एकाला नोकरी देण्याची घोषणा केली. त्यामुळे कुटूंबियांनाही आश्चर्य वाटलं. पण काही क्षणातच घरातील वातावरण पूर्ण बदलून गेलं. रविकुमार शहीद झाल्याची माहिती देण्यासाठी मंत्री आल्याचा समज कुटूंबियांना झाला. त्यामुळं कुटूंबीय हादरून गेले. 

कुटूंबियांची स्थिती पाहिल्यानंतर स्थानिक नेत्याला काहीतरी चूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्याने तातडीने रविकुमार यांच्या मोबाईलवर व्हिडीओ कॉल करत मंत्र्यांना दिला. तोपर्यंत मंत्र्यांना आपली चूक झाल्याचे समजले होते. घरातील स्थिती सावरण्यासाठी मग त्यांनी रविकुमार यांचं कौतूक करायला सुरूवात केली. त्यानंतर ते लगेचच तिथून निघून गेले. या प्रकारामुळं केंद्रीय मंत्र्यांची चांगलीच पंचाईत झाली.

दरम्यान, या प्रकारानंतर बोलताना रविकुमार यांच्या पत्नी म्हणाल्या, माझे पती काश्मीरमध्ये देशाची सेवा करत आहेत. दोन महिन्यांपूर्वीच आमचा विवाह झाला आहे. मंत्री आमच्या घरी आले अन् कुटूंबियांचे सांत्वन करू लागले. त्यांनी नोकरी आणि जमीन देण्याची जाहीर केल्यानंतर मग त्यांना माझे पती सेवा करत असून मला त्यांच्याशी बोलायचे आहे, असं सांगितलं. या प्रकारामुळं कुटूंब हादरून गेल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. केंद्रीय मंत्री नारायणस्वामी यांनी हिरेमठ यांच्या कुटूंबियांनाही नंतर भेट दिली नाही. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in