काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी मारली कार्यकर्त्याच्या थोबाडीत; व्हिडीओ व्हायरल... - Karnataka Congress President DK Shivakumar slaps his party worker | Politics Marathi News - Sarkarnama

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी मारली कार्यकर्त्याच्या थोबाडीत; व्हिडीओ व्हायरल...

वृत्तसंस्था
रविवार, 11 जुलै 2021

एकाने त्यांच्या पाठीवर हात ठेवण्याचा प्रयत्न केल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे

बेंगलुरू : विविध पक्षांचे नेते नेहमीच कार्यकर्त्यांच्या गराड्यात असतात. कुणी हातात हात देतात, तर कुणी गळाभेट घेतात. पण काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना कार्यकर्ता जवळ येणं रुचलं नाही अन् त्यांनी थेट त्याच्या थोबाडीत मारली. हा कार्यकर्ता त्यांच्या खांद्यावर हात टाकण्याचा प्रयत्न करत होता. हे लक्षात येताच प्रदेशाध्यक्षांनी त्याच्यावर हात उचलला. हा घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. (Karnataka Congress President D K Shivakumar slaps his party worker)

कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. शिवकुमार यांच्याकडून हा प्रकार घडला आहे. हा प्रकार शुक्रवारी घडला आहे. एका ज्येष्ठ नेत्याला भेटण्यासाठी कार्यकर्त्यांच्या गर्दीत जात होते. त्यातील एकाने त्यांच्या पाठीवर हात ठेवण्याचा प्रयत्न केल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. शिवकुमार यांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी थेट त्याच्या थोबाडीत मारली. यावेळी पोलिसही उपस्थित होते.

हेही वाचा : मंत्री झाल्यानंतर राणेंच्या पहिल्या कार्यक्रमात फडणवीस अन् शिवसेनेतील कट्टर विरोधकही

थोबाडीत मारल्यानंतर शिवकुमार एवढ्यावरच शांत झाले नाहीत. त्यांनी त्या कार्यकर्त्याला चांगलंच फैलावरही घेतलं. लोकांमध्ये वागणूक चांगली असायला हवी, असंही त्यांना सांगितलं. शिवकुमार यांच्या या पवित्र्यामुळे इतर कार्यकर्ते व नेतेही अवाक झाले. यावेळी माध्यमांचे प्रतिनिधीही असल्याचे पाहून त्यांनी व्हिडीओ डिलिट करण्यास सांगितला. आपला तोल गेल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी कोरोनाचे कारण दिल्याचे समजते. 

दरम्यान, शिवकुमार यांच्या या कृतीवर भाजपने जोरदार टीका केली आहे. शिवकुमार कार्यकर्त्यांशी असे वागत असतील तर सर्वसामान्यांबाबत काय होईल, असा सवाल भाजपने उपस्थित केला आहे. एका राष्ट्रीय पक्षाचे प्रदेशाध्यक्षांना लोकांमध्ये एखाद्या व्यक्तीला असे मारणे शोभत नाही. तुम्ही अशा राजकारणाचे ब्रँड अॅम्बेसेडर बनण्याचा प्रयत्न करत आहात का, असा टोलाही भाजपने लगावला आहे. 

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवी यांनीही शिवकुमार यांचा हा व्हिडीओ ट्विट करत थेट काँग्रेस नेते राहूल गांधींवर निशाणा साधला आहे. तुम्ही शिवकुमार यांना हिंसाचाराचा परवाना दिला आहे, असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. शिवकुमार यांच्या या कृतीवर अनेकांनी टीकास्त्र सोडलं आहे. नेटकऱ्यांनी शिवकुमार यांना फैलावर घेतले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख