देवेंद्र फडणविसांचे पहिल्याच बैठकीत लालू्प्रसाद यादवांवर टीकास्त्र - devendra fadnavis criticizes laluprasad yadav in first meeting | Politics Marathi News - Sarkarnama

देवेंद्र फडणविसांचे पहिल्याच बैठकीत लालू्प्रसाद यादवांवर टीकास्त्र

उज्ज्वलकुमार
शनिवार, 22 ऑगस्ट 2020

देवेंद्र फडणवीस यांनी बिहारवर काम सुरू केले...

पाटणा ः ‘‘बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) १५ वर्षांच्या सत्ताकाळात राज्य कारभार सुरळीत झाल्याचे भाजपचे निवडणूक प्रभारी व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी सांगितले.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपची प्रदेश कार्यसमितीची बैठक आजपासून सुरू झाली. प्रदेश कार्यालयातील या आभासी बैठकीत बोलताना फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिहार सरकारच्या कार्याची भरभरून प्रशंसा केली. त्याचबरोबर राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्यावर जोरदार टीका केली.

बैठकीला बिहारचे प्रभारी खासदार भूपेंद्र यादव यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. फडणवीस यांच्यावर बिहारची जबाबदारी देण्यात आली आहे. बिहारमधील सुशांतसिंह राजपूतचे मृत्यू प्रकरण महाराष्ट्रात गाजत असताना बिहारच्या मोहिमेवर फडणविसांची नियुक्ती झाल्याने त्याबाबतही चर्चा होती.

कोरोना व पुराच्या काळात केंद्र व राज्य सरकारने केलेल्या कामांबद्दल फडणवीस यांनी कौतुकाचा वर्षावच केला. ते म्हणाले की, लालूप्रसाद यादव यांनी सत्तेवर असतानाच्या १५ वर्षांच्या काळात केवळ त्यांच्या कुटुंबाची प्रगती केली. ‘आरजेडी’च्या कार्यकाळात बिहार २५ ते ३० वर्षे मागे गेला. त्याच वेळी ‘एनडीए’च्या सत्ताकाळात विकासावर लक्ष केंद्रित करून काम करण्‍यात आले. बिहारच्या गौरवशाली इतिहासाचा उल्लेखही फडणवीस यांनी यावेळी केला. ‘‘इंदिरा गांधी यांच्या काळात लोकशाहीची गळचेपी करण्याचा प्रयत्न झाला त्यावेळी बिहारमधून त्याविरोधात आवाज उठविण्यात आला होता, असे ते म्हणाले.

‘मोदींच्या कार्याची माहिती द्या’
निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याची माहिती देण्याचे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना केले. येत्या २५ किंवा २६ तारखेला ते बिहारला येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख