शशि थरुर म्हणाले, आजचा दिवस खास...तीन सुपरस्टार्सचा वाढदिवस..! - congress leader shashi tharoor says toady is birthday of three superstars | Politics Marathi News - Sarkarnama

शशि थरुर म्हणाले, आजचा दिवस खास...तीन सुपरस्टार्सचा वाढदिवस..!

वृत्तसंस्था
शनिवार, 12 डिसेंबर 2020

काँग्रेस नेते शशि थरुर यांना आजचा दिवस खास असल्याचं म्हटलं आहे. यामागे मोठ्या व्यक्तींच्या आज असलेल्या वाढदिवसाचं कारण आहे. 

नवी दिल्ली : आजचा दिवस खास आहे...कारण तीन सुपरस्टार्सचा आज वाढदिवस आहे, असे ट्विट काँग्रेस नेते शशि थरुर यांनी केले आहे. त्यांनी अतिशय अनोख्या पद्धतीने सुपरस्टार्सना शुभेच्छा दिल्या आहेत. यातील एक आहे सर्वांत तरुण वयात 36 व्या वर्षी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनण्याचा मान पटकावणारा, दुसरा आहे विश्वचषकात एकाच ओव्हरमध्ये 36 रन करणारा आणि तिसरा आहे ज्याच्या नावाने 36 दशलक्षांहून अधिक जोक्स इंटरनेटवर फिरत आहेत. 

शशि थरुर यांचे हे ट्विट सोशल मीडियात जोरदार चर्चिले जात आहे. यात थरूर यांनी 36 हा आकडा सर्वांच्या कारकिर्दीत मैलाचा टप्पा कसा ठरला आहे, हे अधोरेखित केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवशी राष्ट्रवादीकडून विविध कार्यक्रम साजरे केले जात आहेत. याचबरोबर ट्विटरवर शरद पवार आणि साहेब हे हॅशटॅग ट्रेंड होत आहेत. महाराष्ट्राचे सर्वांत तरुण मुख्यमंत्री बनण्याचा मान शरद पवारांनी 36 व्या वर्षी पटकावला होता. याचा उल्लेख थरुर यांनी केला आहे. 

सुपरस्टार रजनीकांत यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्यावर जगभरातून चाहत्यांच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. याचबरोबर सोशल मीडियावर थलैवा रजनीकांत यांच्या नावाने 36 दशलक्ष जोक्स इंटरनेटवर असून, त्यांना सुपरहिरोचा दर्जा मिळाला आहे, असे थरुर यांनी म्हटले आहे. रजनीकांत यांचा वाढदिवस असल्याने आज हॅपी बर्थडे रजनीकांत आणि हॅपी बर्थ डे सर हे दोन हॅशटॅग ट्रेंडिग आहेत. 

माजी क्रिकेटपटू युवराजसिंग याचाही आज वाढदिवस आहे. त्याने वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने विश्वचषकात एकाच ओव्हरमध्ये 36 रन करण्याचा विक्रम केला होता. युवराजला शुभेच्छा देताना थरुर यांनी त्याच्या या कामगिरीचा उल्लेख केला आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख