ममतादिदींचा पराभव निश्चित; भाजपला 150 जागा : गिरीश महाजनांना का वाटतोय विश्वास? - defeat of Mamata in Wast Bangal is sure confident Girish Mahajan | Politics Marathi News - Sarkarnama

ममतादिदींचा पराभव निश्चित; भाजपला 150 जागा : गिरीश महाजनांना का वाटतोय विश्वास?

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 1 मे 2021

महाजन यांच्या प्रचार नियोजनाची अमित शहांनी दखल घेतली होती.. 

जळगाव : पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हवा आहे. त्यामुळे तेथे भाजपला निर्विवाद बहुमत मिळेल, तर महाराष्ट्रातील सरकार त्यांच्या कर्माने जाईल असे मत भाजप नेते माजी मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केले.

महाजन हे भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी पश्चिम बंगालमध्ये गेले होते. दोन मे रोजी होणाऱ्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर बोलताना ते म्हणाले की तेथील जनता ममता दीदींच्या सरकारला कंटाळली आहे. खंडणी, हाणामाऱ्या यामुळे ते त्रस्त झाले आहेत. त्यामुळे त्यांना बदल हवा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर त्यांचा विश्वास आहे. त्यामुळे या वेळी जनता निश्चित बदल करणार आहे. भारतीय जनता पक्षाला 150 चा वरच जागा मिळतील.पक्षाला निर्विवाद बहुमत मिळेल हे आपण खात्रीने सांगत आहोत.

महाजन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेचे तसेच गृहमंत्री अमित शहा यांच्या रोड शोचे नियोजन केले होते. अमित शहांनी त्यांच्या कामाचे कौतुकही केले होते. या रोड शोमध्ये वाहनाला दिशादर्शन करतानाचा महाजन यांचा फोटो सोशल मिडियात व्हायरल झाला होता. 

महाराष्टातील सरकार आपल्या कर्माने जाईल....

पश्चिम बंगालमधील निकालाचा महाराष्ट्रावर परिणाम होणार असल्याची चर्चा आहे.  राज्यातील आघाडी सरकार बाबत बोलताना महाजन म्हणाले, राज्यातील जनता या सरकारला कंटाळली आहे, त्यामुळे आपल्या कर्माने हे सरकार पडेल, आम्हाला त्याची कोणतीही घाई नाही.

 

एक्झिट पोल ममतांच्या बाजूने 

एनडीटीव्ही'ने सर्व एक्झिट पोलची सरासरी काढून व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, तृणमूलला 149 जागा मिळवून ममता बॅनर्जी सत्ता ताब्यात ठेवतील. याचवेळी भाजपच्या जागांमध्ये मोठी वाढ होऊन पक्षाला 116 जागा मिळतील. काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या आघाडीला 16 जागा मिळतील.

निवडणुकीआधी जाहीर झालेल्या टाईम्स नाऊ-सी-व्होटरच्या ओपिनियन पोलनुसार (जनमत चाचणी) सत्ताधारी तृणमूल काँग्रेस राज्यातील सत्ता कायम ठेवण्यात यश मिळवेल. भाजपने तृणमूलमधील अनेक नेत्यांना फोडून पक्षाला खिंडार पाडले होते. याचा फायदा काही प्रमाणात भाजपला होईल. राज्यात भाजपच्या जागा वाढतील. मात्र, सत्तेपासून भाजप दूरच राहील. तृणमूलच्या जागांमध्ये घट होण्याचा अंदाज आहे. मागील विधानसभा निवडणुकीत तृणमूलला एकूण 294 जागांपैकी 211 जागा मिळाल्या होत्या. या वेळी पक्षाला 154 जागा मिळतील आणि पक्षाला बहुमत मिळेल. भाजपला मागील निवडणुकीत केवळ 3 जागा मिळाल्या होत्या. या वेळी भाजपला 107 मिळतील. जागा वाढूनही भाजपला राज्यातील सत्तास्थापनेचे स्वप्न साकार करता येणार नाही. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख