डी. के. शिवकुमार यांच्या कन्येचा साखरपुडा एस. एम. कृष्णा यांच्या नातवाशी - Daughter of DK Shivakumar Engaged To granddaughter of SM Krishna in Bengaluru | Politics Marathi News - Sarkarnama

डी. के. शिवकुमार यांच्या कन्येचा साखरपुडा एस. एम. कृष्णा यांच्या नातवाशी

वृत्तसंस्था
गुरुवार, 19 नोव्हेंबर 2020

लग्न सोहळा 21 फेब्रुवारी 2021 मध्ये होणार...

बेंगलुरू : कर्नाटकात सध्या हाय प्रोफाईल लग्न सोहळ्याची आणि त्या आधीच्या साखरपुड्याची चर्चा सुरू आहे. कर्नाटक प्रदेश काॅंग्रेस समितीचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांची कन्या ऐश्वर्या आणि `कॅफे काॅफी डे`चे संस्थापक दिवंगत व्ही. जी. सिद्धार्थ यांचा मुलगा अमर्त्य यांचा सारखपुडा आज एका हाॅटेलमध्ये पार पडला.

कर्नाटकातील अनेक प्रमुख नेते त्यास उपस्थित होते. अमर्त्य हा कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री, माजी परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा यांचा नातू आहे. कृष्णा यांची ज्येष्ठ कन्या मालविका यांचा तो मुलगा आहे. अमर्त्य याच्या वडिलांचा गेल्या वर्षी मृत्यू झाला होता. आर्थिक ताणामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे तेव्हा बोलले जात होते. हजारो कोटी रुपयांची मालमत्ता असलेल्या सिद्धार्थ यांच्या आत्महत्येने उद्योग जगताला धक्का बसला होता. 

शिवकुमार हे कर्नाटकातील दबदबा असलेले नेते आहेत. काॅंग्रेसचे संकटमोचक म्हणून त्यांची ख्याती आहे. भाजप सरकारशी त्यांचे फारसे जुळले नाही. त्यांच्या कंपन्यांवर, घरावर अनेकदा छापे टाकण्यात आले. तसेच त्यांच्याविरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाने गुन्हा दाखल करून अटकही केली होती. ऐश्वर्या यांचीही ईडीने चौकशी केली होती.  तरी या साखरपुड्यास कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांची उपस्थिती लक्षणीय ठरली. त्यांनी या नव जोडप्यास आशिर्वाद दिले. शिवकुमार आणि येडियुरप्पा यांच्या गप्पा या निमित्ताने रंगल्या. दोघेही नुकतेच कोरोनातून बरे झाले आहेत.  कोरोनाच्या साथीमुळे मोजक्या लोकांच्या उपस्थितीत आजचा साखरपुडा पार पडला.

वडिलांच्या मृत्यूनंतर अमर्त्य हा `सीसीडी`चा कारभार बघत आहे. तर ऐश्वर्या ही वडिलांनी स्थापन केलेल्या ग्लोबल अॅकॅडमी आॅफ टेक्नाॅलाॅजी या इंजिनिअरिंग काॅलेज सांभाळत आहे. त्यांचा विवाह हा 21 फेब्रुवारी 2021 रोजी होणार आहे. शिवकुमार यांचे ज्योतिषी राजगुरू द्वारकानाथ यांनी हा मुहूर्त काढला आहे. द्वारकानाथ यांच्या सल्ल्याशिवाय शिवकुमार कोणताही महत्त्वाचा निर्णय घेत नसल्याचे बोलले जाते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख