दोन आयपीएस अधिकाऱ्यांच्या लढाईत तृणमूलची बाजी - two ips officers fought in bengal election and tmc wins | Politics Marathi News - Sarkarnama

दोन आयपीएस अधिकाऱ्यांच्या लढाईत तृणमूलची बाजी

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 2 मे 2021

दहा हजार मतांनी तृणमूल काॅंग्रेसचे कबीर विजयी 

कोलकता : पश्चिम बंगालमध्ये लक्षवेधक ठरलेल्या देबरा विधानसभा मतदारसंघात आयपीएस अधिकारी विरुद्ध आयपीएस महिला अधिकारी (अर्थात दोघांनीही राजीनामे दिलेले) अशी लढत झाली. या लढतीत तृणमूल काॅंग्रेसचे उमेदवार हूमायूॅं कबीर यांनी विजय मिळवला आहे.

कबीर हे  कोलकत्याजवळील चंदननगरचे पोलिस आयुक्त होते. विधानसभा निवडणूक जाहीर होण्याआधी भाजपच्या रॅलीदरम्यान 'गोली मारो'चे नारे देणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना त्यांनी अटक केली होती.  त्यांनी राजीनामा देऊन तृणमूलमध्ये प्रवेश केला होता. एप्रिलमध्ये ते निवृत्त होणार होते. ते याच मतदारसंघातील मूळचे रहिवासी होते. त्यांचे आईवडिल देखील देबरा येथेच अजूनही वास्तव्यास आहेत.  त्यांच्याविरोधात भाजपने माजी आयपीएस अधिकारी  भारती घोष यांना उतरवले होते. कबीर यांना 84 हजार 441 तर घोष यांना 74 हजार 733 मते मिळाली. तब्बल दहा हजार मतांच्या फरकाने कबीर विजय झालेत. त्यांनी मतदारसंघातील पाणीप्रश्न सोडविण्यास प्राधान्य देणार असल्याचे प्रचारात सांगितले होते. 

घोष या एकेकाळी ममता बॅनर्जी यांच्या आवडच्या पोलिस अधिकारी होत्या. एका जाहीर समारंभात त्यांनी ममता यांना माॅं म्हणून पुकारले होते. पश्चिम मिदनापूर जिल्ह्यातील झारग्राम विभागाच्या अधिकारी त्या होत्या. पण काही कारणांवरून ममता आणि त्यांच्यात बिनसले आणि त्यांनी नोकरीचा राजीनामा देत थेट भाजपची वाट धरली. आपल्या पहिल्याच निवडणुकीत त्यांना पराभव  स्वीकारावा लागला.  

 

ही पण बातमी वाचा : ममता बॅनर्जी न्यायालयात जाणार

कोलकता : पश्चिम बंगालमध्ये सत्ता स्थापनेचे भाजपचे स्वप्न भंग लेआहे. राज्यातील एकूण 292 विधानसभा मतदारसंघांपैकी तब्बल 215 मतदारसंघात सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने विजय मिळवला आहे. परंतु, नंदिग्राममध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा भाजपचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी पराभव केला आहे. या निकालाला न्यायालयात आव्हान देण्याची भूमिका ममतांनी घेतली आहे. 

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस 215, भाजप 76 व इतर 1 असे चित्र आहे. राज्यात बहुमताचा आकडा पार करुन मोठ्या बहुमतासह पुन्हा एकदा ममता बॅनर्जी या सत्तास्थापन करणार आहेत. बंगालमध्ये भाजपचा हिंदुत्ववाद विरुद्ध ममतांची बंगाली अस्मिता अशी लढाई होती. अखेर ममतांची बंगाली अस्मिता भाजपवर भारी पडली आहे.  

ममता आणि सुवेंदू अधिकारी यांच्या नंदिग्राममधील सामना रंगतदार ठरला होता. ममतांनी त्यांचा पारंपरिक भवानीपूर मतदारसंघ सोडून त्यांनी नंदिग्राममधून निवडणूक लढवली होती. अतिशय अटीतटीच्या लढतीत अधिकारींनी त्यांच्या बालेकिल्ल्यात विजय मिळवला आहे. यावरुन मोठा गदारोळ सुरू आहे. ममतांनी या निकालाला आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. 

ममता म्हणाल्या की, निकाल मान्य आहे. पण मी न्यायालयात जाणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर काहीतरी गैरप्रकार करण्यात आले आहेत. त्याचा मी पर्दाफाश करेन. नंदिग्रामची काळजी करु नका. मी नंदिग्रामसाठी खूप मोठा लढा दिला आहे. हे ठीक आहे. नंदिग्राममधील जनतेचे जो काही कौल असेल तो आम्हाला मान्य आहे. मी तो मान्य करेन. याबद्दल मला काही वाटत नाही. आम्ही राज्यात 221 पेक्षा जास्त जागा जिंकल्या असून, भाजप ही निवडणूक हरला आहे. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख