'राष्ट्रवादी'चे उपसरपंच धोंडीराम रायतेंची शक्कल; तमाशातून उजळवले गाव !

शिंगवे हे नांदुरमधमेश्‍वर धरणाच्या काठावरील गाव. ऊसाची शेती, धरणाचे मुबलक पाणी अन्‌ चांगले लपण असल्याने येथे बिबट्यांचा मनसोक्त वावर असतो. सायंकाळ होताच महिला, मुले घराबाहेर पडण्याचे टाळतात. बिबट्याच्या धास्तीने दुचाकीस्वार या रस्त्यावर भरधाव गाडी नेतात. त्यात अनेकदा अपघातही होतात. त्यामुळे येथे पथदिवे बसवावेत ही सगळ्यांचीच मागणी होती
Deputy Sanpanch of Shinve Village in Nashik Irrected Street Lights Through Tamasha
Deputy Sanpanch of Shinve Village in Nashik Irrected Street Lights Through Tamasha

नाशिक : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपसरपंच धोंडीराम रायते यांनी आपल्या गावाचे रस्ते एक वेगळीच शक्कल लढवून दिव्यांनी उजळवले आहेत. त्यासाठी निमित्त ठरले बिबट्याची दहशत व अंधारातील रस्ता. ही दहशत घलावायची तर रस्त्यावर पथदिवे हवेत. सरकारी निधीतून करायचे म्हटले तर त्याला काही वर्षे प्रतिक्षा. त्यामुळे त्यांनी चक्क तमाशाचा आधार घेतला. गावात तमाशा ठेवला. प्रत्येकाला तमाशाला बोलावले. अन्‌ त्यातून जमलेल्या पैशांतून दीड किलोमीटरच्या रस्त्यावर पथदीप बसवून लख्ख प्रकाश पाडला.

ही घटना सध्या सबंध पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरली आहे. शिंगवे हे नांदुरमधमेश्‍वर धरणाच्या काठावरील गाव. ऊसाची शेती, धरणाचे मुबलक पाणी अन्‌ चांगले लपण असल्याने येथे बिबट्यांचा मनसोक्त वावर असतो. सायंकाळ होताच महिला, मुले घराबाहेर पडण्याचे टाळतात. बिबट्याच्या धास्तीने दुचाकीस्वार या रस्त्यावर भरधाव गाडी नेतात. त्यात अनेकदा अपघातही होतात. त्यामुळे येथे पथदिवे बसवावेत ही सगळ्यांचीच मागणी होती. ती पुर्ण करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपसरपंच धोंडीराम रायते यांनी शक्कल लढवली. त्याला शंकर सानप, डॉ. प्रल्हाद डेर्ले, डॉ. नितीन गिते तसेच शहरात नोकरी करणाऱ्या अनेकांनी सक्रीय पाठींबा दिला. 

तुकाराम खेडकर यांचा तमाशाचा फड गावात आणला गेला. गावातील सर्व घरात प्रत्येकाला सत्तर रुपयांचे तिकीट देण्यात आले. तमाशा म्हटल्यावर गावानेही खुशीने साथ दिली. त्यातून जवळपास दोन लाखांचा निधी शिल्लक राहिला. त्यात गावाचा रस्ता उजळला. लोकवर्गणीचा चंग बांधला. ग्रामस्थांच्या मदतीतून एक-दीड किलोमीटरवर 40 खांब उभे झाले. यासाठी दीड-दोन लाखांचा खर्च आला अन्‌ अवघ्या पंधरा दिवसांत रस्त्यावर उजेड दिसला.

यापूर्वी या गावात 'लेकीचे झाड', रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण असे नावीन्यपूर्ण उपक्रम लोकसहभागातून करत शिंगवे ग्रामपंचायतीने आदर्श निर्माण केला आहे. लेकीचे झाड हा उपक्रम राबवून अन्‌ तो कृतीत आणून तसेच, रस्त्याच्या कडेला शेकडो झाडे लावण्याचा एक आदर्श अन्‌ प्रेरणादायी उपक्रम असो की, आता पथदिवे उभे करण्याचा उपक्रम, लोकसहभागातून काहीही अशक्‍य नाही, असा आदर्शच शिंगवे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामस्थ देत आहेत. त्यासाठी ग्रामस्थांनीही पुढाकार घेतला असून, स्वइच्छेने आर्थिक मदत उभी करत ग्रामपंचायतीला सहकार्य करत आहेत.

गावासाठी चांगला रस्ता होता. मात्र ये-जा करायला उजेड हवा होता. सर्वांचा एकविचार झाला आणि लोकवर्गणीतून दहा लाखांचे काम आम्ही अल्पखर्चात करुन दाखवले. यासाठी ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले. - धोंडिराम रायते, उपसरपंच शिंगवे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com