केजरीवालांकडून सर्वच पक्ष सकारात्मक प्रचाराचा धडा घेतील का ?

केजरीवालांकडून सर्वच पक्ष सकारात्मक प्रचाराचा धडा घेतील का ?

सोशल मीडियाचे ट्रोलर्स, फेक न्यूज पसरवणारा एक विशिष्ट गट आणि धार्मिक विद्वेषातून केलेला विखारी प्रचार यावर सकारात्मकतेने मात करता येते, हा सगळ्यात मोठा धडा दिल्ली विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देशाच्या सर्वच राजकीय पक्षांना दिला.

नकारात्मक प्रचाराचा अजेंडा राबणाऱ्यांना ही सर्वात मोठी चपराक तर आहेच शिवाय हा निकाल राजकीय सदृढतेसाठी प्रेरणादायीसुद्धा आहे.आगामी निवडणुकीत सर्वच राजकीय पक्ष यातून बोध घेऊन पॉलिटिकल स्टॅटर्जी आखतील ही आशा आहे.

जवळपास वर्षापूर्वीच केजरीवाल यांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विकासकामांना प्रमोट करत प्रचाराला सुरुवात केली. या काळात केजरीवाल ना कोणत्या वायफट वादात पडले, ना पंतप्रधान मोदींवर टीका करण्याच्या फंदात. आपले काम भले आणि आपण, हा सर्वसाधारण रुढ संकेत त्यांनी पॉलिटिकल स्टॅटर्जीत वापरला. ज्याचा फायदा त्यांना निकालाच्या आकडेवारीत दिसला. 

अर्थात गेल्या पाच वर्षातील विकासकामे, मोठ-मोठ्या स्वप्नांपेक्षा मूलभूत आणि पायाभूत बाबींना दिलेले प्राधान्य आणि केजरीवाल यांनी स्वतःबद्दल टिकवलेले आश्वासक व्यक्तिमत्त्वाचा विश्वास, हे महत्वाचे घटक आहेतच. तरीही प्रचारातील सकारात्मकता ऐतिहासिक विजयाला मखमली झालर लावून गेली.

जनमानसात उत्तम प्रतिमा असूनही भाजपने केजरीवाल यांच्यावर बेछूट आरोप केले, अगदी पातळीसोडून ! इतके की केजरीवाल यांना दहशतवाद्याची उपमा दिली. पण भाजपकडून झालेल्या आरोपांना केजरीवालांनी अगदी शांतपणे सामोरे जात भावनिक उत्तरे दिली आणि दिल्लीकरांच्या मनातील स्थान आणखी घट्ट केले. 

याचा प्रचंड फायदा केजरीवाल यांना झाला. विधानसभा मतदारसंघातील उमेदवाराऐवजी आपले मत केजरीवाल यांना जात आहे, या भावनेने दिल्लीकरांना मते दिली.

एकीकडे शाहीनबाग येथील आंदोलनावरुन देशभर रान पेटले असताना केजरीवाल यांनी या वादात न पडणे पसंत केले. मात्र दुसरीकडे भाजपने शाहीनबाग हाच प्रचाराचा मुख्य अजेंडा केला. 

त्यावरुन आक्रमक वक्तव्ये केली गेली. केजरीवाल यांना घेरण्याचा प्रयत्न झाला. असे असतानाही त्या जाळ्यात न अडकता केजरीवाल अलिप्त राहिले आणि भाजपला दिल्लीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण ? या दुखऱ्या नसेवर बोट ठेवणारा प्रश्न विचारत राहिले. कारण भाजप शेवटपर्यंत केजरीवाल यांच्या या प्रश्नाचे दिल्लीकरांचे समाधान होऊन, असे उत्तर देऊ शकली नाही.

 निवडणुकीला 'चेहरा' देण्याचा भाजपचा ट्रेंड दिल्लीत त्यांच्याच अंगलट आला.

दिल्ली सरकारच्या एका शाळेच्या इमारतीसंदर्भात भाजपचे दिल्लीतील खासदार आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यांनी ट्विट केलेला व्हिडिओ केजरीवाल यांच्या 'आप'ने पुराव्यानिशी उघडा पाडला. नकारात्मक राजकारणाला लावलेली ही चपराक इतकी प्रभावी ठरली की असे 'खोटे' आरोप पुन्हा झालेच नाहीत. 

त्यातच कडी म्हणजे केजरीवाल यांनी काही वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीदरम्यान प्रत्यक्ष विकासकामे दाखवली, त्याची सद्यस्थिती आणि पुढे काय? यावर केजरीवाल बोलत राहिले. दुसरीकडे 'इव्हीएमचे बटन इतके जोरात दाबा, की करंट शाहीनबागला बसला पाहिजे' याच प्रचारात भाजप अडकली, इतकी की आमदारांची दोन आकडी संख्याही आणता आली नाही.

अवघ्या आठेक महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत दिल्लीतील लोकसभाच्या सर्वच्या सर्व जागा भाजपने जिंकल्या. यात भाजपपेक्षा पंतप्रधान मोदींच्या वैयक्तीक करिष्म्याचे यश केजरीवाल यांनी वेळीच ओळखले आणि मोदींवर थेट टीका न करता गृहमंत्री अमित शाह यांना प्रश्न विचारायला सुरुवात केली. 

मोदींवर टीका न करणे, हेही केजरीवाल यांच्या चांगलेच पथ्यावर पडले. कारण लोकसभेला मोदींना भरभरून मते दिलेल्या दिल्लीकरांनीच विधानसभेला आपली मते केजरीवालांच्या पारड्यात टाकली. शाहीनबागपासून काहीसे अंतर ठेवणे हेही केजरीवाल यांच्या पथ्यावर पडले. सॉफ्ट हिंदुत्व असणारे दिल्लीकर केजरीवालांकडे झुकले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com