दिल्लीकर शनिवारी देणार कौल ! विकासकामे की धुव्रीकरणाची लढाईचा मुद्दा ! ! !

निवडणुकीच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व भाजप प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांच्यासह अनेक नेत्यांनी मंदिरांमध्ये जाऊन आपल्या विजयाचे साकडे घातले. केजरीवाल यांनी कॅनॉट प्लेसमधील प्रसिध्द हनुमान मंदिरात जाऊन शक्तीदात्याची प्रार्थना केली तर तिवारी यांनी छत्तरपूरच्या कात्यायनी देवी मंदिरात जाऊन पूजापाठ केले.
 दिल्लीकर शनिवारी देणार कौल ! विकासकामे की धुव्रीकरणाची लढाईचा मुद्दा ! ! !

नवी दिल्ली : भारताचे " दिल' असलेल्या व आसेतू हिमाचल चर्चेचा विषय बनलेल्या दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी उद्या (ता.8) मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने दारूबंदीसह सारे उपाय केले असून सुरळीत मतदानासाठी यंत्रणा सज्ज ठेवली आहे. सत्तारूढ आम आदमी पक्षाने विकासकामांवर पुन्हा दिल्लीकरांचा कौल मागितला आहे. धार्मिक ध्रुवीकरणाचे कार्ड खेळतानाच भाजपने छोट्याशा दिल्लीत केंद्र व 15 राज्यांतील महाप्रचंड सत्ताशक्तीला मैदानात उतरवून "आप' कडून सत्ता हस्तगत करण्यासाठी सारी ताकद पणाला लावली आहे. 

निवडणुकीच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व भाजप प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांच्यासह अनेक नेत्यांनी मंदिरांमध्ये जाऊन आपल्या विजयाचे साकडे घातले. केजरीवाल यांनी कॅनॉट प्लेसमधील प्रसिध्द हनुमान मंदिरात जाऊन शक्तीदात्याची प्रार्थना केली तर तिवारी यांनी छत्तरपूरच्या कात्यायनी देवी मंदिरात जाऊन पूजापाठ केले. केजरीवाल यांनी ट्विट केले की ""आज मी प्राचीन हनुमान मंदिरात जाऊन हनुमानाचा आशीर्वाद घेतला व देश आणि दिल्लीच्या प्रगतीसाठी प्रार्थना केली. हनुमानाने मला सांगितले की चांगले काम करत आहेस. याच पध्दतीने लोकांची सेवा करत रहा. फळ देणे माझ्यावर सोड. सारे काही चांगले होईल.'' शाहीन बागेच्या नावाने खडे फोडणाऱ्या पंडित तिवारी यांच्या कानात देवीने काय सांगितले हे बाहेर समजले नाही. 

पंतप्रधान मोदींनी राममंदिराबाबत ट्रस्ट स्थापण्याच्या घोषणेसाठी दिल्लीचा प्रचार थांबवण्याचा मुहूर्त निवडला. भाजपने तर मुख्यमंत्रीसारख्या घटनात्मक पदावरील केजरीवाल यांना अतिरेकीच ठरविले व त्याची दिल्लीकरांत तीव्र प्रतीक्रिया आहे. केजरीवाल यांनी भाजपच्या विखारी टीकेला, भर सभेत हनुमान चालीसा म्हणून प्रत्युत्तर दिले. केजरीवाल यांनी शासन म्हणून अत्यंत अल्प शक्ती हाती असूनही गेले किमान चार महिने मोफत वीज, मोफत पाणी व महिलांना मोफत बस प्रवास यासारख्या "इलेक्‍शन गिप्टस्‌' चा वर्षाव केला आहे. आप सरकारची मोहल्ला क्‍लिनीक व सरकारी शाळांचे अंतर्बाह्य पालटलेले रूप याही आपच्या जमेच्या बाजू आहेत. 

भाजपने भारत पाकिस्तान व ध्रुवीकरणाकडे प्रचाराची गाडी वळविण्याचे प्रयत्न केले. मोदींचे मंत्री अनुराग टाकूर, उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उर्फ अजयसिंह बिश्‍त, खासदार प्रवेश वर्मा यांनी अत्यंत भडक भाषणे केली. यातील वर्मा व ठाकूर यांच्यावर प्रचारबंदी लादण्याची कारवाई निवडणूक आयोगाने केली. अखेरच्या दिवशी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या कधीकाळच्या ओएसडीला कथीतरित्या लाच घेताना पकडल्याचा प्रचार भाजपने केला तर सिसोदिया यांनी संबंधिताला कडक शिक्षा द्या अशी जाहीर मागणी करून भाजपच्या प्रचाराची हवा काढून घेतली. भाजप अखेरच्या दोन दिवसांतही बूथनिहाय व प्रत्येक मतदाराला गाठून प्रचार करत आहे. 
मुस्लिमांचा कौल कोणाला ? 
सीएए कायद्याच्या पार्श्‍वभूमीवर दिल्लीतील मुस्लिम मतदाराचा कौल कोणाकडे रहाणार याबाबत उत्सुकता आहे. दिल्लीच्या सुमारे दोन कोटी लोकसंख्येपैकी 16 ते 18 टक्के मुस्लिम समाजाची लोकसंख्या आहे व त्यातील मतदार 12 टक्के आहेत. हा समाज पारंपारिकदृष्ट्या कॉंग्रेसचा व आता आपकडे वळलेला मतदार मानला जातो. किमान 9 ते 10 मतदारसंघांत मुस्लिम मत टक्का 20 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त आहे. यात सीलमपूर (50 टक्के) मटिया महल (48), ओखला (43), बल्लीमारन (38), मुस्तफाबाद (36), बाबरपूर (35) यासारख्या मतदारसंघांचा समावेश आहे. 
निवडणूक आयोग सज्ज 
उद्या सकाळी 8 ते संध्याकाळी पाच या वेळेत होणाऱ्या मतदानासाठी निवडणूक आयोग सज्ज झाला आहे. तब्बल 40 हजार दिल्ली पोलिस, अर्धसैनिक दलाच्या 190 कंपन्या व 19 हजार होमगार्डस बंदोबस्तासाठी सज्ज असतील. मतदान काळात सोशल मिडीयावर अफवा पसरविणाऱ्यांपासून, कायदा सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्यांपर्यंत साऱ्या समाजकंटकांचा बंदोबस्त करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी कंबर कसली आहे. 

सोशल मिडीयावरील पोस्टवर दिल्ली पोलिसांची कडक नजर रहाणार असल्याचे सायबर सेलप्रमुखांनी म्हटले आहे. दिल्लीतील 545 मतदानकेंद्रे संवेदनशील घोषित करण्यात आली आहेत. अवैधरीत्या दारू वाटणाऱ्या 15 वाहनांच्या जप्तीसह किमान 120 लोकांची धरपकड करण्यात आली आहे. जप्त केलेल्या अवैध हत्यारांचीही संख्या मोठी आहे. 

शाहीन बागेतील निदर्शनांना विराम 
सीएए नामक काळ्या कायद्याला विरोध करण्यासाठी गेले दीड महिना शाहीन बागेच्या रस्त्यावर भर थंडीतही तळ ठोकून बसलेल्या हजारो महिलांची शांततापूर्ण निदर्शने हा संपूर्ण जगभरात चर्चेचा विषय ठरला. उद्या मतदान असल्याने मतदारांच्या सुविधेसाठी या आंदोलनकर्त्यांनी प्रदर्शन एका दिवसासाठी स्थगित केले आहे. उद्या (ता. 8) रात्री 8 पासून पुन्हा सीएएविरोधी निदर्शने सुरू होतील असे सांगण्यात आले. प्रचारात भाजपने तिरंगा हाती घेऊन व राष्ट्रभक्तीची गीते गाऊन होणाऱ्या या प्रदर्शनांना देशविरोधी व पाकिस्तानवादी ठरविले. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्यापासून साऱ्या भाजप नेत्यांनी शाहीनबागेत देशविरोधी प्रदर्शने चालली असल्याचा प्रचार केला. मोदींनी सीएएविरोधी प्रदर्शनकर्त्यांच्या कपड्यांचा सूचक उल्लेख केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com