भाजपचे सत्तावन्न उमेदवार जाहीर, केजरीवालांविरूध्दचा उमेदवार कोण ?

"" दिल्ली चले मोदी के साथ ! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या खंबीर नेतृत्वाखाली दिल्लीत यंदा भाजपचा बहुमताने विजय सुनिश्‍चित आहे.''- श्‍याम जाजू, भाजप दिल्ली प्रभारी.
 भाजपचे सत्तावन्न उमेदवार जाहीर, केजरीवालांविरूध्दचा उमेदवार कोण ?

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी 70 पैकी 57 उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर केली. यात 11 अनुसूचीत जातीचे असून चार महिला तर विजेंद्र गुप्ता यांच्यासह तिन्ही आमदारांना तिकीटे देण्यात आली आहेत. आपचे मोठे आव्हान असल्याने बंडखोरी टाळण्यासाठी भाजपने 2015 मध्ये आपटलेल्या 26 उमेदवारांना पुन्हा तिकीटे दिली आहेत. मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण तसेच खुद्द अरविंद केजरीवाल यांच्याविरूध्द नवी दिल्लीतून कोण, हे सवाल मात्र भाजपने अनुत्तरितच ठेवले आहेत. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासमोर पटपडगंजमधून रवी नेगी यांना पक्षाने तिकीट दिले आहे. 

प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी पक्षाचे प्रभारी प्रकाश जावडेकर, दिल्लीचे श्‍याम जाजू व तरूण चुग यांच्या उपस्थितीत आज दिल्लीची भाजप उमेदवारी यादी जाहीर केली. उर्वरीत 13 उमेदवारही लवकरच जाहीर होतील असे ते म्हणाले. दिल्लीत 8 फेब्रुवारीला मतदान व संसद अदिवेशन पूर्वार्धाच्या अखेरच्या दिवशी, 11 फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहेत. भाजपाध्यक्ष अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, कार्याध्यक्ष जे पी नड्डा ,केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आदींच्या उपस्थितीत काल रात्री 8 पासून चार तास चाललेल्या केंद्रीय निवडणूक समितीच्या मॅरेथॉन बैठकीत बहुतांश उमेदवारांची नावे निश्‍चित करण्यात आली. 

आपची यादी जाहीर झाल्यानंतर त्या पक्षातील नाराजी, बंडखोरी आणि गोंधळ पहाता दिल्लीकर मतदार यंदा मोदींच्या कणखर नेतृत्वाखालील भाजपलाच विजयी करतील असा विश्‍वास जाजू यांनी व्यक्त केला. मोदी सरकारने अनधिकृत वस्त्या कायदेशीर करून 40 लाख दिल्लीकरांना हक्काचे घर मिळवून दिले त्याची पावती जनता देईल असेही त्यांनी सांगितले. केंद्रात दुसऱ्यांदा सत्ता मिळाल्यावर राजधानीतील 2015 मधील दारूण पराभवाचा डाग पुसण्यासाठी भाजपने अटीतटीचा जोर लावला आहे. दिल्ली काहीही करून जिंकायचीच, असा निर्धार केलेल्या भाजप नेतृत्वाने यंदा धडाधड तिकीटे कापण्यासारखे शक्तीचे प्रयोग करण्याचा धोका टाळला आहे. 

आपमधून आलेल्या कपिल मिश्रा यांच्यारसाख्या मोजक्‍याच चेहऱ्यांना पहिल्या यादीत स्थान मिळाले आहे. मोजक्‍या चार महिला उमेदवारांत विभा गुप्ता, लता सोढ़ी, शिखा राय व किरण वैद्य यांचा समावेश आहे. सर्वश्री गुप्ता (रोहिणी), जगदीश प्रधान (मुस्तफाबाद )व ओ.पी शर्मा (विश्वासनगर ) या तिन्ही आमदारांना आहे तेथेच कायम ठेवण्यात आले आहे. मात्र अकाली दल व इतर मित्रपक्षांना किती जागा देणार याचबाबत भाजपने खुलासा केला नसला तरी राजौरी गार्डन, राजेंद्र प्लेस, सुभाषनगर यासारख्या शीख बहुवस्तीच्या मतदारसंघांत आज उमेदवार जाहीर केलेले नाहीत. शहा यांनी महापालिका निवडणुकीतील रणनीती पूर्ण बदलून सारेच्या सारे पक्षनेते बदलणार, हा हट्ट मागे घेतल्याचे दिसते. मागच्या निवडणुकीत आपकडून हरलेल्या व नंतरही पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या 26 जणांना भाजपने तिकीटे दिली आहेत. 

जाहीरनामा पुढच्या आठवड्यात 
भाजपचा दिल्ली जाहीरनामा पुढील आठवड्यात शहा किंवा नड्डा यांच्या हस्ते प्रकाशित केला जाईल. यासाठी भाजपने जनतेकडून सूचना मागविल्या होत्या. पक्षाला 11 लाखांहून जास्त दिल्लीकरांनी सूचना पाठविल्या आहेत. यात सीएए व एनआरसी कायद्यांपासून दिल्लीतील भीषण वाहतूक कोंडी, पिण्याचे घाण पाणी, कचरा यासारख्या समस्यांवर उतारा करण्याच्याही सूचना यात आहेत. मात्र आपला टक्कर देण्यासाठी वीज व पाणीबिलात भाजप किती सूट किंवा सबसिडी देणार हे जाहीर करण्याचा आग्रह अनेकांनी धरला आहे. 

प्रमुख भाजप उमेदवार 
- विजेंद्र गुप्ता (रोहिणी) - कपिल मिश्रा (मॉडेल टाऊन) - सुमनकुमार गुप्ता (चांदनी चौक) - रामबीरसिंह बिधुडी (बदरपूर) - माजी महापौर रवींद्र गुप्ता (मटिया महल) 
- माजी महापौर खुशीराम (आंबेडकर नगर) - योगेंद्र चंदोलिया (करोल बाग) - परवेश रतन (पटेलनगर) - राजीव बब्बर (टिळकनगर) - आशीष सूद (जनकपुरी) 
- संजय सिंह (विकासपुरी) - प्रद्युम्न राजपूत (द्वारका) - सरदार आर पी सिंह (राजेंद्रनगर ) - शिखा राय (ग्रेटर कैलास) - अनिल शर्मा (आर के पूरम) 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com