दिल्ली गोठली...दिल्ली पेटली ! थंडीतही आंदोलनांची धग कायम

दिल्ली गोठली...दिल्ली पेटली ! थंडीतही आंदोलनांची धग कायम

नवी दिल्ली : दिल्लीसह राष्ट्रीय राजधानी एनसीआरमधे सर्वसामान्य लोक थंडीच्या तीव्र लाटेत कुडकुडले असून दिल्ली गोठल्याची स्थिती असली तरी नागरिकत्व कायद्याच्या विरोधातील आंदोलनांनी राजकीय हवा विलक्षण तापली आहे. काळा कायदा हद्दपार करण्याच्या जिद्दीने पेटून उठलेल्या आंदोलकांच्या उर्जेने कडाक्‍याच्या थंडीवर मात केल्याचे चित्र आहे. उबदार कपड्यांची "भिंत' ओलांडून गारठा अंगात शिरत असताना नागरिकत्व दुरूस्ती कायद्याच्या (सीएए) विरोधातील आंदोलनाची धग वाढतच चालली आहे. 

सीएएच्या विरोधात आजही जामियाच्या तरूणाईने मंडी हाऊसपासून पदयात्रा काढण्याचा प्रयत्न केला त्याला दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारली. डिसेंबरमधील थंडीने यंदा गेल्या पाच वर्षांतील विक्रमही तोडला असून रात्रीच्या वेळेस पारा 4 ते 5 अंशांपर्यंत तर दिवसा तो 9 अंश सेल्सिअसपर्यंत घसरला आहे. दिवसा सूर्यदर्शनही दुर्मिळ झाले असून किमान येत्या महिनाअखेरपर्यंत दिल्लीकरांना थंडीचा मारा झेलावा लागणार असा अंदाज हवामान विभागाने अंदाज वर्तविला आहे. 

दिल्लीत दिवसाही वाहनांचे दिवे लावून जावे लागत आहे. मात्र या थंडीतही सीएएला विरोध करणाऱ्या तरूणाईकडून "हाऊ ईज द जोश, हाय सर' चा अनुभव मिळत आहे. कॉंग्रेसने काल संध्याकाळी अंधार पडल्यावर राजघाटावर केलेल्या आंदोलनाच्या समारोपावेळी कडाक्‍याच्या थंडीवर मात केलेल्या तरूण तरूणींची संख्या लक्षणीय होती व कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, डॉ. मनमोहनसिंग, राहुल गांधी हे नेते राज्यघटनेच्या मसुद्याचे वाचन करत असताना थंडीने कुडकुडणारे हजारो हात एका क्षणात वर गेल्याचे विलक्षण दृश्‍यही पहायला मिळाले. 

जामियातील विद्यार्थ्यांनी आज मंडी हाऊसपासून जंतरमंतरपर्यंत शांतता मार्च काढण्याचे नियोजन केले होते. मात्र पोलिसांनी त्याला परवानगी नाकारली. मंडी हाऊसपाशी जमाव एकजूट होऊ नये यासाठी मोठा पौजफाटा तैनात केला गेला. दिल्लीतील अनेक मेट्रो स्थानके कधीही बंद होऊ शकतात अशी परिस्थिती आहे. सीएए आंदोलनात हुतात्मा झालेल्यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी गेलेले राहुल व प्रियांका गांधी यांना मेरठमध्ये योगी सरकारने अडविले तरी त्याची संतप्त प्रतिक्रिया दिल्लीतील तरूणांमध्ये उमटली. 
फोटो सेशनपुरते कपडे वाटप 
दिल्लीत थंडीचा जोर वाढला असताना या जीवघेण्या गारठ्यात गोरगरीबांची व दिल्लीबाहेरून मजुरीसाठी आलेल्यांची अवस्था अतिशय करूण आहे. अनधिकृत वस्त्यांसह ठिकठिकाणी बसथांब्यांलगत व दिल्लीगेट, निजामुद्दीन, यमुना बाजार, अक्षरधाम, यमुनेच्या काठांवर यासारख्या भागांत दिल्ली सरकारने उभारलेल्या आश्रयगृहांत (रैन बसेरा) हे हजारो अभागी जीव आपल्या चिमुकल्यांसह कुडकुडत रात्र काढतात ते दृश्‍य अंगावर काटा आणणारे असते. गरीबांना उबदार कपडे व ब्लॅंकेट वाटण्याचे "फोटो सेशन' झाले की उच्चपदस्थांसह संबंधित कार्यकर्तेही गायब होतात असा अनुभव हा वर्ग घेत आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com