Delhi Assembly Elections Trend | Sarkarnama

दिल्लीत भाजप बहुमताच्या दिशेने : आपची धुळदाण

वृत्तसंस्था
बुधवार, 26 एप्रिल 2017

दिल्लीतील तीनही महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाल्याचे चित्र आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार दिसत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने हा विजय सुकमा येथे नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांना समर्पित केला आहे.

नवी दिल्ली - दिल्लीतील तीनही महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाल्याचे चित्र आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार दिसत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने हा विजय सुकमा येथे नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांना समर्पित केला आहे.

भाजपच्या '11, अशोका रोड' येथील मुख्यालयाबाहेर पोस्टर लावण्यात आले आहे. त्यावर 'मॉं तुझे सलाम, सुकमा शहीदों को समर्पित है यह जीत' असा हिंदी भाषेत संदेश लिहिला आहे. पोस्टरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि मनोज तिवारी यांच्या छायाचित्रही लावण्यात आले आहे. तीनही महानगरपालिकेतील एकूण 270 जागांपैकी 180 जागांवर भाजपने आघाडी मिळविली आहे. दरम्यान आम आदमी पक्षासह काँग्रेसही मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

काँग्रेस नेत्या आणि दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी काँग्रेसने प्रभावी प्रचार केला नसल्याची टीका करत 'मला प्रचार करण्यास सांगितले नाही म्हणून मी प्रचारात उतरले नाही', असेही म्हटले आहे. तर दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा दिला आहे. पुढील एक वर्ष कोणत्याही पदावर न राहता पक्ष कार्यकर्ता म्हणून काम करणार असल्याचेही माकन यांनी जाहिर केले आहे. 'भाजप नेत्यांनी ईव्हीएममध्ये छेडछाड करण्याविषयी पुस्तक लिहिले आहे आणि आता तेच नेते ईव्हीएममध्ये काहीही दोष नसल्याचे म्हणत आहेत', अशी टीका आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केली आहे.

दरम्यान, मोदींच्या विजयरथाला आणखी पुढे घेऊन जायचे आहे. नकारात्मक राजकारण, निमित्ताचे राजकारण चालणार नाही असा स्पष्ट संदेश दिल्लीच्या जनतेने दिला आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी केले. पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर असलेल्या शहा यांनी यावेळी येथील ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारला टीकेचे लक्ष्य केले.

अमित शहा सध्या बंगालमध्ये तीन दौऱ्यांवर आहेत. दीनदयाळ जन्मशताब्दीनिमित्त भाजपचे देशभरातील साडेतीन लाख कार्यकर्ते 15 दिवस, एक महिना आणि काहीजण एक वर्षासाठी पूर्ण वेळ काम करणार आहेत. या उपक्रम उत्तेजन देण्यासाठी शहा स्वतः 15 दिवसांच्या बंगाल दौऱ्यावर गेले आहेत.

माध्यमांशी बोलताना शहा म्हणाले, "मोदींच्या तीन वर्षांच्या कामकाजावर एक प्रकारे शिक्कामोर्तब केले आहे. मी बंगालच्या उत्तर भागात गेलो होतो. तिथे भाजपला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे.

बंगालमध्ये डाव्यांचे सरकार गेल्यानंतर विकास होईल अशी आशा लोकांना होती. मात्र, ती आशा फोल ठरली. येथे 3 लाख 50 हजार कोटींचे कर्ज बंगाली जनतेवर असून, भ्रष्टाचार कमी होण्याचे नाव घेत नाही. बंगालची जनता राज्यकर्त्यांना जाब विचारत आहे. पूर्वी बँकांमध्ये जमा ठेवींमध्ये बंगालचा हिस्सा 18 टक्के होता. डाव्या सरकारच्या काळात तो 12 टक्क्यांवर आला, आणि आता तर हा हिस्सा केवळ सहा टक्क्यांवर आला आहे.

आतापर्यंत हाती आलेले कल खालीलप्रमाणे
■ उत्तर दिल्ली महानगरपालिका (एकूण जागा 103)
भाजप - 63; आप - 24; काँग्रेस - 13; अन्य - 3
■ पूर्व दिल्ली महानगरपालिका (एकूण जागा 63)
भाजप - 47; आप - 9; काँग्रेस - 4; अन्य - 3

■ दक्षिण दिल्ली महानगरपालिका (एकूण जागा 104)
भाजप - 70; आप - 16; काँग्रेस - 12; अन्य - 6

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख