दिल्लीतील प्रदूषणाबद्दलच्या चर्चेतही राजकारणाचा धूर !

जावडेकर यांनी त्यांच्या भाषणातही पुण्यातील ग्रीन फॉरेस्ट, स्कूल नर्सरी आदी उदाहरणे दिली. सरकारांबरोबरच नागरिकांचीही जबाबदारी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. प्रत्येक भारतीयाने 7 झाडे जगवून, वाढवून स्वतःची ऑक्‍सिजन बॅंक तयार करावी यासाठी लोकजागर करण्यात येईल असे ते म्हणाले. विदुला सत्यनाथ, सत्यनारायण जतिया, अशोक वाजपेयी, दिग्विजयसिंह, महंमद अली खान, कहेकशा परवीन आदींनीही भाषणे केली.
  दिल्लीतील प्रदूषणाबद्दलच्या चर्चेतही राजकारणाचा धूर !

नवी दिल्ली : बहुतांश उत्तर भारतासह -जगातील सर्वांत प्रदूषित राजधानी असा कुलौकिक प्राप्त झालेल्या राष्ट्रीय दिल्ली परिसरातील दोन कोटी लोकांचा जीव धोक्‍यात आणणाऱया विषारी वायूप्रदूषणावर राज्यसभेत आज वादळी चर्चा झाली. मात्र वंदना चव्हाण, जया बच्चन आदी तुरळक सदस्य वगळता इतरांची भाषणे विषयाच्या गांभीर्यापेक्षा पक्षीय आरोप प्रत्यारोपांच्या विषारी धुरात - स्मॉगमध्ये हरवून गेल्याचे विदारक वास्तव पहायला मिळाले. वृक्षसंगोपन व पर्यावरणरक्षण हे जनआंदोलन बनावे असे आवाहन वन व पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी चर्चेच्या उत्तरात केले. 

दिल्लीत महिनाभरापासून ठाण मांडून बसलेल्या अतिघातक प्रदूषणाची दखल संसद अधिवेशन सुरू झाल्याने घेतली गेली व राज्यसभेने आज या विषयावर चर्चा केली. शेजारच्या राज्यातील शेतकऱयांना पराली कापण्यासाठी 56 हजार यंत्रे दिल्याचे जावडेकर यांच्या निवेदनात म्हटले मात्र याच सरकारने सर्वोच्च न्यायालयाला दिलेल्या निवेदनात हा आकडा 20 हजार आहे. मग 26 हजार कापणी यंत्रे कोठे गायब झालीत, असा गंभीर आरोप "आप' चे संजय सिंह यांनी करताच सत्तारूढ बाकांवर शांतता पसरली. 

भारतात केवळ हवेच्या प्रदूषणामुळे दर 3 मिनीटांनी एका बालकाचा मृत्यू होतो, असे चव्हाण यांनी सांगताच वातावरण गंभीर बनले. आरोप प्रत्यारोपाचे खेळ न खेळता सर्व पक्षांनी गंभीरपणे प्रदूषणावर उपाय करावेत असे सांगून चव्हाण म्हणाल्या की मंत्र्यांनी जे निवेदन दिले ते त्यांच्या दृष्टीने ठीक असले तरी ही वेळ स्वतःची पाठ थोपटून घेण्याची नव्हे तर प्रदूषण कमी करण्यासाठी गंभीर उपाय करण्याची आहे. पुण्याच्या धर्तीवर प्रत्येक शहरात कार्बन व ग्रीन फॉरेस्टची निर्मिती करावी. जावडेकर यांनी त्यांच्या भाषणातही पुण्यातील ग्रीन फॉरेस्ट, स्कूल नर्सरी आदी उदाहरणे दिली. सरकारांबरोबरच नागरिकांचीही जबाबदारी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. प्रत्येक भारतीयाने 7 झाडे जगवून, वाढवून स्वतःची ऑक्‍सिजन बॅंक तयार करावी यासाठी लोकजागर करण्यात येईल असे ते म्हणाले. विदुला सत्यनाथ, सत्यनारायण जतिया, अशोक वाजपेयी, दिग्विजयसिंह, महंमद अली खान, कहेकशा परवीन आदींनीही भाषणे केली. 

संजय सिंह यांच्या भाषणात भाजप खासदारांनी प्रचंड अडथळे आणले तरी सिंह यांनी जिद्दीने खिंड लढविली. जावडेकर यांनी जारी केलेले वक्तव्य त्यांनी तसेच कॉंग्रेसचे प्रताप सिंग बाजवा यांच्यासह अनेकांनी साफ फेटाळले व सरकार संसदेत दिल्लीचे प्रदूषण घटल्याचा धडधडीत दावा कसा करू शकते असा सवाल उपस्थित केला. जर प्रदूषण घटले असेल तर त्यामागे दिल्ली सरकारची ऑड इव्हन योजना, 24 तास अखंड वीजपुरवठा, दिल्लीच्या ग्रीन कव्हरमध्ये झालेली 12 टक्के वाढ, बांधकामांवर सक्तीने बंदी या उपाययोजना असल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना शिव्या देऊन, त्यांच्या आजाराची थट्टा करून दिल्लीचे प्रदूषण कमी होणार असेल तर खुशाल द्या, पण तुमच्या या मानसिकतेची शरमच वाटते असे त्यांनी भाजपला सुनावले. 

दिल्लीतील प्रदूषण अतिघातक असल्याचा अहवाल ग्रीनपीससारख्या संस्था सतत देत असताना प्रदुषण घटल्याचे मंत्री कोणत्या तोंडाने सांगतात असे सांगून बाजवा म्हणाले की आरोग्यमंत्री म्हणतात प्रदूषण वाढले तर गाजरे खा, जावडेकर म्हणतात, प्रदूषण वाढले तर संगीत ऐकून दिवसाची सुरवात करा ! ही काय थट्टा चालविली आहे असेही बाजवा कडाडले. 
शेतकऱ्यांवर खापर कशासाठी ? 
खुद्द दिल्लीकरच प्रदूषण निर्मूलनाचे नियम तोडतात व प्रदूषणाचे सारे खापर शेजारच्या राज्यांतील शेतकऱयांवर फोडले जाते, हे अन्यायकारक असल्याचेही वक्‍त्यांनी सांगितले. हरियाणा पंजाबातील शेतकरी गेली कित्येक दशके शेतातील काडीकचरा जाळत असताना ते आजच याबाबतीत व्हीलन कसे ठरतात, असा सवाल करण्यात आला. चर्चेतील राजकारण पाहून राज्यसभाध्यक्ष वेंकय्या नायडू यांच्यावर प्रदूषण व राजकारण हे वेगवेगळे ठेवा, असे आवाहन करण्याची वेळ आली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com