Delay in CBI selection panel meet rule out senior officer | Sarkarnama

मोदी यांनी एक दिवसाचा उशीर केला आणि IPS रिना मित्रा यांची `टाॅप जाॅब`ची संधी गेली...

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 6 फेब्रुवारी 2019

पश्चिम बंगालच्या पहिल्या आयपीएस अधिकारी रिना मित्रा यांची सीबीआयच्या पहिल्या महिला संचालक होण्याची संधी एका दिवसाने हुकली. याबद्दल त्यांनी एक लेख लिहिला आहे. सर्वच पोलिस अधिकारी आणि इतरांसाठी तो वाचनीय आहे.  

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक दिवसाचा उशीर केला आणि ज्येष्ठ आयपीएस अधिकारी व विशेष सचिव (अंतर्गत सुरक्षा) रिना मित्रा यांची मोठी संधी गेली. ही संधी होती केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) संचालक होण्याची. रिना मित्रा या 31 जानेवारीला निवृत्त झाल्या आणि मोदींनी संचालक निवडण्यासाठी त्यानंतरचा दिवस निवडला.

रिना मित्रा या पश्चिम बंगालाच्या पहिल्या महिला आयपीएस अधिकारी. त्यांची 1983 मध्ये मध्य प्रदेशमध्ये नियुक्ती झाली. 31 जानेवारी 2019 पर्यंत त्या देशातील सर्वात ज्येष्ठ पोलिस अधिकारी होत्या. सीबीआयच्या टाॅप जाॅबसाठी त्या सर्वात पात्र उमेदवार होत्या. सीबीआयमध्ये काम केलेल्या, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची जबाबदारी सांभाळलेल्या, सर्वात ज्य़ेष्ठ अशा सर्व निकषांमध्ये त्या बसत होत्या. त्यांची नियुक्ती 31 जानेवारी रोजी झाली असती तर त्या पुढील दोन वर्षांसाठी सीबीआय संचालक म्हणून राहू शकत होत्या. मात्र त्यांची संधी गेली ती गेलीच.

ही संधी गेल्यानंतर मित्रा यांनी कोलकत्त्यातील `द टेलिग्राफ`मध्ये एक लेख लिहिला आहे. त्यांनी आपला जीवनप्रवास यात मांडला आहे. मुलगी म्हणून लहाणपणापासून मिळणारी वागणूक आणि महिला म्हणून प्रशासनात आलेले अनुभवांविषयी त्यांनी यात लिहिले आहे. एक महिला, पत्नी आणि अधिकारी म्हणून समाधानकारक आणि समाजासाठी काही केल्याचा आनंद देणारे जीवन अनुभवल्याचे त्यांनी या लेखात नमूद केले आहे. 

एका खाण कामगाराची मुलगी असलेल्या रिना यांच्या घरात पैशाची चणचण होती. त्यामुळे त्यांना शाळेत पाठविले जात नव्हते. खाणी असलेल्या दुर्गम भागातील घरातच त्यांना राहावे लागत होते. एक भाऊ त्यांच्यासाठी भांडला आणि रिना यांची शाळा सुरू झाली. शिक्षण घेत त्या पश्चिम बंगालच्या पहिल्या पहिला आयपीएस अधिकारी बनल्या. एका महिलेला तसे मूक प्रोत्साहन मिळाल्याचा अनुभन त्यांनी सांगितला. एक महिला पोलिस अधिकाऱ्याचे कर्तव्य कसे बजावणार, असाही प्रश्न त्यांना विचारला गेला. लग्न झाले, मुलगा झाला तेव्हाही मूल झालेल्या महिलेने पोलिसाची नोकरी करणे म्हणजे आईचा बेजबाबदारपणा, असे हिणवले गेले. मात्र या साऱ्या प्रवासात आयपीएस पतीची साथ मोलाची मिळाल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

आयुष्यभर प्रामाणिकपणे, निर्भयपणे आणि सक्षमतेने काम केले, याचे समाधान आहे. विशेष सचिव (अंतर्गत सुरक्षा) हे पद एका महिलेने सांभाळल्याचे हे पहिलेच उदाहरण. ते जबाबदारीने सांभाळता आल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. 

एसपी म्हणून स्थानिक लोकांशी संंबंध ठेवताना, प्रभावशाली आणि लागेबांधे असलेल्या कुटुंबांची अधिकारी म्हणून चौकशी करताना आणि अधिक जबाबदारीचे पद घेण्यासाठी मन उत्सुक असताना तुम्हाला तुमच्या मूल्यांशी तडजोड न करण्यासाठी मोठे धैर्य लागते. पोलिस खात्यातील नोकरी तुमच्या धैर्याची सीमा पाहते, असे त्यांनी लेखात म्हटले आहे. महिला म्हणून दर वेळी विविध सीमा तोडाव्या लागतात. सीबीआयची संधी ही माझ्यासाठी शेवटची सीमा होती. ती तोडता न आल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. 

मला महिला अधिकारी म्हणून सीबीआयमध्ये नियुक्ती नको होती. तर एक कार्यक्षम अधिकारी म्हणून नियुक्ती होणे आवडले असते. इतर अधिकाऱ्यांना पैसा आणि पद सहज मिळते म्हणून तुम्ही अस्वस्थ होण्याचे कारण नाही. रात्रीची सुखाची लागणारी झोप, हे तुमचे सर्वात मोठे बक्षीस आहे, असे मित्रा यांनी या लेखात म्हटले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख