'दाऊदी बोहरा' संस्थेची वेदनेवर फुंकर; गरजुंना घरपोच डबा अन्‌ औषधे ! 

सध्या सुरू असलेल्या संचारबंदीत रस्त्यावरील गर्दी कमी व्हावी यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग, महापालिकेच्या मदतीसाठी अनेक स्वयंसेवी संस्था पुढे येत आहेत. अशा संस्थापैकीच अंजुमने हकीमी दाऊदी बोहरा ट्रस्ट गरजू रुग्णांना घरपोच औषधे पुरवून त्यांच्या वेदनेवर फुंकर घालत आहे
Dawoodi Bohra Community Helping Nashik Administration During Lock Down
Dawoodi Bohra Community Helping Nashik Administration During Lock Down

नाशिक : रुग्ण मग तो कोणाताही असो त्याला वेळेवर औषधे मिळाली तर त्याचा अर्धा आजार बरा होतो. सध्या सुरू असलेल्या संचारबंदीत रस्त्यावरील गर्दी कमी व्हावी यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग, महापालिकेच्या मदतीसाठी अनेक स्वयंसेवी संस्था पुढे येत आहेत. अशा संस्थापैकीच अंजुमने हकीमी दाऊदी बोहरा ट्रस्ट गरजू रुग्णांना घरपोच औषधे पुरवून त्यांच्या वेदनेवर फुंकर घालत आहे. 

या संस्थेने याआधी घरात अडकून पडलेले ज्येष्ठ तसेच वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी मोफत घऱ्पोच जेवणाचा डबा सुरु केला होता. हा डबा मोफत तर घरपोच देण्याचा खर्च म्हणनू तीस रुपये घेण्यात येतात. त्याची नोंदणी एक दिवस आगाऊ व्हाट्‌स्‌ऍपवर केली जाते. त्यापाठोपाठ त्यांनी जिल्हा प्रशासनाच्या सुचनेनुसार रुग्णांना घरपोच औषधे देण्यास सुरवात केली आहे. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी याविषयी माहिती दिली. 

कोरोनापासून आपल्यासह नाशिककर दूर रहावेत, यासाठी प्रत्येक जण खारीचा वाटा उचलण्यासाठी धडपडत आहे. काही जण घरपोच भाजीपाला, किराणा आदी जीवनावश्‍यक पुरवित आहेत. या संस्थांच्या प्रयत्नांमुळेच कोरोनाचे संकट आजही नाशिकपासून दूर आहे. सेवा देण्याच्या हेतूनेच जिल्हाधिकारी कार्यालयात अंजुमने हकीमी दाऊदी बोहरा ट्रस्ट, नाशिकचे पदाधिऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेवून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ट्रस्टच्या वतीने शासनाला मदतीची तयारी दर्शविली. त्यावेळी श्री. मांढरे यांनी गरजू रुग्णांना आवश्‍यक औषधे घरपोच पुरविण्याची सेवा आपल्या ट्रस्टच्या वतीने देण्यात यावी, असे त्यांनी सांगितले, ट्रस्टच्या सदस्यांनी तत्काळ या उपक्रमाला उत्साहाने प्रतिसाद दिला आहे. 

'स्टे होम स्टे सेफ' असा संदेश देत ट्रस्टकडून या सेवेसाठी सैफी अॅब्युलन्स मेडिकल गट तयार करण्यात आला असून, या गटांतर्गत पॅरामेडिकल्स आणि तीन रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. संचारबंदी असली तरी जीवनावश्‍यक बाबी जसे किराणा आणि औषधी, भाजीपाल्यासाठी अनेकजण घराबाहेर पडतात. त्यामुळे साहजिकच गर्दी होते. हीच बाब ओळखून आता दाऊदी बोहरा ट्रस्टने रुग्णांना घरपोच औषधे देण्यासाठी हेल्पलाईन नंबर सुरू केला आहे. तसेच व्हॉट्‌स ऍप नंबरही दिला आहे. 

नाशिक शहरातील रुग्ण त्याद्वारे ट्रस्टच्या सेवा कार्यकर्त्यांशी संवाद साधू शकतात. मात्र, यासाठी रुग्णाकडे संबंधित औषधाबाबतचे डॉक्‍टरांनी दिलेले प्रिस्क्रीप्शन असणे गरजेचे आहे. ही औषधे जेव्हा घरपोच मिळतील तेव्हा त्यांचे पैसे अदा करावे लागणार असल्याने रुग्णांना या सेवेचा मोठा फायदा होणार आहे. विशेष म्हणजे यासाठी ट्रस्ट कोणताही मोबदला घेत नाही. या उपक्रमाचे कामकाज अम्मार मियाजी बोहरा पाहणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती दिली त्यावेळी अलीसागर सुबा, मुफद्दल कांचवाला, हकीमुद्दीन सलेह आदी उपस्थित होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com