दौंड यांच्या पराभवातून मुंडेंची राजकीय कारकिर्द बहरली; आता त्यांच्याच जागी दौंड यांना आमदारकी...

परळी मतदार संघात दौंड व पंडित ही दोन्ही घराणी राजकीय विरोधक राहिलेली आहेत. दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांना पंडितराव दौंड यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. तर पुढे दौंड यांचा मुंडेंनी दोन वेळा पराभव केला होता. धनंजय मुंडे यांची राजकीय कारकिर्द देखील संजय दौंड यांचा जिल्हा परिषद निवडणुकीत पराभव करुनच सुरु झाली होती.
दौंड यांच्या पराभवातून मुंडेंची राजकीय कारकिर्द बहरली; आता त्यांच्याच जागी दौंड यांना आमदारकी...

बीड : विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीकडून कॉंग्रेसचे संजय दौंड यांना उमेदारी मिळाली असून महाविकास आघाडीचे संख्याबळ पाहता त्यांची आमदारकी दृष्टीक्षेपात दिसत आहे. मात्र, ज्यांच्या जागेवर दौंड विधीमंडळात प्रवेश करणार आहेत त्याच धनंजय मुंडे यांची राजकीय कारकिर्द संजय दौंड यांच्या पराभवाने सुरु झाली होती. असे योग राजकारणातच येऊ शकतात. 

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी परळीत आल्यानंतर खुद्द शरद पवार यांनी संजय दौंड यांना आगामी काळात संधी देण्याचा शब्द दिला होता. त्यानंतर श्री. दौंड आणि त्यांचे वडिल माजी मंत्री पंडितराव दौंड प्रचारात सक्रीय झाले. त्यांनी धनंजय मुंडेंच्या विजयात हातभार लावला म्हणून राष्ट्रवादीने त्यांच्याकडे असलेली विधानपरिषदेची ही जागा कॉंग्रेसच्या दौंड यांना दिली. मात्र यापूर्वीचा इतिहास पाहिला तर परळी मतदार संघात मुंडे - पंडित घराणे एकमेकांचे राजकीय विरोधक राहिलेले आहेत. 1985 च्या विधानसभा निवडणुकीत पंडितराव दौंड यांनी दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा पराभव केला होता. त्यावेळी दौंड यांना मंत्रीपदही मिळाले होते. मात्र, एका वक्तव्यामुळे त्यांना मंत्रीपदावरुन अल्पकाळातच पायउतार व्हावे लागले. पुढे दोन निवडणुकांत पंडितराव दौंड यांना गोपीनाथराव मुंडे यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. 

पुढच्या पिढीतही पंडित - मुंडे असे सामाने रंगले. धनंजय मुंडेंची राजकीय कारकिर्दच मुळात संजय दौंड यांच्या पराभवाने सुरु झाली. गोपीनाथराव मुंडे उपमुख्यमंत्री असताना 1997 मध्ये झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत प्रथम धनंजय मुंडे पट्टीवडगाव गटातून उभे राहीले. त्यांच्या विरोधात संजय दौंड होते. त्यावेळी दौंड यांचा पराभव करुन मुंडेंची राजकीय कारकिर्द सुरु झाली. पुढे 2002 मध्ये झालेल्या निवडणुकीतही असाच सामना आणि असाच निकाल राहिला. पुढे धनंजय मुंडेंना अगोदर भाजप व नंतर राष्ट्रवादीकडून विधान परिषदेची आमदारकी आणि मागच्या काळात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपदही मिळाले. आता दिग्गज नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव केलेल्या धनंजय मुंडे यांना राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्रीपदही मिळाले. 

एकूणच त्यांची राजकीय कारकिर्द बहरली असली तरी त्याची सुरुवात दौंड यांचा पराभव करूनच झाली. एकूणच मुंडे - दौंड घराणे कायम राजकीय विरोधक राहिले. मात्र, विधानसभा निवडणुकीत दौंड पिता - पुत्रांनी धनंजय मुंडेंच्या विजयासाठी प्रयत्न करावेत आणि आगामी काळात त्याचा विचार करू असा शब्द खुद्द शरद पवारांनी दिला होता. आता योग असा कि धनंजय मुंडेंची राजकीय कारकिर्द ज्या दौंड यांच्या पराभवाने झाली तेच दौंड आता मुंडेंच्या रिक्त पदावर विधीमंडळात पहिले पाऊल ठेवणार आहेत. या निमित्ताने दौंड यांच्या घरात 35 वर्षानंतर आमदारकी येणार आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com