daulat karkhana | Sarkarnama

...जेव्हा पुढारी "कैवारी' असल्याप्रमाणे वागतात!

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 17 मे 2017

सलग 11 वेळा कारखाना भाडे तत्त्वावर देण्यासाठी निविदा मागवल्या पण त्यालाही प्रतिसाद मिळाला नाही. कारखाना भाड्याने असो किंवा विक्री देणे असो निविदा प्रसिद्ध झाली की त्याला तालुक्‍यातील नेत्यांचा विरोध ठरलेला असायचा.
 

कोल्हापूर : चंदगड तालुक्‍यातील हलकर्णी येथील दौलत साखर कारखाना सहा वर्षे बंद होता, त्यावेळी शेतकरी किंवा कामगारांविषयी कोणाला कळवळा नव्हता पण कारखाना सुरू झाला आणि तालुक्‍यातील सर्वच नेत्यांना शेतकरी, कामगार यांचे संसार आठवू लागले आहेत. शिवसेनेच्या कोल्हापुरात राहणाऱ्या नेत्यांनाही आता चंदगड तालुक्‍याची आठवण वारंवार होऊ लागली आहे.

मेव्हण्या-पाव्हण्यांच्या राजकारणात तालुक्‍याच्या "दौलत' ची वाट लागली. माजी आमदार कै. नरसिंगराव पाटील व त्यांचे मेव्हणे गोपाळराव पाटील यांच्यातील राजकीय मतभेदाने टोक गाठले, त्याचा पहिला फटका या कारखान्याला बसला. हे दोघेही आपापल्या स्थानी भक्कम राहिले पण कारखान्याचे बुरूज मात्र या भांडणात पूर्ण ढासळले. गेली सहा वर्षे हा कारखाना बंद होता, कारखान्याची मालमत्ता जिल्हा बॅंकेच्या ताब्यात होती. बॅंकेने ही मालमत्ता लिलावात काढण्याचा प्रयत्न केला पण त्याला प्रतिसाद मिळाला नाही.

अनेक प्रयत्नानंतर नुकत्याच संपलेल्या हंगामाच्या सुरवातीला कर्नाटकातील "न्युट्रीयन्स' ने कारखाना 45 वर्षाच्या भाडे कराराने घेतला. त्यानंतर कारखान्यात मोठी गुंतवणूक करून यंत्रणा सुरू करण्यात आली. त्यामुळे आर्थिक अडचण या कंपनीसमोर जरूर असेल, पण गेल्या सात वर्षात कारखाना बंद असताना कामगार आणि कारखान्याला ऊस घातलेल्या शेतकऱ्यांची अवस्था काय हे कधीही ढुंकूनही न पाहिलेले राजकीय नेते कारखाना सुरू झाल्यानंतर मात्र त्यांचे "कैवारी' असल्यासारखे वावरू लागले आहेत. कर्मचाऱ्यांचा थकीत पगार, शेतकऱ्यांची देणी त्यांना आठवू लागली आहेत. कारखाना अडचणीत असताना चालवण्यासाठी घेतला त्याला सहकार्य करण्याऐवजी आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी कर्मचारी व शेतकऱ्यांचा ढालीसारखा वापर केला जात आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख