विरोधक इंदापूरात जातीपातीचे राजकारण खेळतील.... त्याला थारा देवू नका : भरणे

विरोधक इंदापूरात जातीपातीचे राजकारण खेळतील.... त्याला थारा देवू नका : भरणे

वालचंदनगर : ""गेली पाच वर्षे अज्ञातवासात असलेले विरोधक निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जनतेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, इंदापूर तालुक्‍यातील जनता हुशार असून स्वार्थी व लबाड उमेदवाराला थारा देणार नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विरोधकांची लबाडी जनतेसमोर मांडण्यासाठी होम टू होम प्रचार यंत्रणा राबवावी,'' असे आवाहन आमदार दत्तात्रेय भरणे यांनी केली.

भरणेवाडी (ता. इंदापूर) येथे कार्यकर्त्यांच्या बैठकीत भरणे बोलत होते. त्यांनी सांगितले की, गेल्या साडेसात वर्षांपासून इंदापूर तालुक्‍याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न सुरू आहेत. सर्वसामान्य जनतेच्या सुख-दु:खात सहभागी होऊन तळागाळातील नागरिकांच्या अडचणी सोडविल्या. विरोधकांनी स्वत:च्या स्वार्थासाठी पक्षांतर केले. निवडणुका जवळ येताच जनतेशी संपर्क साधण्याचे नाटक सुरू केले.

तालुक्‍यात गेल्या चार वर्षांत कमी पावसामुळे दुष्काळ पडला. दुष्काळालाही विरोधकांनी सोडले नाही. त्याचेही राजकारण केले. कालव्याचे जास्तीत जास्त पाणी खेचून आणून तालुक्‍यातील शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. उजनी जलाशय व नीरा-भीमा नदीत जागोजागी बुडीत बंधारे उभारण्याचे नियोजन केले आहे. तालुक्‍यातील पाझर तलाव भरण्यासाठी तसेच शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी "उजनी'तून उचल पाणी योजना मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, विरोधक त्याचेही श्रेय लाटण्याचा प्रयत्न करतील, त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जनतेसमोर सत्य मांडण्याचा प्रयत्न करावा. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माध्यमातून झालेली विकासकामे जनतेपर्यंत पोचवावीत, असे आवाहन त्यांनी केले.

विधानसभेची निवडणूक जनतेने हातात घेतली असून विरोधकांच्या भूलथापांना बळी पडणार नाही. विकासाला साथ देण्यासाठी जनता राष्ट्रवादीच्या उमेदवाराला उच्चांकी मतांनी निवडून देणार असल्याचा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान विरोधक जातीपातीच्या विषारी राजकारणाचे डावपेच खेळतील. मात्र, जनता जातीपातीच्या राजकारणाला थारा देणार नाही, असे आमदार दत्तात्रेय भरणे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com