datta sane replies to mla mahesh landge's `politics with respect' idea  | Sarkarnama

भोसरीत निवडणुकीपूर्वीच आखाडा; दादांविरुद्ध काकांनी थोपटले दंड

उत्तम कुटे 
शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019

आपल्यावर टीका करणाऱ्या विरोधकांचाही मानसन्मान राखत त्यावर प्रतिक्रिया न देण्याची भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे यांनी लोकसभेला सुरु केलेली 'पॉलिटिक्स विथ रिस्पेक्ट' ही मोहीम विधानसभेलाही कायम ठेवली आहे. त्यानुसार विरोधकांनी केलेल्या टीकेला प्रतिक्रिया देऊ नये असे आवाहन त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केले आहे. 

पिंपरीः आपल्यावर टीका करणाऱ्या विरोधकांचाही मानसन्मान राखत त्यावर प्रतिक्रिया न देण्याची भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे यांनी लोकसभेला सुरु केलेली 'पॉलिटिक्स विथ रिस्पेक्ट' ही मोहीम विधानसभेलाही कायम ठेवली आहे. त्यानुसार विरोधकांनी केलेल्या टीकेला प्रतिक्रिया देऊ नये असे आवाहन त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केले आहे. 

दुसरीकडे त्यांचे कट्टर विरोधक, भोसरीतील राष्ट्रवादीचे इच्छूक आणि पिंपरी चिंचवड महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते दत्ताकाका साने यांनी मात्र या मोहिमेचा समाचार घेताना `चुकला की नो रिसपेक्ट, आऊट डायरेक्ट' असा हल्लाबोल केला आहे. त्यामुळे कथित चुकीची कामे केल्याबद्दल दादांवरील काकांचा टीकेचा रोख व जोर कायम राहिला असून उलट त्याचा वेग त्यांनी आता वाढवला आहे. 

लोकसभेला महेशदादांनी ही मोहीम सुरु केली होती. त्यावेळी काका शांत होते. मात्र,आता ते विधानसभेला दादांचे प्रतिस्पर्धी असण्याच्या शक्यतेने त्यांनी दादा व त्यांच्या या मोहिमेलाही लक्ष्य केले आहे. दुसरीकडे शहरात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत.त्यानिमित्त आरोप-प्रत्यारोपही सुरु झाले आहेत. त्यात दादांवरही व त्यातही काकांकडून सडकून टीका होत आहे. आता, तर त्यांनी `दादा, क्या हुआ तेरा वादा' या आशयाचे फलक संपूर्ण मतदारसंघात लावले आहेत. त्याव्दारे दिलेल्या आश्वासनांची पूर्ततेअभावी व केलेल्या कथित गैरव्यवहाराबद्दल दादांना लक्ष्य करण्यात आले आहे. मात्र,या टीकेला ना दादा वा ना त्यांचे समर्थक असे कुणीही उत्तर दिलेले नाही. 

आपल्या मोहिमेसंदर्भात दादा म्हणाले, की  आरोप-प्रत्यारोपाचे जनतेला काही देणे-घेणे नसते. त्यांना त्याचा संताप येतो. त्यांना  विकासकामे महत्वाची आहेत. त्यामुळे आरोप-प्रत्यारोप करणे योग्य नाही. राजकारणात आदर राखला गेला पाहिजे. त्यामुळे वैयक्तिक टीका करु नये. गैरसमजुतीतून,अज्ञानानतून किंवा वैयक्तिक आकसातून विरोधकांकडून टीकाटिप्पणीना कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया सोशलमिडीया व इतर माध्यमातून कार्यकर्त्यांनी देऊ नये. विकासाभिमुख राजकारण हीच भोसरी मतदारसंघाची खरी ओळख बनवायची आहे. आदरपूर्वक सुसंस्कृत राजकारण करुन एक नवा आदर्श निर्माण करुया. तुमची साथ मिळेल हीच अपेक्षा. निवडणूका पाच वर्षात एकदाच येतात. या काही दिवसांच्या निवडणुकीसाठी आपल्या आयुष्यातील महत्वाचे नातेवाईक, मित्र परिवार, सहकारी, समाजातील मान्यवर यांच्या सोबतचे संबंध खराब करु नका.

दादांच्या या आदरयुक्त राजकारणावर हल्लाबोल करताना काका म्हणाले, की चुकला की नो रिसपेक्ट, आऊट डायरेक्ट. मी चुकीचे काम किंवा भ्रष्ट कारभार, मतदारांचा विश्वासघात केला. वचननाम्याशी बांधील व दिलेल्या शब्दास एकनिष्ठपणे न राहिल्यास तर मला रिसपेक्ट न देता डायरेक्ट आऊट करा.मी समाजसेवा व विकासकामे करण्यासाठी राजकारण करतो. माझा किंवा स्वकियांचा विकास,खिसा भरण्यासाठी नाही. मी आमदार झालो, तरी मला कडाडून विरोध करणारा राजकीय विरोधक हवाय.कारण मला किंवा माझ्या निकटवर्तीयांमध्ये सत्तेचा माज, हवा डोक्यात न येता कायम जमिनीवर जनतेशी एकनिष्ठ राहून भोसरी विधानसभामध्ये नं.1 विकासकामे व गुन्हेगारी, अवैध धंदे, हप्तेगिरी व दहशतमुक्त परिसर करण्यासाठी कटिबध्द व दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी मला वारंवार टिका करणारा विरोधक हवाय. माझ्या डोक्यात सत्तेची हवा न जाण्यासाठी व जनता जनार्दनच सर्वोच्च याची जाणीव कायम होण्यासाठी मला कडवा विरोधक हवाय.म्हणून मी दिलेली वचने पूर्ण न केल्यास किंवा फसवल्यास राजकारणातून जनतेने मला नो रिसपेक्ट,आऊट डायरेक्ट करावे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख