datta padsalgikar appointed as deputy nsa | Sarkarnama

दत्ता पडसलगीकर राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागारपदी : अजित डोवाल यांचे सहायक म्हणून जबाबदारी

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 29 ऑक्टोबर 2019

पडसलगीकर यांनी मुंबईचे पोलिस आयुक्तपदही भूषवले होते.

मुंबई : राज्याचे निवृत्त पोलिस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांची राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागारपदी (अंतर्गत सुरक्षा) नियुक्ती करण्यात आली आहे. त्याबाबतचा आदेश मंगळवारी (ता. 29) जारी करण्यात आला. देशाच्या अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पद मानले जाते. पडसलगीकर यांनी मुंबईचे पोलिस आयुक्तपदही भूषवले होते.

दत्ता पडसलगीकर हे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचे सहायक म्हणून काम करतील. देशाच्या अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी त्यांच्यावर राहील. पडसलगीकर यांनी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात पदवी घेतल्यानंतर पुणे विद्यापीठातून फ्रेंच साहित्यात पदव्युत्तर पदवी घेतली. त्यांचा उर्दू भाषेचाही चांगला अभ्यास आहे.

नागपूर येथे कार्यरत असताना त्यांनी मटका व बेकायदा दारूविक्रीवर कठोर कारवाई केली होती. मुंबईत संघटित टोळ्यांची दहशत असताना अमर नाईक याच्यासारख्या कुख्यात गुंडाला त्यांच्या नेतृत्त्वाखाली झालेल्या कारवाईत टिपण्यात आले होते. गवळी टोळीच्या विरोधातही त्यांनी कठोर कारवाई केली होती. त्यानंतर त्यांनी आर्थिक गुन्हे विभागाच्या उपायुक्तपदावर काम केले. त्यांनी अमरावती, कराड, नाशिक आणि केंद्रातही प्रतिनियुक्तीवर काम केले होते.

उस्मानाबादमध्ये पोलिस अधीक्षक असताना दत्ता पडसलगीकर यांनी निजामाविरोधातील कारवाईत हुतात्मा झालेल्या पोलिसांच्या पत्नींची माहिती घेतली. त्यांनी सर्व तपशील गोळा केला होता. त्यांच्या प्रयत्नांमुळे 30 वर्षांनंतर हुतात्मा पोलिसांच्या कुटुंबीयांना निवृत्तिवेतन सुरू झाले. पोलिस उपायुक्त असताना त्यांनी कामाठीपुरा येथील कुंटणखान्यांतून 450 अल्पवयीन मुलींची सुटका व पुनर्वसन केले होते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख