खोतकरांच्या "गिफ्ट'मुळे रावसाहेब दानवेंचा उद्याचा वाढदिवस गोड होणार

खोतकरांच्या "गिफ्ट'मुळे रावसाहेब दानवेंचा उद्याचा वाढदिवस गोड होणार

औरंगाबाद : जालना जिल्ह्यातील दोन मातब्बर राजकारणी गेल्या वर्षभरापासून एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे हे जिल्ह्यातील शिवसेना संपवायला निघालेत असा खळबळजनक आरोप करत शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी त्यांना लोकसभा निवडणूकीत आव्हान देण्याची घोषणा केली होती. खासदार रावसाहेब दानवे यांचा उद्या (ता. 18) वाढदिवस आहे. खोतकरांच्या आव्हानामुळे त्यावर सावट होते. पण दानवेंच्या विरोधात उगारलेले अर्जुनास्त्र खाली ठेवत खोतकरांनी त्यांना एकप्रकारे वाढदिवसाची भेटच दिल्याचे बोलले जात आहे. 

दानवेंच्या विरोधात उघडपणे पहिल्यांदा कुणीतरी भूमिका घेऊन मैदानात उतरले होते. त्यामुळे खोतकरांना सर्वच पक्षांचा पाठिंबा मिळत होता. खोतकर ऐकण्याच्या मनस्थितीत नाही हे पाहून दानवेंनी आपली सगळी शक्ती पणाला लावली आणि अखेर अर्जुनास्त्र निष्प्रभ करण्यात ते यशस्वी ठरलेच. औरंगाबाद येथे युतीच्या महामेळाव्यात खोतकरांनी माघार घेत असल्याचे जाहीर करत खऱ्या अर्थाने रावसाहेब दानवे यांना त्यांच्या वाढदिवसाचे गोड गिफ्ट दिल्याची चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे. 

सरपंच ते केंद्रात राज्यमंत्री आणि आता भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदापर्यंतचा रावासाहेब दानवेंचा प्रवास एखाद्या चित्रपटाला शोभावा असाच ठरला. सरपंच, पंचायत समिती सभापती, दोनदा आमदार, सलग चारवेळा खासदार, केद्रांत राज्यमंत्री आणि आता भाजप सारख्या मोठ्या पक्षाचे राज्यातील प्रमुख नेते असा रावसाहेब दानवेंचा चढता आलेख. दादा नावाने कार्यकर्त्यांमध्ये ओळखले जाणारे रावसाहेब दानवे आपल्या विरोधात उभे राहिलेले बंड मोडून काढण्यात देखील आज खऱ्या अर्थाने "दादा'च ठरले. जालना मतदारसंघात त्यांच्या या कामगिरीला "चकवा' असे देखील संबोधले जाते. 

रामनगर साखर कारखाना, कृषी उत्पन्न बाजार समितीवरून दानवेंनी तर रामेश्‍वर सहकारी साखर कारखाना, जिल्ह्यातील रस्त्यांचे सगळे कंत्राट आपल्याच नातेवाईकांना वाटून दोन्ही हाताने लटत असल्याचा आरोप करत दोघांनी एकमेकांच्या विरोधात दंड थोपटले होते. नेत्यांमधील हे युध्द थेट कार्यकर्त्यांपर्यंत पोचल्यामुळे पारध-धुळे रस्त्याच्या कामावरून दोघांचे समर्थक भिडल्याचे देखील मध्यंतरी पहायला मिळाले. कृषी उत्पन्न बाजार समिती, जिल्हा परिषदे सारख्या स्थानिक स्वराज संस्था ताब्यात ठेवत अर्जुन खोतकरांनी दानवेंना टक्कर देणे सुरू केले होते. चारवेळा आमदार आणि दोनदा राज्यमंत्रीपद मिळवलेले खोतकर जिल्ह्यातील डॅशिंग नेतृत्व म्हणून ओळखले जाते. शिवसैनिकांना त्रास आणि खोटे गुन्हे दाखल करण्याच्या प्रकारामुळे त्यांनी दानवेंच्या विरोधात उघड भूमिका घेतली. 

अगदी जालना लोकसभा मतदारसंघातील सिल्लोड-सोयगांवचे कॉंग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांच्यांशी हातमिळवणी करण्यात देखील त्यांना गैर वाटले नाही. दानवेंना धडा शिकवण्यासाठी सत्तार-खोतकर तर तिकडे अचलपूरचे आमदार बच्चू कडू असे तिहेरी संकट चालत आल्यामुळे रावसाहेबांनीही आपले कसब पणाला लावले. खोतकर कॉंग्रेसकडून लढणार अशा बातम्या रोज प्रसारमाध्यमांतून येत होत्या. यावर बारकाईने लक्ष ठेवत मंत्री सुभाष देशमुख, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सगळ्यात शेवटी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यामार्फत दानवेंनी खोतकरांच्या माघारीसाठी प्रयत्न सुरू केले. 

एकीकडे खोतकरांना रोखण्याचे तर दुसरीकडे ते कॉंग्रेसकडून लढलेच तर शिवसेनेतील कुणीही त्यांच्या बाजूने राहू नये यासाठीची फिल्डींग देखील दानवेंनी लावून ठेवली होती. अगदी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापुर्वी विविध महामंडळावर करण्यात आलेल्या नियुकत्यांमध्ये जिल्ह्यातील अनेक महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची वर्णी रावसाहेब दानवे यांच्या शिफारशीमुळेच लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. एकीकडे डॅमेज कंट्रोल आणि दुसरीकडे नेत्यांकडून खोतकरांना समज असे दुहेरी प्रयत्न सुरू ठेवल्यामुळे रावसाहेब दानवे यांना अखेर यश मिळाले. 

महायुतीच्या मेळाव्याला जाण्यापूर्वी शहरातील एका हॉटेलच्या बंद खोलीत दानवे-खोतकर वादाचा शेवट गोड करण्यात आला. एकमेकांना दुषणे देत ज्या तोंडातून उणीदुणीच बाहेर पडली त्याच तोंडात खोतकर-दानवे यांनी एकमेकांना पेढा भरवला. लोकसभा निवडणूक आधी असल्यामुळे माझी परीक्षा आधी आहे, त्यात मी पास होईन, पण त्यानंतर म्हणजेच विधानसभा निवडणुकीला तुमची परीक्षा आहे असा सूचक इशारा खोतकरांनी महायुतीच्या मेळाव्यात बोलतांना दानवे यांना दिला. त्यावर मी शंभर टक्‍यांनी पास होईन असे सांगत दानवे यांनी देखील खोतकरांना निवडून आणण्याची जबाबदारी लगेच स्वीकारली. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com