अंबादास दानवे यांना मातोश्रीचे बळ ; कन्नडची अतिरिक्त जबाबदारी सोपवली

अंबादास दानवे यांना मातोश्रीचे बळ ; कन्नडची अतिरिक्त जबाबदारी सोपवली

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीत निसटता पराभव झाल्यानंतर शिवसेनेत मोठी उलथापालथ होणार अशी चर्चा रंगू लागली होती. विशेषतः शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांची उचलबांगडी केली जाणार असे बोलले जात होते. मात्र शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अंबादास दानवे यांच्या कार्यक्षेत्रात वाढ करत त्यांना बळ दिल्याचे दिसून आले आहे. 

जिल्हाप्रमुखपदी अंबादास दानवे यांना कायम ठेवत त्यांच्याकडे कन्नड विधानसभा मतदार संघाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ आता पूर्णपणे दानवे यांच्या हातात आला आहे. मातोश्री कडून दानवे यांना बळ मिळाल्यामुळे चंद्रकांत खैरे यांचे खच्चीकरण तर केले जात नाही ना? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. 

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीवर शिवसेनेने लक्ष केंद्रित केले आहे. शिवसेनेच्या 34 व्या वर्धापनदिन सोहळ्यात चंद्रकांत खैरे यांनी आपल्या पराभवावर मत व्यक्त करताना पक्षांतर्गत विरोधक आणि काही प्रमुख पदाधिकाऱ्यांवर नाव न घेता जोरदार टीका केली होती. खैरे यांच्या पराभवाला जिल्हाप्रमुख अंबादास दानवे हे देखील जबाबदार असल्याचे बोलले जात होते. या पार्श्वभूमीवर शिवसेनेत मोठे फेरफार केले जातील अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. यात प्रामुख्याने जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांना पदावरून हटवले जाईल असा तर्क लावला जात होता. प्रत्यक्षात मात्र घडले उलटेच. 

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुख बदलाच्या चर्चेला पूर्णविराम देत अंबादास दानवे यांच्यावर विश्वास दाखवल्याचे दिसून येते .दानवे यांच्या कार्यक्षेत्रामध्ये कन्नड विधानसभा क्षेत्राची वाढ करत उद्धव ठाकरे यांनी एकप्रकारे त्यांना ताकदच दिली आहे. यापूर्वी कन्नड विधानसभा क्षेत्राची जबाबदारी शहराचे दुसरे जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी यांच्याकडे होती. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत हर्षवर्धन जाधव यांचे तगडे आव्हान असताना शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांना कन्नड मधून साडे सहा हजारांची लीड मिळाली होती. असे असले तरी आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हर्षवर्धन जाधव यांना रोखण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी अंबादास दानवे यांच्यावर विश्वास दाखवला आहे. 

नव्या जबाबदारीमध्ये कन्नड विधानसभा मतदारसंघ अंबादास दानवे यांच्या कार्यक्षेत्रात आल्याने संपूर्ण लोकसभा मतदारसंघावर आता दानवेंना पकड बसवणे शक्‍य होणार आहे. संघटन कौशल्य आणि पक्षाची ध्येय धोरणे जिल्ह्यामध्ये योग्य पद्धतीने राबवण्यात अंबादास दानवे यांचा हातखंडा समजला जातो . जिल्हा पातळीवर त्यांचा पदाधिकारी कार्यकर्त्यांशी असलेला जनसंपर्क पाहता उद्धव ठाकरे यांनी दानवे यांना संपूर्ण जिल्ह्यात मुक्तपणे काम करण्याची संधी या निमित्ताने दिल्याचे बोलले जाते. 

वंचित बहुजन आघाडीचा घेतला धसका 
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शहरातील पूर्व मध्य आणि ग्रामीण भागातील गंगापूर विधानसभा मतदारसंघात एमआयएम -वंचित बहुजन आघाडीचे इम्तियाज जलील यांना मोठ्या प्रमाणात मते मिळाली. ही धोक्‍याची घंटा लक्षात घेऊन याचा फटका आगामी विधानसभा निवडणुकीत बसण्याआधीच उपाययोजना करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी हे पाऊल उचलल्याचे समजते . 

पक्षातील गटबाजी ,खैरे- दानवे वाद याला अधिक महत्त्व न देता उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद जिल्ह्यात शिवसेनेची ताकद पुन्हा वाढवण्यावर भर दिला आहे. औरंगाबाद लोकसभेत शिवसेनेचा झालेला पराभव हा फक्त चंद्रकांत खैरे यांचा पराभव नसून तो माझा पराभव आहे अशी भावना उद्धव ठाकरे यांनी जालना येथे बोलताना व्यक्त केली होती. या आपल्या विधानातून उद्धव ठाकरे यांनी चंद्रकांत खैरे यांच्याबद्दल सहानुभूती दाखवतानाच दुसरीकडे जिल्ह्यात पक्षाची ताकद कमी होणार नाही याची खबरदारी देखील घेतल्याचे या निर्णयावरून दिसून येते. 

उद्धव ठाकरे यांच्या या निर्णयाने गेल्या काही दिवसापासून शहरात सुरू असलेल्या पक्षांतर्गत फेरबदलाच्या चर्चेला पूर्णविराम तर मिळालाच आहे, परंतु ग्रामीण आणि शहरी भागात शिवसैनिकांमध्ये निर्माण झालेला संभ्रम देखील दूर झाला. उद्धव ठाकरे यांच्या या निर्णयाला कुणी खैरे यांचे खच्चीकरण म्हणत आहे, तर कुणी दानवे यांचा प्रभाव वाढल्याचे बोलत आहे .प्रत्यक्षात मात्र उद्धव ठाकरे यांनी या निर्णयातून संघटना बळकट करण्याला प्राधान्य दिल्याचे बोलले जाते. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com