बारा भोकशांचा पान्हा'च म्हणणार :  दानवे यांनी जमविला गप्पांचा फड 

केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे आपल्या अघळपघळ शैलीबद्दल प्रसिद्ध आहेत. त्यांनी या शैलीचे फायदे तितक्याच खुमासदार पद्धतीने सांगितले.
बारा भोकशांचा पान्हा'च म्हणणार :  दानवे यांनी जमविला गप्पांचा फड 

शिर्डी : मी काही साहित्यिक नाही. तुमचे तर मला काहीच कळत नाही. पुस्तक आणि कविता वाचत नाही. पिक्‍चरची गाणीदेखील पाठ नाहीत. मला कुणी पुरस्कार दिला नाही. मी कुणाला दिला नाही. मी माझा वेश आणि बोलीभाषा कधीच बदलणार नाही. आम्ही राजकारणी. आमच्या पतंगाचा दोर जनतेच्या हाती. राहणीमान, चालणे-बोलणे बदलले, तर पतंगाची दोरी कधीही काटली जाईल. एकाच वेळी सर्व कामे करतो, म्हणून स्वतःला "बारा भोकशांचा पान्हा' म्हणवतो. कुणी काही म्हणो, मी स्वतःला "बारा भोकशांचा पान्हा'च म्हणणार, तीच माझी ओळख..!'' अशा शब्दांत केंद्रीय अन्नपुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी साहित्यिकांना आपली खास ओळख करून दिली. साहित्यिक व उपस्थितांनी टाळ्यांचा गजरात त्याला दाद दिली.
 
प्रवरेच्या काठी पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील साहित्य पुरस्कारानिमित्त मराठी सारस्वतांचा मेळा जमला. या मेळ्याच्या व्यासपीठावरून दानवे यांनी खास आपल्या शैलीत गप्पांची झकास मैफल रंगविली. ग्रामीण ढंगात एकेक किस्से सांगून हशा आणि टाळ्या वसूल केल्या. 

दानवे म्हणाले, "माझ्या घरी याल, तर सरपंचांपासून ते आमदार-खासदार आणि मंत्रिपदापर्यंतची प्रमाणपत्रे पाहायला मिळतील. तेच माझे पुरस्कार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा आम्हा खासदारांचे वर्ग घेतात. काय करू नका, ते सांगतात. राहणीमान साधे ठेवा. डोळ्यावर येऊ नका. आहात तसेच रहा, असे शिकवितात. त्यामुळे आपण जसे होतो, तसेच राहतो, बोलतो. ग्रामीण भाषा बदलली तर मतदारसंघातील जनतेला ते आवडणार नाही.'' 

"विखे कुटुंबाच्या तिसऱ्या पिढीसोबत मी काम करतो आहे. विठ्ठलराव विखे पाटील व खासदार बाळासाहेब विखे पाटील यांनी राहणीमान कधीच बदलले नाही. त्यामुळेच ते जनतेला आपले वाटत,'' असे दानवे म्हणाले. 

दानवे उवाच 
- बारा भोके असलेल्या एकाच पान्ह्याचा वापर करून सायकल सुटी करता येते, पुन्हा जोडता येते, म्हणून स्वतःला "बारा भोकशांचा पान्हा' म्हणवतो. ही ओळख लोकांना आवडते. 
- जवळच्या मित्राने महागडा रंगीत सदरा भेट दिला. मतदारसंघातील लोकांनी कधी मला रंगीत कपड्यांत पाहिलेले नाही. त्यांना आवडणार नाही, म्हणून भेट नाकारली. 
- अंत्योदय योजनेचे धान्यवाटप 35 किलोवरून 40 किलोपर्यंत वाढविण्याची, तसेच स्वस्त धान्यवाटप माणशी पाचकिलोवरून सात किलोपर्यंत वाढविण्याची शिफारस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. सहा लाख मेट्रिक टन धान्य पडून आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com