अंबादास दानवेंचा आवाज वर्धापनदिन सोहळ्यात ठरला लक्ष्यवेधी

अंबादास दानवेंचा आवाज वर्धापनदिन सोहळ्यात ठरला लक्ष्यवेधी

औरंगाबाद : जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांना शिवसेनेच्या 53 व्या वर्धापनदिना निमित्त मुंबईच्या षण्मुखानंद हॉलमध्ये राज्यभरातून आलेल्या पदाधिकारी, शिवसैनिकांना मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली. दहा मिनिटांच्या भाषणात दानवे यांनी मिळालेल्या संधीच सोन करतं "ग्रामीण भागातील मुलभूत प्रश्‍न सोडवण्यासाठी करावयाचा पाठपुरावा' या विषयावर प्रभावी भाषण केलं. 

पीक विमा, कर्जमुक्ती, पीक कर्ज या सारख्या शेतकऱ्यांच्या जीवन मरणाशी निगडीत प्रश्‍नावर केवळ आंदोलन करून भागणार नाही, तर त्यासाठी पाठपुरावा करून ते सोडवण्यात शिवसैनिक किती महत्वाची भूमिका बजावू शकतो हे अंबादास दानवे यांनी विस्तृतपणे सांगितले. गेल्या अनेक वर्षापासून अंबादास दानवे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख म्हणून औरंगाबादेत काम करतात. वक्तृत्व कला, आपले मुद्दे प्रभावीपणे मांडण्याची पध्दत, राजकीय आंदोलनाचे योग्य टायमिंग साधण्याचे कसब आणि जिल्ह्यातील शिवसैनिकांचा असलेला विश्‍वास या जोरावर शिवसेनेने जिल्ह्यात शेतकऱ्यांसह अनेक सामाजिक विषयावर यशस्वी आंदोलने केली. विषयाची मुद्देसूद मांडणी करण्यात हातखंडा असलेल्या अंबादास दानवे यांच्यावर विश्‍वास दाखवत उध्दव ठाकरे यांनी त्यांना शिवसैनिकांना मार्गदर्शन करण्यास सांगितले. 

लोकसभेच्या नुकत्याच निवडणुकीत शिवसेनेनचा पराभव झाल्यानंतर अंबादास दानवे यांची हकालपट्टी होणार अशी चर्चा सुरू होती. मात्र उध्दव ठाकरे यांनी त्यांच्यावर अतिरिक्त जबादारी सोपवत संपुर्ण लोकसभा मतदारसंघच संघटनात्मक बांधणीसाठी सोपवला. याची चर्चा संपत नाही तोच मुंबई शिवसेना वर्धापनदिनाच्या सोहळ्यात अंबादास दानवे यांना भाषणाची संधी दिली. राज्यात सध्या पंतप्रधान पीक विमा योजना, शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा चांगलाच गाजतोय. विशेषता पीक विमा योजनेतील घोळ सगळ्याच राजकीय पक्षांच्या अजेंड्यावर आहे. उध्दव ठाकरे यांनी स्वःत जालना येथील दौऱ्यात पीक विमा कंपन्याना धडा शिकवण्याचा इशारा दिला होता. हाच विषय घेऊन सध्या शिवसेनेने राज्यभरात पीक विमा मदत केंद्र सुरू केले आहे. 

अंबादास दानवे यांनी या विषयाचे महत्व लक्षात घेऊन त्याची विस्तृत मांडणी आपल्या दहा मिनिटांच्या भाषणात केली. पीक विमा म्हणजे काय? तो कसा काढतात, तो देण्याची पध्दत, विमा कसा भरावा यापासून तर शेतकरी कर्जमुक्तीचा लाभ शेतकऱ्यांना कसा मिळवून द्यावा याची माहिती उपस्थित शिवसैनिकांना दिली. केवळ आंदोलन करून भागणार नाही, तर शेवटपर्यंत पाठपुरावा करत समाजातील गोर-गरीबांपर्यंत सरकारच्या योजनाचा लाभ कसा पोहचेल याची खबरदारी आणि जबाबदारी ग्रामीण भागातील शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, गटप्रमुख, उपगटप्रमुख बीएलएनी घेतली पाहिजे असे आवाहन दानवेंनी उपस्थितांना केले. 

पीक कापणी प्रयोग, त्यात गावच्या सरपंचाची भूमिका आणि शाखाप्रमुखांनी घ्यावयाची काळजी याचे महत्व पटवून देतांना अंबादास दानवे म्हणाले, सध्या अनेक शेतकऱ्यांना पीक विमा भरून देखील विमा मिळाल्या नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात 16 हजार शेतकऱ्यांकडे पैसे भरल्याचा पावत्या आहेत, पण त्याचा विमा भरला गेलेला नाही. कंपन्याकडून चुकीच्या खाते क्रमाकांमुळे काही शेतकऱ्यांना विमा मिळाला नसल्याचे सांगितले जाते. अशावेळी त्या गावातील शाखाप्रमुखांनी शेतकऱ्याच्या मदतीला धावून गेल पाहिजे. त्याचे अर्ज भरून देण्यापासून विम्याचा लाभ मिळवून देईपर्यंत पाठपुरावा केला तर नक्कीच शेतकऱ्यांना न्याय मिळू शकतो. 

बॅंक मॅनेजरचा गळा धरावा लागेल 

शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या आतापर्यंत पंधरा ग्रीनलीस्ट जाहीर झाल्या आहेत. किती शाखाप्रमुखांना त्या माहित आहेत. खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला कर्जमुक्त करायचे असेल तर या ग्रीनलीस्ट घेऊन गावीतल बॅंकेत प्रत्येक शाखाप्रमुखाने गेल पाहिजे. पावसाळा सुरू झाला आहे, आता शेतकऱ्यांना पीक कर्जाची गरज असते. बॅंकाना टार्गेट दिलेले असते पण, ते टाळाटाळ करतात. इथेही शिवसेनेचा शाखाप्रमुख महत्वाची भूमिका पार पाडू शकतो. किती शेतकऱ्यांना कर्जाची गरज आहे, बॅंकांना टार्गेट किती आहे याची माहिती ठेवून शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळवून द्या. वेळ पडली तर बॅक मॅनेजरचा गळा धरावा लागेल, त्यालाही घाबरू नका असे सांगतांनाच शिवसेनेच्या महिला आघाडीने देखील पोषण आहार, स्तनदा, गरोदर महिलांसाठीच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे असे आवाहन अंबादास दानवे यांनी केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com