...आजही लक्षात आहे तो क्षण, पवार साहेबांनी माझा प्रचार केला होता

 ...आजही लक्षात आहे तो क्षण, पवार साहेबांनी माझा प्रचार केला होता

भोकरदन : देशाचे माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार साहेबांनी विधानसभा निवडणुकीत माझा प्रचार केला होता हे जर कुणाला सांगितले तर त्यावर विश्‍वास बसणार नाही. पण हो शरद पवारांनी माझ्यासाठी प्रचार केला होता अशी आठवण भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी सांगितली. शरद पवार यांच्या वाढदिवसा निमित्त त्यांच्याबद्दलच्या अविस्मरणीय प्रसंगाला दानवे यांनी सरकारनामाशी बोलतांना उजाळा दिला. 

रावसाहेब दानवे म्हणाले, मी भोकरदन मतदारसंघातून दोनदा आमदार आणि जालना लोकसभा मतदारसंघातून सलग चारवेळा खासदार म्हणून निवडून आलो आहे. शरद पवारांच्या वाढदिवसाचे औचित्य आणि त्यांच्या बद्दलची एक आठवण मला या निमित्ताने आर्वजून सांगावीशी वाटते. पवार साहेबांबद्दल खूप काही ऐकून होतो, पण त्यांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी मला 1985 मध्ये मिळाली. भोकरदन-जाफ्राबाद विधानसभा मतदारसंघातून मी भाजपचा उमेदवार म्हणून निवडणूक लढवत होतो. निवडणुकीची धामधूम, प्रचार सभांचा तो काळ. शरद पवार तेव्हा (एस) कॉंग्रेसचे नेतृत्व करत होते. 1985 च्या निवडणुकीत भाजप सोबत त्यांची युती होती. त्यामुळे सहाजिकच शरद पवारांच्या भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी देखील काही ठिकाणी सभा ठेवण्यात आल्या होत्या. 

माझ्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भोकरदनमध्ये शरद पवारांची जाहीर सभा ठेवण्यात आली होती. तेव्हा जळगांव ते भोकरदन असा प्रवास त्यांच्या सोबत करण्याची संधी मला मिळाली. पहिल्याच भेटीत मी त्यांच्या व्यक्तिमत्वाने प्रभावित झालो. माझ्या प्रचारासाठी त्यांनी जाहीर सभाही घेतली. 1985 नंतर अनेकदा त्यांच्या भेटीचा योग आला. 2009 मध्ये पवार साहेब जालना दौऱ्यावर आले होते. तेव्हा मी त्यांना चहा पिण्यासाठी आमंत्रित केले. पवार साहेबांनी देखील माझ्या आमंत्रणाचा स्वीकार केला व ते घरी आले. यावेळी त्यांनी मनमोकळ्या गप्पा मारला. विशेष म्हणजे शरद पवारांनी विरोधी पक्षाच्या माणसाकडे जाऊ नये, त्याने चुकीचा संदेश जाईल असा मतप्रवाह त्यांच्या पक्षातील काही पदाधिकाऱ्यांचा होता. पण त्याला न जुमानता पवार साहेब माझ्या घरी आले. अपेक्षेप्रमाणे दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रांमध्ये उलटसुलट बातम्या प्रसिध्द झाल्या. पण त्यांनी राजकारणापलीकडचे नाते जपत सगळ्यांनाच निरुत्तर केले होते. 

(शब्दांकन ः तुषार पाटील) 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com