शिवसेना खासदाराच्या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष करणाऱ्या दानवेंना लोकसभा अध्यक्षांनी सुनावले

शिवसेना खासदाराच्या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष करणाऱ्या दानवेंना लोकसभा अध्यक्षांनी सुनावले

औरंगाबाद : नाशिकचे शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांनी केंद्रीय ग्राहक संरक्षण विभागाशी संबंधित प्रश्‍न लोकसभेत विचारला होता. पण या खात्याचे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी त्यांच्या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष केले, त्यामुळे लोकसभा अध्यक्षांनी जेव्हा " माननीय मंत्रीमहोदय कृपया उत्तर द्या ', असे सांगताच दानवे यांनी गोडसे यांना आपला प्रश्‍न पुन्हा विचारण्याची विनंती केली. यावरून संतापलेल्या लोकसभा अध्यक्षांनी दानवे यांना चांगलेच सुनावले. 

भाजपचे जालना मतदारसंघाचे खासदार तथा केंद्रीय ग्राहक संरक्षण राज्यमंत्री रावसाहेब दानवे नेहमीच कुठल्या न कुठल्या कारणाने चर्चेत असतात. यावेळी होणारी चर्चा मात्र त्यांच्यासाठी व भाजप सरकारसाठी देखील भूषणावह नाही. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारमधील मंत्र्यांना अधिवेशन काळात उपस्थित राहून विरोधकांच्या प्रश्‍नांची समाधानकारक उत्तरे देण्यास बजावत आहेत, तर दुसरीकडे त्यांच्याच सरकारमधील एक मंत्री आपल्या खात्याशी संबंधित विचारलेल्या प्रश्‍नाच्या वेळी सभागृहात सोबतच्या मंत्र्यांशी गप्पा मारतो असे चित्र नुकतेच पहायला मिळाले. 

सध्या लोकसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. संसदेत अनेक विधेयकावर चर्चा आणि मतदान होणार आहे. नागरिकत्व विधेयक लोकसभेनंतर राज्यसभेत मंजुर करून घेण्यासाठी मोदी सरकार शर्थीचे प्रयत्न करत असतांना त्यांच्या मंत्र्यांच्या बेफिकरीवर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला चांगलेच संतापले. नाशिकचे शिवसेना खासदार यांनी मंगळवारी प्रश्‍नोत्तराच्या काळात खाद्यान्न मंत्रालयाशी संबंधित प्रश्‍न विचारला. यावेळी या खात्याचे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे सभागृहात शेवटच्या बाकावर बसलेले होते. कॅबिनेटमंत्री रामविलास पासवान यांच्याशी कुठल्या तरी विषयावर ते बोलत असल्याने गोडसे यांच्या प्रश्‍नाकडे त्यांचे लक्षच नव्हते. 

पासवान यांच्या पायाला दुखापत झालेली असल्यामुळे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केंद्रीय राज्यमंत्री म्हणून रावसाहेब दानवे यांनी गोडसेंच्या प्रश्‍नाला उत्तर देण्यास सांगितले. दानवे उत्तर देण्यासाठी उभे राहिले, पण त्यांचे प्रश्‍नाकडे लक्षच नसल्याने गोडसे यांनी प्रश्‍न पुन्हा विचारावा अशी मागणी दानवेंनी केली. यावर लोकसभा अध्यक्ष चांगलेच संतापले. खात्याशी संबंधित प्रश्‍न विचारला जात असतांनाही तुमचे त्याकडे लक्ष नव्हते याबाबत नाराजी व्यक्त करत, गोडसे यांनी पुन्हा प्रश्‍न विचारू नये असे बजावले आणि मंत्री महोदय जरा कामाकडे लक्ष द्या अशा शब्दांत रावसाहेब दानवे यांचे कान उपटले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com