महायुतीचा दानवेंसाठी पहिल्या पसंतीकरता जोर , आघाडीला दुसऱ्या पसंतीची आशा ?

 महायुतीचा दानवेंसाठी पहिल्या पसंतीकरता जोर , आघाडीला दुसऱ्या पसंतीची आशा ?

औरंगाबाद : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीसाठी सोमवारी (ता. 19) मतदान होत आहे. महायुतीचे अंबादास दानवे विरुध्द आघाडीचे बाबुराव कुलकर्णी यांच्यात थेट लढत होत आहे. महायुतीकडे स्वतःचे 333 आणि सत्तार समर्थक, एमआयएम, अपक्ष अशा मतदारांची रांग लागली आहे. या जोरावर अंबादास दानवे आघाडीच्या कुलकर्णी यांचा सहज पराभव करतील असे चित्र आहे. दानवे यांना पहिल्या पसंतीची मते मिळून ते विक्रमी मतांनी विजयी व्हावेत यासाठी सेना नेत्यांनी कंबर कसली आहे. आघाडीचे बाबुराव कुलकर्णी यांना मात्र निवडणुकीचा निकाल दुसऱ्या पसंतीच्या मतांवर लागेल अशी आशा आहे. 

औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची गेल्या महिनाभरापासून चर्चा सुरू आहे. चर्चेत असलेली नावे अचानक स्पर्धेतून बाहेर गेली आणि महायुतीकडून अंबादास दानवे, तर आघाडीकडून बाबुराव कुलकर्णी यांची लॉटरी लागली. कॉंग्रेसचे विद्यमान आमदार सुभाष झांबड यांनी निवडणूक लढवण्यास असमर्थता दाखवल्याने उमेदवारीची माळ कुलकर्णी यांच्या गळ्यात पडली. युतीकडून खोतकर, वैद्य, त्रिवेदी यांच्यावर मात करत अंबादास दानवे यांनी बाजी मारली. 

संख्याबळाचा विचार केला तर महायुतीचे पारडे जड आहे. विजयासाठी आवश्‍यक असलेले बहुमत जवळ असतांनाही अंबादास दानवे यांनी अतिरिक्त मतांची जमवाजमव करत स्वतःला सुरक्षित करून घेतले. दानवे यांचे युतीच्या सदस्यांशी असलेले वैयक्तिक संबंध ही त्यांच्या जमेची बाजू असली तरी दानवे यांच्या विजयासाठी स्वतः पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी या निवडणुकीत लक्ष घातले आहे. स्थानिक लोकाधिकार समिती, शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, पक्षाचे सचिव खासदार अनिल देसाई या सगळ्यांवर दानवे यांना निवडून आणण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे पहिल्यांदा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शिवसेना पुर्ण ताकदीनीशी मैदानात उतरल्याचे चित्र पहायला मिळाले. 

विक्रमी विजयाचा दावा 
महायुतीचे अंबादास दानवे हे विक्रमी मतांनी निवडून येतील असा दावा केला जातोय. शिवसेना-भाजप दोन्ही पक्षाचे मिळून 333 सदस्य आहेत. या शिवाय कॉंग्रेसचे अब्दुल सत्तार समर्थक चाळीसहून अधिक सदस्य देखील दानवे यांच्या पाठीशी उभे राहण्याची शक्‍यता आहे. शिवसेनेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी देखील आपल्या पाच समर्थक सदस्यांचा पाठिंबा दानवे यांना देण्याची तयारी दर्शवली आहे. 

औरंगाबाद-जालना जिल्हा परिषदेतील कॉंग्रेस सोबतच्या युतीचा मुद्दा उपस्थित करत भाजपने निवडणुकीत रंगत आणली होती. पण यावर भाजपच्या नेत्यांनी तूर्तास पडदा टाकला आहे. अंबादास दानवे यांना कुठल्याही प्रकारचा दगाफटका होता कामा नये अशा स्पष्ट सूचना वरिष्ठ नेत्यांकडून सदस्य आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे अंबादास दानवे आपले संख्याबळ राखत विरोधी सदस्यांना देखील आपल्याकडे वळवून विक्रमी मतांनी निवडून येण्याचा विक्रम करतील असे बोलले जाते. 
एमआयएमला इकडे आड, तिकडे विहीर 
एमआयएमचे 29 सदस्य आपल्या मताचा अधिकार बजावणार आहेत. लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या विरोधात लढूनच एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी विजय मिळवला होता. वैचारिक दृष्ट्या शिवसेना-भाजप आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी यांच्याशी एमआयएमचे पटत नाही. त्यामुळे या निवडणुकीत त्यांच्यासाठी इकडे आड आणि तिकडे विहीर अशी परिस्थीती झाली आहे. अशावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी नगरसवेकांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र दिल्याची चर्चा आहे. नगरसेवकांना दिलेले हे स्वातंत्र अंबादास दानवे यांच्या पथ्यावरच पडण्याची अधिक शक्‍यता आहे. 

आघाडीच्या गोटात शांतता 
आघाडीची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर एक धनाढ्य आणि तगडा उमेदवार म्हणून बाबुराव कुलकर्णी यांच्याकडे पाहिले गेले. सुरूवातीला अब्दुल सत्तार, अर्जुन खोतकर यांच्यासह भाजप नेत्यांच्या भेटीगाठी घेत त्यांनी "हम भी है मैदान मे' ची जाणीव करून दिली होती. पण कॉंग्रेसच्या हक्कांच्या मतांनाच सत्तार यांच्याकडून सुरूंग लावला गेल्याने बाबुराव कुलकर्णी यांनी जणू मैदान सोडल्याची स्थिती पहायला मिळते. माझा परमेश्‍वरावर विश्‍वास आहे, मतदार सदस्य माझ्यासाठी देव आहेत, ते योग्य निर्णय घेतील असे सांगत कुलकर्णी सध्या वेळ मारून नेतांना दिसतात. 

महायुतीच्या ज्या अंबादास दानवे यांच्या विरोधात लढायचे, त्यांच्या सोबतच पक्षाला विश्‍वासात न घेता बाबुराव कुलकर्णी यांनी संयुक्त निवेदन प्रसिध्द केले. भ्रष्टाराचार मुक्त निवडणूक लढवण्याच्या त्यांच्या संकल्पाची चर्चा देखील झाली. पण त्यांच्या या संकल्पनेमुळेच त्यांच्या आमदार होण्याच्या स्वप्नावर पाणी फिरते की काय ? अशी शंका उपस्थित केली जात आहे. आघडीला कॉंग्रेसचा कोणताही मोठा नेता बाबुराव कुलकर्णी यांच्यासाठी प्रयत्न करतोय असे चित्र नाही. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com